आज खूप दिवसांनी शनिवार, रविवार मला मोकळा मिळणार होता. सध्या सासू, सासरे नणंदेकडे अमेरिकेत गेले होते. त्यामुंळे आम्ही तिघेच घरी होतो. त्यात यांना ऑफिसच्या सेमिनारसाठी आणि मुलीला कॉलेजच्या टूरसाठी बाहेर जायचे होते. त्यामुळे फक्त मी एकटीच दोन दिवस घरात असणार होते. मी ठरविले होते की, अगदी आरामात दोन दिवस घालावयाचे. उशिरा उठायचे. स्वयंपाकाची गडबड करायची नाही. मैत्रिणींशी फोनवर मनसोक्त बोलायचे, किंवा प्रत्यक्ष जाऊन भेटायचे, थोडे विंडो शॉपिंग करायचे आणि आणखीही बरेच काही. शनिवारी पहाटेच सर्वजण घराबाहेर पडले आणि घरात मी एकटी उरले.
सोफ्यावर शांतपणे बसून चहा पिता पिता काय काय करायचे, ते मी ठरवीत होते. यांनी दिलेल्या शंभर सूचनांची उजळणी करत होते. दार नीट लाव, रात्री बाहेर जाऊ नकोस, सेल्समनशी सुद्धा आतूनच बोल इत्यादी इत्यादे…. मग सहजच माझ्या मनात आले की, बरेच दिवसात कपाट आवरलेले नाही. बाई कामाला येईपर्यंत ते आवरून घेतले तर बरे होईल. म्हणून मी मोर्चा बेडरूमकडे वळविला. माझे कपाट, कपडे, पर्सेस, ड्रेसेस आणि इतरही बऱ्याच गोष्टींनी ते भरून गेलेले होते आणि जागा न पुरल्याने मी यांच्याही कपाटाचा थोडा ताबा घेतला होता. नवीन आणलेले, काही शिवायचे राहिलेले ड्रेसेस, नवीन साड्या नीट लावून ठेवताना मला ते घेतानाचा आनंद आठवत होता. तेवढ्यात कपाटाच्या तळाशी एका मोठ्या पिशवीत काही जुने अल्बम दिसले. ती पिशवी काढून मी पलंगावर बसकण मारली, अल्बम बाहेर काढून उघडले आणि काय सांगू, मला जणू काही खजिनाच सापडला… आठवणींचा!
25 वर्षे होऊन गेली असली तरी लग्नाचा अल्बम बघताना मी जुन्या आठवणीनी मोहरून गेले, त्यांत अगदी रमून गेले. त्यात सुंदर दिसणारी माझी आई आज हयात नव्हती. तिच्या आठवणीने माझ्या डोळ्यात पाणी आले. सासू सासरे, नणंद, इतर नातेवाईक सुद्धा किती वेगळे दिसत होते, त्यावेळी. 25 वर्षांचा काळ लोटला होता. आठवणी दाटत होत्या. मनात विचारांनी गर्दी केली होती. एकेक फोटो बघताना, त्यातील प्रत्येक व्यक्तीशी मी जणू काही बोलत होते. आपण कधी तरी अगदी छान, चवळीच्या शेंगेसारख्या सडसडीतही होतो, हे पाहून आताही एक छान गिरकी घ्यावीशी वाटली मला. लग्नाचा अल्बम झाला बघून, तो पुढे सगळे सणवार, पियूचा जन्म, मग तिचे लहानपण या फोटोंत तर मी इतकी वेगळी झाले की पियूचा फोनसुद्धा मला ऐकू आला नाही. माझ्या डोहाळे जेवणाचे, पियूच्या बारशाचे, नंतर तिच्या वाढदिवसांचे, सासूसासऱ्यांच्या एकसष्टी कार्यक्रमाचे, नणंदेच्या लग्नाचे, काही ट्रीपचे फोटो होते त्यात. घरातील जुने फोटो पुन्हा पुन्हा पाहताना त्या साऱ्या फोटोतील माणसे जणु काही मला आज पुन्हा नव्याने भेटली. किती तरी फोटोंवर मी प्रेमाने हात फिरविला, काही फोटो अगदी हृदयाशी धरले. या जुन्या फोटोंची हीच गंमत आहे. नाही? नव्याने माणसे भेटण्याची.
आताच्या काळात हे जरा आऊट डेटेडच वाटले. कारण व्हिडिओ शूटिंग, मोबाईलवरचे पटकन काढलेले फोटो, पी.सी.वर डाऊनलोड केलेले असंख्य फोटो, अगदी छोट्या छोट्या गोष्टींची सेलिब्रेशन करून लगेच व्हॉट्सऍपवर त्याची पोस्ट टाकण्याची घाई, याचा जमाना आहे आता अल्बम करणं आणि ते सांभाळून कपाटात ठेवणं म्हणजे जागा अडवणं वाटेल कुणाला.
पण खरं सांगू, अल्बममधील फोटो पाहण्यात जी मजा आहे ती मोबाईलच्या फोटोत नक्कीच नाही. ते फोटो जास्त झाले की ते आपण डिलीटही करतो. पण अल्बम सांभाळून ठेवतो. कारण त्यात आपले जिवलग असतात. त्यांच्या मधुर आठवणी, त्यांचे प्रेम असते. शेवटी माणसे भेटणं आणि त्यांच्याशी संवाद साधणं म्हतव्वाचं मग ती फोटोत असली म्हणून काय झालं… ती सुद्धा आपल्याशी बोलतातच की…
– आरती मोने