[[{“value”:”
Newborn Sleep: घरात नवजात बाळ आलं की सगळं आयुष्य बदलतं. विशेषतः आई-वडिलांची झोप पूर्णपणे बिघडते. बाळ दिवसा जास्त झोपतं आणि रात्री वारंवार जागं होतं, त्यामुळे अनेक पालक चिंतेत पडतात. “आपलं बाळ नीट झोपत नाही का?” असा प्रश्न त्यांना पडतो. मात्र तज्ज्ञ सांगतात की हे पूर्णपणे नैसर्गिक आहे.
बालरोग तज्ज्ञ आणि अलीकडील संशोधनानुसार ० ते ३ महिन्यांच्या नवजात बाळांना दिवसात सरासरी १४ ते १७ तास झोपेची गरज असते. काही निरोगी बाळं १८ ते १९ तासही झोपू शकतात. मात्र ही झोप सलग नसते. बाळ साधारणपणे ३० मिनिटांपासून २-३ तासांपर्यंत झोपतं आणि मग भूक लागल्यावर पुन्हा जागं होतं. त्यामुळे रात्री बाळ वारंवार उठणं अगदी सामान्य मानलं जातं.
नवजात बाळाचं पोट खूप लहान असतं. त्यांना दर २ ते ३ तासांनी दूध किंवा आहाराची गरज असते. म्हणूनच ते मोठ्यांसारखी सलग ७-८ तासांची झोप घेऊ शकत नाहीत. आयुष्याच्या पहिल्या दोन महिन्यांत बाळांना दिवस आणि रात्रीचा फरक समजत नाही. त्यामुळे त्यांचा स्लीप सायकल अनियमित असतो. हे पाहून पालकांनी घाबरू नये, असं तज्ज्ञ सांगतात.
झोप ही बाळाच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाची असते. संशोधनानुसार झोपेच्या काळात बाळाच्या मेंदूची सर्वाधिक वाढ होते. याच वेळी शरीरात ग्रोथ हार्मोन तयार होतात. हे हार्मोन शरीरातील पेशींची दुरुस्ती करतात आणि शारीरिक विकासाला मदत करतात. झोपेमध्येच बाळाचा मेंदू दिवसभरातील अनुभव आणि माहिती व्यवस्थित साठवतो. त्यामुळे पुरेशी झोप ही बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी आवश्यक आहे.
पालकांनी काही साधे उपाय अवलंबले तर बाळाला दिवस-रात्रीचा फरक हळूहळू समजू शकतो. दिवसा घरात हलकी हालचाल, नैसर्गिक प्रकाश आणि सामान्य वातावरण ठेवा. मात्र रात्री शांतता, मंद प्रकाश आणि कमी आवाज ठेवा. यामुळे बाळाला रात्री झोपायची वेळ आहे हे ओळखायला मदत होते.
साधारणपणे ४ ते ६ महिन्यांच्या दरम्यान अनेक बाळं रात्री सलग ६ ते ८ तास झोपायला सुरुवात करतात. प्रत्येक बाळ वेगळं असतं, त्यामुळे झोपेचा पॅटर्न थोडा बदलू शकतो. तुलना करण्यापेक्षा आपल्या बाळाच्या गरजा समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे.
तरीही काही लक्षणे गंभीर असू शकतात. जर बाळ दूध पिण्यासाठीही जागं होत नसेल, खूपच सुस्त दिसत असेल किंवा अचानक झोपेच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल झाला असेल, तर तात्काळ बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
एकूणच, नवजात बाळाची तुटक आणि अनियमित झोप ही समस्या नसून त्याच्या वाढीचा नैसर्गिक भाग आहे. योग्य माहिती आणि संयम ठेवल्यास पालकांची चिंता कमी होऊ शकते आणि बाळाचं संगोपन अधिक आनंददायी होऊ शकतं.
“}]]
