पुण्यामध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि आपल्या देशात करोना या रोगाचा प्रादुर्भाव झाला. बघता बघता या घटनेला जवळपास महिना उलटून गेला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणि त्यापाठोपाठ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला मात्र ताबडतोब घेतलेल्या या निर्णयामुळे संपूर्ण देशच जागेवर थांबला.
आपल्या देशात असलेले उद्योगधंदे, मार्केट, दळणवळणाची साधने या सर्व गोष्टी अचानक थांबवल्यामुळे अनेकांची गैरसोय झाली. काही परप्रांतीय काम करणारे, हातावर पोट असणारे असे अनेक लोक आहे त्याच स्थितीमध्ये थांबले गेले. यामुळे कोणालाही स्थलांतर करता येईना. अनेकांचे जेवणाचे, खाण्याचे हाल होऊ लागले. घरांमध्ये पुरेपूर अन्न नसल्याने उपासमारीची वेळ अनेकांवर आली आहे.
शासन त्यांच्या परीने प्रयत्न करतही आहे, पण आता गरीब लोकांबरोबर म्हणजेच पिवळे रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड धारकांना मदत तर करावी लागेलच पण प्रथम या लोकांबरोबर अनेक अडकलेल्या लोकांसाठीही मदत करावी लागेल. ती करत असताना शासनाने कार्ड किंवा गरीब-श्रीमंत हे न बघता अडकलेल्या लोकांना त्यांचे आधार कार्ड पाहून किंवा आयडी प्रुफ पाहून ताबडतोब मदत करायला हवी आहे. तेथे तो गरीब आहे किंवा ती व्यक्ती श्रीमंत आहे, मध्यम आहे अशा कोणत्याही गटामध्ये न अडकता ज्या ज्या ठिकाणी शासनाने 100 टक्के लॉकडाऊन केले आहे, रेड एरिया आहे अशा ठिकाणी ताबडतोब सरसकट मदत करायला हवी.
मग ती जेवणाच्या स्वरूपात असेल किंवा अन्नधान्याच्या स्वरूपात असेल पण अशा अडकलेल्या लोकांना मदत होणे ही सध्या फार मोठी गरज वाटते. हे संकट अशा ठिकाणी निर्माण झाले आहे की तेथे हाय क्लास फॅमिली, मध्यमवर्ग, गरीब असा भेदभाव न होता हा रोग कोणालाही होत आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेणे ही खरी गरज आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यातला माणूस कोठेही जाऊ शकत नाही. काही ठिकाणी तर रस्त्याने जाणारे ड्रायव्हर मंडळीदेखील अडकले आहेत.
कॉलेजमध्ये असणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी देखील अडकले आहेत तर काही ठिकाणी कामगार वर्ग आहे त्याच स्थितीमध्ये थांबला आहे. अशावेळी या लोकांचा विचार होणं खूप महत्त्वाचे आहे. काही ठिकाणी तालुक्यांच्या सीमा देखील बंद केल्या आहेत. तेव्हा त्या तालुक्यांमध्ये अशा लोकांना मदत झाली पाहिजे. त्यांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे, असं केल्यास परिस्थिती नियंत्रणात तर राहीलच पण त्या लोकांना आपुलकी वाटेल.
आपल्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलेल आणि हेच मोठे शासनाचे, आपल्या सगळ्यांचे यश असेल. यासाठी शासनाकडून भविष्यात अशी वेगळी यंत्रणा निर्माण झाल्यास जेव्हा जेव्हा आपल्याकडे अशी परिस्थिती उद्भवेल तेव्हा तेव्हा ही यंत्रणा कार्यरत राहील. याच बरोबर शासनाचे विविध विभाग जसे प्रशासन, आरोग्य, पोलीस, स्थानिक प्रशासन, ट्रान्सपोर्ट, अन्नधान्य वितरण एकमेकांना जोडले गेले पाहिजेत जेणेकरून अशावेळी सर्वच विभागांनी काळजी घेऊन विभागा विभागामध्ये समन्वय साधला जाईल आणि परिस्थितीवर मात केली जाईल. जेव्हा असे होईल तेव्हा आपण करोनाच काय पण कोणत्याही संकटाला सशक्तपणे तोंड देऊ.
– नारायण ढेबे