चिंचेचा स्वाद आंबट, गोड व थोडासा तुरट असतो. पिकलेल्या चिंचेचा उपयोग आमटी-भाजीला आंबटपणा व स्वादिष्ट बनविण्यासाठी होतो.
चिंच पाण्यात भिजत घालून चांगली कुस्करून घ्यावी, नंतर ते पाणी गाळून प्याल्यास पित्तामुळे होणारी उलटी बंद होते. या पाण्यात साखर घालून प्यायले असता उष्माघातातही फायदा होतो. एक किलोभर चिंच पाण्यात भिजवत ठेवावी. नंतर थोडी कुस्करून ते पाणी अर्धे होईपर्यंत उकळावे. त्यात साखर घालून त्याचे सरबत तयार करावे. रात्री हे सरबत घेतल्यास पित्तविकार दूर होतात.
वरील प्रकारे सरबत करून त्यात लवंग, मिरपूड, कापूर घालून घेतल्याने अरुची दूर होते.
चिंचेच्या पाण्यात मीठ घालून प्यायल्याने शौचास साफ होते. चिंचेच्या पानांना वाटावे व त्यात सैंधव घालून हे मिश्रण गरम करावे. संधिवात, सांधे आखडणे यांच्या त्रासात या मिश्रणाचा लेप सहन होईल एवढे गरम करून लावावा.
मुरगळणे, मुका मार, अस्थिभंग झाला असता चिंच व आवळ्याची पाने वाटून त्याचा लेप लावावा.
डोळे सुजल्यास चिंचेच्या पानांना वाफवून त्याचे पोटीस करून डोळ्यांवर बांधावे.
चिंचेच्या पानांचा रस काढून तो साखरेतून खावा. संग्रहणी दूर होते. चिंचेची पाने तांदळाच्या धुवणात वाटून प्यायल्याने अतिसारामध्ये फायदा होतो.
मूळव्याधीमध्ये चिंचेची फुले वाटून त्याचा रस घ्यावा किंवा चिंचेच्या फुलांची भाजी करून त्यात दही, धने, सुंठ व डाळिंबाचा रस घालून जेवणाच्या वेळी खावी.
चिंचेची फुले व चिंचोक्यातील गर बारीक वाटून ते मिश्रण शरीरभर चोळावे. घाम येणे, शरीरदुर्गंधीत होणे या तक्रारी दूर होतात.