पुणे – उत्तम व्यक्तिमत्त्व आणि कार्यक्षमता, कर्तबगारी यासाठी सुदृढ आणि सशक्त शरीराची नितांत गरज असते. शरीराने अशक्त असणाऱ्यांनी आपली बॉडी सुधारण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असायला हवे, ही इच्छा असणारे अनेकजण जाहिरातीवरून विविध टॉनिक्स घेणे, च्यवनप्राश घेणे, दूध, अंडी, खजूर खाणे, जिममध्ये जाऊन भरपूर व्यायाम करणे यासारखे उपचार स्वत:च्या मनाने करत असतात.
अनेक वेळा यामुळे पूर्ण उपयोग होत नाही. त्यामुळे काही दिवसांनी ते सोडून दिले जातात. वास्ताविक तब्येत अशक्त असण्याची प्रत्येक व्यक्तीतील कारणे वेगवेगळी असतात आणि जर तब्येत खरंच सुदृढ करायची असेल तर टॉनिकपेक्षाही शरीरातील हे बिघाड दुरुस्त करणे अत्यंत महत्त्वाचे असते.
अशक्तपणाची कारणे आनुवंशिकता, भूक कमी असणे, अपचन, पोटातील कृमी, आमांश, बद्धकोष्ठ, मूळव्याध, पित्तविकार, अपुरा आहार, आवडीनिवडी, अनियमित जेवण, वारंवार उपवास, अतिकष्ट, लिव्हर विकार, क्षयरोग, अतिव्यायाम, याचबरोबर नैराश्य, काळजी, चिंता, अतिविचार, अग्निमांद्य, धातुक्षय इ. कारणांमुळे तब्येत सुधारत नसते. त्यामुळेच तब्येत सुधारण्याचे उपचार करताना सखोल तपासणीने या कारणांचा शोध घेऊन ही कारणे बरी करावी लागतात.
याच दृष्टिकोनातून रुग्णाचे वय, वजन, व्यायाम, आहार स्वरूप, आहार वेळा, पचनशक्ती, लिव्हरची कार्यक्षमता, येणारा कामाचा ताण, होणारा प्रवास, मानसिक तणाव, टेन्शन, झोपेचे प्रमाण, व्यायामाचे स्वरूप, उष्णतेचे प्रमाण, महिलांमध्ये मासिक पाळी इत्यादी गोष्टींची वैद्यकीय तपासणी करावी लागते. कारणनिश्चिती झाल्यानंतर आयुर्वेदिक उपचार सुरू केले जातात.
आयुर्वेदातील शतावरी, अश्वगंधा, कौचा, श्वेतमुसळी, कुमारी, आवळा, द्राक्षा, ब्राम्ही, जटामांसी, सुवर्ण, रौप्य, माक्षिक, अभ्रक भस्म यापासून केलेली विविध औषधे कारणपरत्वे वापरली जातात. याच जोडीला अर्धशक्ती व्यायाम, सर्वांगाला तिळाच्या तेलाने मसाज, भरपूर झोप आणि कोणतीही चिंता न करता बिनधास्त राहण्याचा अवलंब करणे महत्त्वाचे असते.
याचवेळी अतिकष्ट, धावपळ, जागरण टाळून आहारामध्ये दूध, तूप, खजूर, डिंक, ड्रायफूटस्, उडीद, मांसाहार, चिकू, केळी इत्यादी फळे, गोड पदार्थ यांचा नियमित वापर करणेही फायद्याचे आहे. म्हणूनच तब्येत सुधारण्याची इच्छा असणाऱ्यांनी अंदाजे टॉनिक न घेता आयुर्वेदिक वैद्यांकडून वरीलप्रमाणे उपचार करून घ्यावेत.