सद्यस्थितीत राजकीय पार्श्वभूमीवर मराठी भाषा किती समृद्ध आहे, ते बघावयास मिळते आहे. अनेक रूढार्थाने वापरण्यात येत असलेल्या म्हणी, वाकप्रचार एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी वापरली जाणारी विशेषणं हे भाषेचे लालित्य तर दाखवतातच पण, एक छुपा आशावाद दर्शवणारा शब्द रूढार्थाने येतो तो म्हणजे सकारात्मकता. काय असते सकारात्मकता?
एका शेतात दोन बिया पडल्या होत्या त्यातील एक बी म्हणाली मला माझे छानशा रोपट्यात रूपांतर करायचे आहे मग माझ्या फांद्या सर्वत्र पसरतील त्याची फळे-फुले सर्वांना उपयोगी पडतील तर दुसरी म्हणाली मला नाही आवडणार जमिनीत पुरून घ्यायला. तिथे अंधार व जीवजंतू असतील, माझ्यापासून मिळालेल्या फळाफुलांचा मला काय उपयोग होणार? मी हे का सहन करू? ती जमिनीवर तशीच पडून राहिली सकाळी पक्षांचा एक थवा आला अन् त्या बी ला खावून टाकले. त्या बी ने असा नकारात्मक विचार केला नसता तर तिचे प्राण वाचले असते ना…! आपली मनोवृत्ती सतत सकारात्मक ठेवणे गरजेचे आहे हाच यशस्वीतेचा पाया ठरेल.
“मला शक्य आहे’, असा स्वतःशीच स्वतःचा संवाद ठेवला तर यश मिळेलच पण त्यासाठी एक स्वयं शिस्तबध्दता हवी. घाईने निर्णय घेणे टाळायला हवे स्वार्थी न बनता दुसऱ्यालाही आनंद देता यायला हवा त्यासाठी कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत आनंदी राहणे अशी मनोवृत्ती काढण्यास मदतच होईल. आपल्या दैनंदिन जीवनातही आपण बऱ्याच नकारात्मक गोष्टी बोलत असतो. मला हे जमणार नाही, मला खूप कर्जाचा बोजा आहे अशी विधाने करताना त्यातील सकारात्मकताही बघायला हवी. घराच्या धुळीने माखलेल्या खिडक्या-दारे बघून आपण नाराज होतो पण त्यातला सकारात्मक भाव “अरे, मला घर आहे, ते जपायला हवे’ या मनोवृत्तीत बदलतो.
अशा प्रत्येक गोष्टीत सकारात्मक विचार मनोवृत्ती आनंदी ठेवण्यास मदत करेल. मी पुन्हा येईन या विधानात देखील अशीच सकारात्मकता आहे असे तुम्हांला ही वाटतेच ना..! पण अवतीभवती नकारात्मक स्पंदने असताना आपले मन ही कुठेतरी विचार करणं थांबवत असावं अन त्या लहरिसोबत आपण ही आपली मनोवृत्ती बदलत जातो इतकेच यासाठी मला काय करायचे नाही हे एकदा ठरवले की काय करणार मी अशी सकारात्मकता येतेच.
योग्य प्रमाणात पडणारे मीठ जसे अन्नाला चव आणते तसेच योग्य प्रमाणातील भावनेने जीवनात स्वास्थ्य निर्माण होते. जे मनाला पटत नाही ते स्वीकारुच नये त्यामुळे मनात गोंधळ होवून वृत्तीत कटुता निर्माण होते मनोवृत्ती ढासळते व नकारात्मक विचार मनाभोवती रुंजी घालतात स्वतःचे अस्तित्व नकळत धूसर होवू शकते. जे पेराल ते उगवेल या म्हणीप्रमाणे सकारात्मक विधाने यशाचा मार्ग मोकळा करतात.
शारीरिक व मानसिक पातळीवर चांगले तेच स्वीकारले तर होणारा मोबदला स्वतःला व समाजाला चांगलाच होईल वाईट विचार वाईटच कृत्य घडवतो तेव्हा मात्र त्यासाठी योग्य वेळेची गरज असतेच वाईटतही चांगले पाहण्याचा प्रयत्न अनेक शुभेच्छा व आशीर्वाद मिळवून देतात तीच आयुष्याची खरी शिदोरी त्यासाठी सकारात्मकता हवी, आपले विचार वृत्ती ठाम मूल्यावर्धित हवी. समर्थ रामदासांनी म्हटलेच आहे…
सामर्थ्य आहे चळवळीचे
जो जे करील तयांचे
– मधुरा धायगुडे