लहान मुले विशेषत: मुली पौगंडावस्थेत प्रवेश करतात, तेव्हा अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. अशा बदलांना सामोरे जाताना मुला-मुलींपेक्षा पालकांचीच सर्वाधिक कसोटी लागत असते. म्हणून काही गोष्टी अगदी सोडून न देता, तिकडे विशेष लक्ष दिले जाणे गरजेचे असते.
माने काका व काकू एकदा स्वतःहून भेटायला आले. आल्यावर बसल्याबरोबर माने काकूंना खूप रडू आले म्हणून त्यांना आधी शांत होऊ दिले व नंतर बोलण्यास सुरुवात केली. प्रथम दोघांचीही ओळख करून घेतली. माने काका एका कंपनीमध्ये बऱ्यापैकी मोठ्या पदावर गेली अनेक वर्षे काम करत होते. तर काकू गृहिणीच होत्या. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं होती. पैकी मुलगी मोठी असून ती आता नववीमध्ये शिकत होती. आज ते मीरा म्हणजे त्यांच्या मुलीबद्दलच बोलायला आले होते.
मीराबद्दल बोलताना काकूंना पुन्हा रडू आले. “माझी मीरा खूप शहाणी मुलगी आहे हो. अभ्यासात, खेळात, डान्समध्ये सगळ्यात हुशार आणि नेहमी चांगला नंबर मिळवणारी… पण गेल्या वर्षीपासून काय झालंय समजतच नाही. विचित्र वागायला लागलीये. सारखी चिडचिड करते.
आजपर्यंत कधीच तिने उलट उत्तर दिले नव्हते. पण आता सारखी चिडते. उलट उत्तर देते. मलाच नाही बाबांनाही उलट बोलते. तिच्या धाकट्या भावाशी तर रोज सतत भांडते. काय झालंय कळत नाही. मागच्या वर्षी तिला एक नवीन मैत्रिण मिळालीय स्वरा; तिच्याबरोबर राहायला लागल्यापासून तिचं हे असलं विचित्र वागणं सुरू झालंय. आजकाल तिचा निम्मा वेळ आरसा आणि हेअर स्टाईल यातच जातो आणि उरलेला वेळ त्या स्वराशी बोलण्यात.
तिला खूप समजावलं, रागावलो, परवा तर दोन फटके पण दिले. पण तिच्यावर काही परिणाम झाला नाही. उलट माझ्यावर चिडून आख्खा दिवस न जेवता चिडून बसली होती. काय करावं काही समजत नाही. ती त्या स्वराशी मैत्री तोडायलाही तयार नाही. काय करू आम्ही. तुम्ही बोलता का तिच्याशी?’
काकूंना रडू आवरणं खूप अवघड जात होतं. यावेळी काकांनी त्यांना शांत केले. त्यांच्याशी बोलतानाच मीराची समस्या लक्षात आली होती. त्यांना शांत झाल्यावर मीराच्या समस्येची संपूर्ण माहिती दिली.
मीराची समस्या फारशी गंभीर नव्हती. ती “वयात’ आल्यामुळे तिच्या या वर्तन समस्या दिसत होत्या हे त्यांच्याबरोबर झालेल्या चर्चेतून तसेच इतर घेतलेल्या माहितीतून लक्षात आले. त्यामुळे पुढच्या सत्रात तिला भेटीसाठी घेऊन येण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे तिची आई तिला घेऊन आली.
तिला समुपदेशनासाठी घेऊन आल्यामुळे ती आईवर खूप चिडली होती. सुरुवातीला तिने आत येण्यासही विरोध केला. पण नंतर आत येऊन बसली. राग आल्यामुळे अर्थातच सुरुवातीची 1-2 सत्र ती फारशी बोलली नाही. नंतर हळूहळू ओळख झाल्यावर, विश्वास वाटायला लागल्यावर तिने बोलायला लागली.
तिच्यामध्ये झालेले बदल तिच्या मनात येणारे विचार, तिने अगदी मोकळेपणाने सांगितले. सारखे आरशासमोर उभे रहावेसे वाटणे, नटावे असे वाटणे, छान कपडे घालावे, मज्जा करावी, मुलांशी बोलावेसे वाटणे, अभ्यासाकडे दुर्लक्ष, नवनवीन गोष्टी करून पाहणे, आपल्याला कोणी बोलल्यास खूप राग येणे ही सारी लक्षणे वयात येण्याची असतात.
मीरालाही नेमकं हेच सगळं वाटत होतं आणि त्यामुळे ती तसं वागत होती. परंतु आपल्या वागण्यात झालेल्या या बदलांमागील अर्थ तिला समजत नव्हता. पुढच्या काही सत्रात तिला या सर्वांचा शात्रीय दृष्टीकोनातून अर्थ समजावून सांगितला.
त्यामागील शास्त्रीय कारणे समजावून सांगितली व यावरील उपाययोजनेबद्दल माहिती दिली. या सर्व
चर्चेत मीराने उत्तम सहभाग घेतला. तिच्या शंका अगदी मोकळेपणाने विचारल्या. मीराच्या आईला देखील याची कल्पना देण्यात आली. तिच्याबरोबर वागताना काय बदल करावे. तिच्यातल्या बदलांचा स्वीकार कसा करावा? हे बदल स्वीकारायला तिला कशी मदत करावी याबाबत त्यांनाही मार्गदर्शन केले. आईनेही यात चांगले सहकार्य केल्यामुळे मीराच्या समस्या हळूहळू कमी होत गेल्या. आणि तिचे व्यक्तिमत्त्व छान खुलू लागले.
(केसमधील नाव बदलले आहे.)