पुणे – 1 ते 8 ऑगस्ट हा आठवडा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने बाळाच्या आणि आईच्या आरोग्याच्या दृष्टीने स्तनपानाचे फायदे सांगितले जातात. आपल्या भारतीय संस्कृतीत तर तान्हुल्या बाळासाठी आईचे दूध म्हणजे साक्षात अमृतासमान मानले आहे. आईच्या दुधाला पर्याय नाही. अगदी पर्यायच काढावयाचा झाल्यास आईसमान असणाऱ्या दाईचे दूध हे उत्तम आणि हेही दूध उपलब्ध नसेल तर बकरीचे किंवा देशी गायीचे दूध तेही संस्कारीत करून!
दूध कसे तयार होते?
डिलिव्हरीनंतर प्रोलॅक्टीन आणि ऑक्सिटोसीन या हार्मोन्सच्या प्रभावामुळे दूध तयार होते. तसेच आईला आपल्या अपत्याबद्दल वाटणारे प्रेम, जिव्हाळा, बाळाला पाहिल्यामुळे, जवळ घेतल्यामुळे, बाळाचा आवाज ऐकल्यामुळे, तसेच बाळाच्या आठवणीनेसुद्धा आणि बाळास आईचे स्तन चोखावयास दिल्याने आईला पान्हा फुटतो आणि दूध येऊ लागते. डिलिव्हरीनंतर पहिले तीन-चार दिवसात जे दूध येते त्यास कोलोस्ट्रम किंवा चीक असे म्हणतात.
या चिकामध्ये प्रतिकारशक्तीसाठी आवश्यक असे घटक असतात. तसेच या चिकाचा पचनमार्गात एक थर किंवा आवरण बनतो. त्यामुळे जोपर्यंत लहान बाळांची प्रतिकारशक्ती विकसित होत नाही तोपर्यंत हा थर त्यांना संरक्षण देतो. या चिकाच्या थरामुळे किंवा आवरणामुळे पोट चांगल्याप्रकारे साफ होते. त्यामुळे सुरुवातीची जी हिरवट रंगाची शी आहे ती बाहेर पडण्यास मदत होते आणि त्यामुळे काविळ होण्याचा धोका राहात नाही.
आईच्या दुधात प्रोटीन्स, कार्बोहाड्रेट्स, फॅट्स, मिनरल पाणी असे सर्व घटक असतात. त्यामुळे बाळास सुरुवातीला म्हणजे जन्मानंतर पहिले चार ते सहा महिन्यात आईचे दूध सोडून इतर कशाचीही गरज नसते. अगदी पाण्याचीसुद्धा नाही. जेव्हा आई बाळास दूध पाजण्यास घेते तेव्हा सुरुवातीला दूध अगदी पातळ म्हणजे पाण्यासारखे येते. नंतर त्याच बाजूला दूध घट्ट येते. पहिल्या पातळ दुधामुळे बाळाची तहान भागते, बाळाचे पोषण होते तर नंतरच्या घट्ट दुधामुळे बाळाचे पोट भरते. त्यामुळे बाळास एकावेळी एकाच बाजूस पूर्णपणे पाजावे. नंतरच्या वेळीस दुसऱ्या बाजूस पाजावे.
आईने बाळास दूध कसे व किती काळ पाजावे?
डिलिव्हरीनंतर लगेचच 1 ते 2 तासात बाळाला अंगावरचे दूध पाजण्यास घ्यावे. यासाठी आईने प्रथमतः आपले हात आणि स्तनाग्रे पाण्याने स्वच्छ करून घ्यावी. स्तनपान शक्यतो शांत आणि एकांत जागी बसून करावे. दूध पाजताना बाळाला हातावर अशाप्रकारे घ्यावे की बाळाचे डोके बाळाच्या पोटापेक्षा थोडे वरच्या बाजूस राहील. बाळाला स्तनाग्र तोंडात देण्यासाठी पुढे वाकू नये. त्यामुळे आईस पाठदुखी जाणवते. दूध पाजताना बाळाच्या तोंडात स्तनाग्राप्रमाणेच संपूर्ण काळा गोल द्यावा.
दूध पाजताना स्तनांचा दाब बाळाच्या नाकावर येत नाही ना याची काळजी घ्यावी. अन्यथा बाळास नाकाने श्वास घेता न आल्याने दूध पिता-पिता बाळ तोंडाने श्वास होते. त्यामुळे बाळाच्या पोटात बऱ्याच प्रमाणात हवा जाऊन बाळास बेचैनी, पोटदुखी, गॅस जाणवतो. काही मातांना भरपूर दूध येते. बाळाने दूध पिण्यासाठी स्तन तोंडात घेतले की लगेचच एकाच वेळी भरपूर दूध तोंडात जमते. त्यामुळे एवढा मोठा घोट गिळताना बाळास त्रास होतो. अशा वेळी आईने आपल्या तर्जनी आणि मधल्या बोटाने बाळाच्या ओठांच्या जरा वर स्तनास पकडून हलकासा दाब देऊन दुधाचा प्रवाह थोडा कमी करावा आणि जेव्हा बाळ व्यवस्थित पिऊ लागेल तेव्हा सोडून द्यावे. बाळाचे दूध पिऊन झाल्यानंतर पुन्हा मऊ कापडाने स्तनाग्रे स्वच्छ करावीत. दिवसातून 2 ते 3 वेळा तरी स्वच्छ पाण्याने स्तनाग्रांची स्वच्छता करावी. स्तनाग्रांना चिरा पडू नयेत म्हणून त्यास तूप किंवा लोणी लावावे.
काही बाळांना दूध पिण्यासाठी 10 ते 15 मिनिटे लागतात तर काहींना 30 ते 40 मिनिटांपर्यंत देखील वेळ लागू शकतो. बाळांना सुरुवातीला दर दोन तासांनी दूध पिण्यास लागते. हळूहळू हा कालावधी 3 ते 4 तासांपर्यंत वाढतो असे असले तरी बाळांना जेव्हा भूक लागेल तेव्हा दूध पिण्यास द्यावे.
बाळाला पुरेसे दूध मिळते का?
प्रत्येक आईला, आजीला ही शंका असतेच की आपल्या बाळाला दूध पुरत आहे ना? जर बाळ दूध पिल्यानंतर 2 तास रडत नसेल, बाळाचे वजन योग्य प्रमाणात वाढत असेल, बाळ व्यवस्थित झोपत असेल, बाळाची वाढ सामान्य गतीने होत असेल तर बाळास पुरेसे दूध मिळत आहे से समजावे. पहिले चार महिने तर बाळास फक्त आईचेच दूध पाजावे. 4 ते 6 महिन्यांपासून बाळास पूरक आहार सुरू करावा. जसजसे बाळास दात येऊ लागतील तसतसे बाळाच्या आहाराचे प्रमाण वाढवावे आणि आईचं दूध क्रमाक्रमाने कमी करावे. साधारणतः बाळ दोन वर्षाचे होईपर्यंत आईचं दूध थोड्याफार प्रमाणात द्यावे. नंतर बंद करावे.