Thursday, December 11, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

पोषण अभियान: बालकांचा आहार; वय-एक वर्ष ते दोन वर्ष

by प्रभात वृत्तसेवा
October 1, 2019
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पहिले वर्ष हा बाळाच्या वाढीचा महत्त्वाचा काळ असतो. या काळात बाळाच्या शरीराची व विशेषतः मेंदूची झपाट्याने वाढ होत असते. बाळ एक वर्षाचे पूर्ण होईपर्यंत साधारणपणे बाळाचे वजन जन्मावेळेसच्या वजनाच्या तिप्पट होते. उदा. जन्मावेळी बाळाचे वजन तीन किलो असेल तर पहिल्या वाढदिवसापर्यंत ते नऊ किलोच्या आसपास भरते. (म्हणजेच पहिल्या वर्षात बाळाचे वजन पाच ते सहा किलोने वाढते.)

या प्रमाणात वजन वाढले तर बाळाचा आहार योग्य प्रकारे चालला आहे असे लक्षात येईल. पुरेशा प्रमाणात वजन वाढले नाही तर बाळाला वरचे अन्न अपुरे पडत आहे किंवा ते योग्य प्रकारे बनवले जात नाही असे समजावे. बाळाचे वजन जर जास्त वाढले तर बाळाला चुकीचे अन्नपदार्थ दिले जात आहेत किंवा प्रमाणापेक्षा जास्त आहार दिला जात आहे असे असे समजावे. या दोन्ही बाबतीत वेळीच डॉक्‍टरांचा आणि आहारतज्ञांचा सल्ला घ्यावा.

एक वर्षानंतर मात्र बाळाची वाढ काहीशी मंदावते. एक ते दोन वर्षे या पुढील एक वर्षाच्या काळात बाळाचे वजन फक्‍त दोन ते तीन किलोनेच वाढते. लहानपणी गुटगुटीत आणि गुबगुबीत दिसणारी बाळे जराशी बारीक दिसायला लागतात! पण हे सर्वसामान्य आहे. जसे बाळ एक वर्षाचे होते तसे ते हळूहळू घरातील इतरांसाठी केलेले सर्व पदार्थ खाऊ शकते. काही बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागते. एक ते दोन वर्षे वयाच्या काळात बाळाच्या आहाराची काय काय काळजी घ्यायची ते आता पाहू.

बाळाला सगळ्या वेगवेगळ्या चवी आणि पदार्थांचा, भाज्या – फळांचा आस्वाद घेऊ द्या. बर्याच घरांमध्ये बाळ वर्षाचे झाले तरी त्याला फारशी भाज्या – फळे देण्यात येत नाहीत. लहानपणी बाळांचे खाण्याचे जे ठराविक पदार्थ असतात, तेच दिले जातात. उदा. सकाळी दूध, दुपारी वरण-भात, रात्री परत दूध-पोळी किंवा वरण-पोळी. या आहारातून बाळाला पुरेशी जीवनसत्वे, खनिजद्रव्ये मिळणार नाहीत. रोज तेच तेच जेवण देणे टाळा. आहारात विविधता ठेवा. बाळाच्या दररोजच्या आहारात खालील पाच प्रमुख अन्नप्रकारांचा समावेश हवा.

1. धान्ये व कंदमुळे – जेवणात रोज पोळी एके पोळी न देता बाळाला कधी भाकरी, कधी मिश्र धान्यांच्या पीठाचे थालिपीठ, नाचणीचे घावन असे वेगवेगळे पदार्थ द्यावे. एका वेळेच्या जेवणात तांदळाचा किंवा वरईचा भात, इडली, डोसा, रताळे किंवा शिजवलेला बटाटा देता येईल. लक्षात ठेवा, बटाटा हा भाजी प्रकारात मोडत नाही! त्यामुळे बटाट्याचा पराठा किंवा पोळीबरोबर बटाट्याची भाजी देणे टाळा.

2. भाज्या व फळे – एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर बाळाला सर्व भाज्या व सर्व फळे देता येतात. दिवसभरात किमान एक वाटी भाजी आणि एक संपूर्ण फळ बाळाच्या पोटात जायला हवे. ते दोन वेगवेगळ्या वेळी विभागून देता येईल. फळे व भाज्यांचा रस (ज्यूस) करून देणे टाळावे. काळे मनुके, खारीक, सुके अंजीर, जरदाळू यांचाही आहारात समावेश करावा.

3.डाळी, कडधान्ये व मांसाहारी पदार्थ – प्रथिनांसाठी हे पदार्थ महत्वाचे आहेत. बाळाला वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी व कडधान्ये मऊ शिजवून द्यावीत. मांसाहारींनी एक वर्षानंतर हळूहळू बाळाला अंड्याचा पांढरा भाग आणि मऊ शिजवलेला मासा किंवा चिकनचे दोन-तीन तुकडे द्यायला हरकत नाही. सुरुवातीला थोड्या प्रमाणात देऊन हे पदार्थ चांगले पचतात ना याची खात्री करावी. चांगल्या प्रकारचे सिक्‍ग्ध पदार्थ व प्रथिनांसाठी बाळांना दररोज थोडे काजू, बदाम, अक्रोड, शेंगदाणेही द्यावे.

4. दूध व दुधाचे पदार्थ – शाकाहारींच्या आहारात दूध हा महत्त्वाचा घटक आहे. रोज थोड्या प्रमाणात (प्रत्येकी एक कपभर) दूध व दह्याचा आहारात समावेश करावा. दही ताजे व घरी लावलेले असावे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा पनीर, चीज द्यायलाही हरकत नाही.

5. पाणी व द्रवपदार्थ – बरीच बाळे पाणी प्यायला का कू करतात. एक ते दोन वर्षे वयाच्या बाळांनी दिवसभरात साधारण आठशे मि.ली. ते एक लिटर पाणी व द्रवपदार्थ आहारात घेतले पाहिजेत. यासाठी आहारात ताक, नारळपाणी, सूप्स यांचा समावेश करावा. जेवणाआधी हे द्रवपदार्थ देणे टाळावे. यामुळे आधीच पोट भरते आणि बाळे खायला कुरकुर करतात. याउलट जेवणानंतर पाणी प्यायला देताना पाण्यात थोडे लिंबू पिळावे (3-4 थेंब). यामुळे क जीवनसत्व पोटात जाऊन आहारातील लोहाचे शोषण होण्यास मदत होते.

6. बाळांच्या पोटाचा आकार लहान असतो. त्यामुळे एकावेळेला बाळे थोडेच खातात. मग हे थोडेच अन्न पोषकद्रव्यांनी परिपूर्ण असायला हवे! बाळाच्या आहारात विकतचे, गोडाचे व तळलेले पदार्थ टाळा. खूप मसालेदार, तिखट आणि खारट पदार्थही बाळाला देऊ नका.

7. बाळाला एखादी भाजी आवडली नाही तर पुन्हा थोड्या दिवसांनी देऊन बघा किंवा त्या भाजीचे सूप/पराठा देऊन बघा. त्या भाजीचे महत्व सांगा. एखादे गमतीदार उदाहरण द्या. उदा. गाजर खाल्ले की डोळे छान होतात! पालकाची हिरवीगार भाजी खाल्ली की रक्‍त लालेलाल होते! पोळीबरोबर जॅम, सॉस असे पदार्थ देणे कटाक्षाने टाळा.

8. खाण्याविषयीच्या आवडी-निवडी लहान वयातच तयार होतात. आणि त्याला खतपाणी घातले तर बाळे मोठी झाल्यानंतरदेखील काही विशिष्ट पदार्थ खाणे टाळतात किंवा अतिप्रमाणात खातात. याचे आरोग्यावर दूरगामी परिणाम होतात. उदा. काही बाळांना दूध खूप आवडते. अशी बाळे मग सारखेच दूध मागतात किंवा दूध-पोळी, दूध-भात खातात. पण दिवसभरात चारशे मिली पेक्षा जास्त दूध बाळाला देणे चांगले नाही.

यामुळे लोहाची कमतरता व रक्‍तक्षय होण्याची शक्‍यता असते. याऊलट काही बाळांना दूध आजिबात आवडत नाही. अशी बाळे शाकाहारी असतील आणि आहाराचे योग्य व्यवस्थापन केले नाही तर अशा बाळांमध्ये कॅल्शियम, जीवनसत्व ब- व जीवनसत्व ड, प्रथिने यांची कमतरता भासू शकते.

9. मधल्या वेळेच्या खाण्यासाठी बऱ्याचदा मुलांना बिस्कीटे, केक, चिप्स, कुरकुरे, चिवडा, बाकरवडी असे पदार्थ दिले जातात. हे टाळा. यावेळेला देण्यासाठी फळे, सुकामेवा, उकडलेले अंडे, चीजचा तुकडा, शेंगदाण्याचा लाडू हे पोषक पर्याय आहेत.

10. बाळांसाठी खाण्यापिण्याची एक दिनचर्या ठेवा, ठराविक वेळेला खायला द्या (आजारपणात हा दिनक्रम बदलू शकतो.) यामुळे बाळाच्या शरीराला एक प्रकारची शिस्त लागेल, सारखे चरणे टळेल, ठराविक वेळेला भूक लागेल आणि बाळाचे वजनही योग्य प्रकारे वाढेल. दोन जेवणांमध्ये कमीतकमी ते तासांचे अंतर ठेवा. या काळात काहीही खायला देऊ नका. जेवणाच्या वेळेच्या आधी खाल्लेले एखादे बिस्कीट किंवा चॉकलेटदेखील बाळाची भूक मारू शकते हे लक्षात ठेवा.

11. बाळाला एका जागी बसून खाण्याची सवय लावा. घरभर त्याच्या मागे पळत भरवू नका. जेवताना टी.व्ही., मोबाईल पूर्णपणे टाळा. या वेळात बाळाशी गप्पा मारून, बाळाला गोष्टी सांगून जेवणाची वेळ आनंददायी करा. यामुळे रडरड, चिडचिड न होता जेवण कधी संपले ते कळणार देखील नाही.

12. साधारण दीड वर्षानंतर मुले स्वतःच्या हाताने खाण्याचा प्रयत्न करतात. प्रथम बोटांच्या चिमटीत पदार्थ पकडून खायला शिकतात आणि मग चमच्याचा वापर करायचा प्रयत्न करतात. हे करताना बऱ्याचदा सांड-लवंड होते आणि आयांची चिडचिड होते! पण यातून बाळे शिकत असतात. स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे बाळांना स्वतःच्या हाताने खायला प्रोत्साहन द्या. त्यातल्या त्यात हाताने खायला सोपे आणि फारशी सांडलवंड होणार नाही असे पदार्थ

उदा. पोळी/भाकरी/थालिपीठ/पराठा/डोसा/धिरडी/इडली/फळे यांचे लहान लहान तुकडे करून द्या. चमच्याने खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाळांना एका छोट्या वाटीत डाळिंबाचे दाणे, चुरमुरे, ज्वारीच्या किंवा साळीच्या लाह्या देता येतील. चमचा देखील जरा छोट्या आकाराचा आणि थोडा खोलगट असावा. बाळाबरोबर तुम्ही देखील वाटी चमचा घेऊन खायला बसा. तुमचे बघून बाळ लवकरच शिकेल. बऱ्याचदा बाळाला आधी खायला घालून मग बाकीचे जेवायला बसतात. पण सर्वांच्या जेवायच्या वेळेतच बाळालाही जेवायला बसवा.

13. आपल्या बाळाची दुसऱ्या बाळांशी तुलना करू नका. प्रत्येक बाळाची भूक, खाण्याचे प्रमाण वेगवेगळे असते. त्यामुळे त्या बाळाने पोळी पूर्ण खाल्ली आणि तू कशी खात नाही असे प्रश्‍न विचारू नका. बाळाने खाण्यास नकार दिल्यास आग्रह आणि जबरदस्ती करू नका.

14.आपले घर म्हणजे हॉटेल नाही याची जाणीव ठेवा आणि ती मुलांनाही करून द्या. एखाद्या दिवशी घरी बाळाच्या नावडीचा पदार्थ असेल, तर त्याच्या आवडीचा दुसरा पदार्थ बनवू नका किंवा बाळ मागेल ते करून देऊ नका. जे सगळ्यांसाठी केले आहे ते बाळालाही खायला द्या. कदाचित बाळ थोडे कमी खाईल. एखाद्या दिवशी बाळाने कमी खाल्ले तरी हरकत नाही. भूक लागल्यावर बाळ आपणहून येऊन जे असेल ते खाईल.

15. वेळोवेळी बाळांचे कौतुक करा. जेवण संपवले, भाजी खाल्ली, न सांडता खाल्ले, आपल्या हाताने खाल्ले, नीट चावून चावून खाल्ले, खाताना तोंडाचा आवाज नाही केला की बाळाला शाबासकी द्या. यामुळे बाळांना या सगळ्या चांगल्या सवयी अंगीकारण्याचा नवा उत्साह येईल आणि आपोआपच त्यांचा आहार व आरोग्य सुधारायला मदत होईल.

16.बऱ्याचदा वाढदिवस, सण-समारंभ, पार्ट्या अशावेळेला बाहेरचे खाणे/गोड खाणे/तळलेले खाणे टाळता येत नाही. शक्‍यतो वर्षे पूर्ण होईपर्यंत बाळाला असे पदार्थ देणे टाळा. बाळाला घरून खायला घालून न्या किंवा बाळाचा डबा घेऊन जा. वर्षांनंतर कधीतरी थोड्या प्रमाणात असे पदार्थ खायला हरकत नाही. पण अशा पदार्थांचे नियमित सेवन बाळ व पालक दोघांसाठीही वाईटच!

17.बरेच पालक डॉक्‍टरांकडे आणि आहारतज्ञांकडे बाळाला भूक वाढण्याचे टॉनिक देण्याचा किंवा सप्लीमेंट्‌स देण्याचा आग्रह करतात. पण भूक वाढण्यासाठी टॉनिकची नाही तर बाळाने भरपूर खेळण्याची (आणि टी.व्ही./मोबाईल समोर बसून न राहण्याची!) गरज आहे. त्याचबरोबर भूकेच्या वेळी योग्य प्रकारचा पौष्टिक आहार घेतल्यास बाळाला कोणत्याही सप्लिमेंट्‌सचीदेखील आवश्‍यकता भासणार नाही.

– डॉ. तेजस प्रज्ञा यशवंत

Tags: aarogya jagar 2019
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar