चंदन हे सुगंधी तसेच आयुर्वेदीयदृष्टीने अतिशय गुणकारी आहे. पिवळे आणि लाल असे चंदनाचे दोन प्रकार आहेत. रक्तिचंदन यामध्ये लालसर रंगाचे चंदनाचे लाकूड असते तर सुगंधी आणि थंडावा देणारे असे पिवळसर चंदन वृक्ष म्हैसूरजवळच्या जंगलात पाहायला मिळतात. चंदनाचे अनेक उपयोग आहेत. औषधी असे..
उष्णता कमी करण्यासाठी – हे सर्वात मोठे घरगुती औषध आहे. पुरातन काळापासून थंडाईसाठी तसेच उष्णतेच्या विकारावर याचा उपयोग केला जातो. अंगाची आग झाली असता अंगास चंदनाची उटी लावण्याची पद्धत आहे.
चंदनी सरबत – गरोदर स्त्रिया, लहान मुले, अशक्त व्यक्तींना झालेली उष्णता कमी होऊन प्रकृती बरी होण्यासाठी चंदनी सरबत देण्यची पद्धत आहे. चंदनाचा कीस अगदी बारीक असा 1 किलो चांगल्या उत्तम सुवासिक गुलाब पाण्यात भिजत टाकावा. 24 तास भिजल्यावर ते पाणी मंद अग्नीवर ठेवावे.
पाण्यात उकळी फुटली म्हणजे ते पाणी खाली उतरून गाळून त्यात 1 किलो खडीसाखर घालून त्याचा चांगला पाक करावा व बाटलीत भरून ठेवावा. हेच चंदनी सरबत होय. हे थंडाईसाठी सकाळ, संध्याकाळ दोन वेळेस 10 ग्रॅम घ्यावे, आराम वाटतो.
डोके दुखीवर- मोठ्या तापात झोप न येऊन डोके दुखत असेल तर कापूर, केशर आणि चंदन उगाळून लावल्याने मस्तक शांत होते व तापाची बाधा कमी होते.
आग व सुजेवर – शरीरावर कोठेही सूज आली असता तसेच शरीराची आग होत असेल तर चंदन उगाळून त्या जागी लावल्याने थोड्याच वेळात आग थांबते व सूज उतरते.
कोरड्या खरजेवर – उष्णतेपासून अंगावर कोरडी खरूज उठली असेल तर चांगले चंदन उगाळून स्नानापूर्वी अंगास लावावे. उन्हाळ्यात उष्णतेची बाधा न होण्यासाठी चंदनाची उटी लावतात.
पित्तज्वरावर -पित्तापासून आलेल्या तापात 10 ग्रॅम चंदनाचा अर्धा लिटर पाण्यात अष्टमांश उरवलेला काढा थोडी खडीसाखर घालून दिला असता पित्तज्वरातील पित्ताची उलटी थांबते व ताप हळूहळू उतरतो.
हृदय बलवर्धक – चंदन हृदय बलवर्धक आहे, 1 ग्रॅम उगाळलेल्या चंदनाचे गंध, चिमटीभर खडीसाखर थेंबभर मध घालून घेतल्याने हृदयास तकवा येतो.
रक्तदाब योग्य राखण्यासाठी – रोज अनाशेपोटी लालचंदनाचे खोड उगाळून त्याची पेस्ट कोमटसर पाण्यातून पोटात घेतली असता आपला रक्तदाब योग्य राखण्यास मदत होते. हाय आणि लो बीपी नियंत्रित करण्यासाठी चंदनाचे चूर्ण उपयुक्त आहे.
लघवी साफ होण्यासाठी – चंदन लघवी साफ होण्यासाठी देतात. लघवीची आग होत असेल, लघवीला फार तांबडे होत असेल, तर एक ग्रॅम चंदनाचे उगाळलेले गंध, 2 कप दूध, 20 ग्रॅम खडीसाखर घालून प्यावे, ताबडतोब लघवी साफ होते व बरे वाटते.
चंदनी तेल – लघवीस साफ होण्यास चंदनापेक्षा चंदनी तेलाचा फार उपयोग होतो. परम्यावर विशेष करून पू परम्यावर चंदनी तेलाइतके दुसरे औषध नाही. लघवीचे वेळी किंवा नेहमी परमा वाहात असेल, अत्यंत वेदना होत असतील तर चंदनाचे तेल पाच सहा थेंब, 10 ग्रॅम दूध व चिमटीभर साखर घालून 3-3 तासांनी दिवसातून पाचवेळा घ्यावे, एका दिवसात गुण वाटतो. कंकोळ 10 ग्रॅम व वंशलोचन 10 ग्रॅम घेऊन त्यांचे वस्त्रगाळ चूर्ण करावे व ते चूर्ण भिजेल इतके त्यात चंदनी तेल घालावे, 2-2 तासांनी 1/2 ग्रॅम प्रमाणे घ्यावे, दोन दिवसांत कसल्याही प्रकारचा परमा बरा होतो.
प्रफुल्लित चेहऱ्यासाठी – चंदनाचे चूर्ण गुलाबजलात मिसळून ते चेहऱ्याला लावून अर्धातास ठेवावे व मग धूऊन टाकावे यामुळे चेहऱ्याचा वर्ण खुलतो. व चेहरा तजेलदार होण्यासाठी नियमित चंदन पावडर लावावी.
चेहऱ्यावरील मुरमे पुटकुळ्या जाण्यासाठी – दूध आणि चंदन पावडर एकत्रित पेस्ट चेहऱ्याला लावावी त्यामुळे चेहऱ्याची कांती सतेज होते. मुरमे पुटकुळ्या जातात.