– डॉ. श्वेता काकडे पोतदार
दातांची कीड हा एक प्रकारचा आजारच आहे. दातांची कीड ही समस्या वयाच्या सहाव्या महिन्यापासूनच 80 व्या वर्षांपर्यंत उद्भवू शकते. जास्त करून दातांची स्वच्छता व्यवस्थित न झाल्यामुळे ही समस्या उद्भवते. सर्दीच्या खालोखाल दातांची कीड ही जगातील सर्वांत जास्त उद्भवणारी दुसरी समस्या आहे. तोंडामध्ये नैसर्गिकरित्या काही जीवाणू असतात. खालेल्या अन्नाचे कण तोंडात अडकून राहिले की त्यातून ऍसिड निर्माण होते. जीवाणू, ऍसिड, अन्नकण व थुंकी मिळून दातांवर एक चिकट थर तयार करतात. त्याला प्लाक अस म्हणतात. प्लाक जर दातांवरून काढला गेला नाही, तर त्याचे टारटर तयार होते. प्लाक व टारटर यांच्यामुळे दातांवर व हिरडयांवर दुश्परिणाम होतो. खाल्या खाल्या 20 मिनिटांमध्ये प्लाक तयार व्हायला सुरवात होते. ऍसिडमुळे दातांच्या वरच्या थराला इजा होते. व तो ऍसिडमध्ये विरघळायला लागतो. यामुळेच दातांमध्ये काळेपणा अथवा छिद्र तयार होतात.
दातांची संरचना कशी असते?
1. सर्वात बाहेर असते ते इनॅमल
2. त्याच्या खाली डेंटीन
3. त्यांच्या खाली दाताची नस.
4. दंतमुळामध्ये असते सिमेंटम
दात कीडल्याची लक्षणे कोणती असतात?
1. सामान्यतः सुरवातीला कीडताना दात दुखत नाही. जोपर्यंत कीड नसेपेक्षा लांब असते तोपर्यंत दुखणे उद्भवत नाही.
2. कीड नसेपर्यंत पोचली की दुखणे सुरू होते.
3. सुरवात मात्र गार, गरम व गोड खाल्यावर सेंसिटिव्हिटीने होते.
4. दातांवर काळेपणा दिसणे, छिद्र असणे, चावल्यावर दात दुखणे ही दात किडल्याची लक्षणे आहेत.
5. हे दुखणे कायमच असेल असे नाही. पण दुखणे नाही म्हणून इन्फेक्शन नाही, असेही नाही.
तपासणी केव्हा आणि कधी करावी?
1. जास्त करून कीडलेल्या दातांचा शोध रूटीन चेक अपच्या वेळी लागतो.
2. बऱ्याचदा काही कीड डोळयाला दिसत नाहीत अशा वेळेस एक्स-रे मधून त्यांचा शोध लागू शकतो.
उपचार कसे आणि कोणते असावेत?
1. दात वरचेवर किडला असेल तर फिलिंग केले जाते. किडका दाताचा भग काढून झालेला खड्डा सिमेंटच्या सहाय्याने भरला जातो.
2. कीड जर नसेपर्यंत गेली असेल तर रूट कॅनाल केले जाते. म्हणजेच दाताची नस काढून मग फिलिंग केले जाते.
3. त्याहून अधिक दात किडला असेल तर तो दात काढून नवीन दात बसवता येतो.
4. दात जर कमकुवत झाला असेल तर त्यावर कॅप बसवू शकतात.
5. कीड जर वरचेवर असेल तर उपचार करताना त्रास होत नाही.
6. जर कीड खोलवर गेली असेल तर उपचार करताना भूलेची आवश्यकता पडते.
7. उपचारानंतर 3-8 दिवस गोळयांची (औषधाची) आवश्यकता पडू शकते.
प्रतिबंध कसा करता येऊ शकेल?
1. दिवसातून 2 वेळेस दात घासावेत.
2. दर 6 महिन्यांनी डॅटिस्टला दात दाखवावेत.
3. वर्षातून एकदा तरी क्लिनिंग करून घ्यावे.
4. योग्य वेळेस योग्य उपचार केले तर दात वाचवणे शक्य होते.
– डॉ. श्वेता काकडे पोतदार