पुणे – नागराजासन हे एक दंडस्थितीतील आसन आहे. दोन्ही पायात अंतर घ्यावे. मग आपले दोन्ही हात कंबरेवर ठेवावेत. मग कंबरेतून थोडेसे झुकून तोंडाने दीर्घ श्वास घ्यावा. हा श्वास घेत असताना जोरात हा ऽ हा ऽ चा आवाज करत उजवा हात नागासारखा वळवळवत पुढे आणावा मग डावा हाताही दीर्घ श्वास घेत हाऽ हाऽचा आवाज करत नागासारखा वळवत उजव्या हाताशी डावा हात जोडावा.
दोन्ही हात जोडून हाताचे दोन्ही पंजे विस्तारीत करून बोटे नागाच्या फण्यासारखी काढावीत व डोक्यावर धरावीत. हात कोपरात वाकवून डोक्यावरती नागाच्या फणीसारखे धरताना दोन्ही टाचा उचलाव्यात. श्वासाचा आवाज करत नाकावाटे जोरजोरात प्रयत्नपूर्वक रेचक करावे. हे करत असताना कपालभाती सारखा श्वास सोडल्याचा आवाजही येईल. तो जणू नागाचा फुत्कार आहे अशाप्रकारे दंडस्थितीतील हास्यनागराजासन करता येते. यामुळे हातापायांचे स्नायू मजबूत होतात.
हास्यामुळे शरीरामध्ये आनंदलहरी निर्माण होतात. तसेच दंडांना, कोपरांना, हाताचे तळवे, बोटे, मनगट सर्व अवयवांना एकप्रकारचा व्यायाम मिळतो. टाचा वर उचलल्यामुळे पायाच्या बोटांवरही ताण येतो. त्यामुळे गुडघ्यांवर, पोटऱ्यांवर ताण येऊन व्यायाम मिळतो. या आसनामुळे मानसिक ताण दूर होऊन शरीराला आणि मनाला विश्रांती मिळते. हे आसन करायला सोपे आहे. तसेच सर्वजण करू शकतात.
आसन कालावधी 5 सेकंदापासून अगदी 45 सेकंदापर्यंत टिकवता येतो. मात्र, सरावाने कालावधी वाढवता येतो. ज्यावेळी टाचा उचलून आपण उभे रहातो. त्यावेळी पोटऱ्यांवर ताण येऊन ज्येष्ठांच्या पोटाऱ्यात गोळा येण्याची शक्यता असते. म्हणून ज्येष्ठांनी आसन टिकवताना काळजी घ्यावी. कोणी कोणी या आसनात जीभ बाहेर काढून फुत्कार सोडतात. त्यामुळे दंडस्थितीत सिंह मुद्रेचे फायदे मिळतात.
चेहऱ्यावरील ताणतणाव कमी होतो. स्नायूचे टोनिंग वाढते. त्वचा नितळ होण्यासाठी चेहऱ्यावर ताण घेऊन हास्य नागराजासन करतात. त्यामुळे डोळे, नाक, गाल यांनाही व्यायाम मिळतो. जसजसे वय वाढते तसतशी आपली त्वचा ओघळू लागते. या आसनामुळे चेहऱ्याच्या त्वचेलाही एकप्रकारचा मसाज होतो. चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याचा कालावधी लांबतो. मात्र नियमितपणे आसन करणे आवश्यक.