पुणे – पंचवीस वर्षांच्या प्रियाला तिच्या आई-वडिलांचा अत्यंत लळा होता. आई-वडिलांना कोणताही शारीरिक अथवा मानसिक त्रास झाल्यास ती चटकन बेचैन होत असे व जेव्हा माझे आई वडील देवाघरी जातील तेव्हा माझे काय होईल? अशा प्रकारचे विचार बरेच वेळा तिच्या मनात येत असे व त्यामुळे ती अस्वस्थ होत असे.
एक दिवस प्रियाची आई छोट्याशा आजाराने रुग्णालयात भरती झाली व आईला रुग्णालयात दाखल झालेले बघून प्रिया प्रचंड अस्वस्थ झाली त्या दिवशी रात्री तिच्या छातीत खूप जोरात धडधडू लागले, खूप घाम आला, तिला हार्टअटॅक तर आला नसेल ना, या भीतीने तिला तिचे वडील दवाखान्यात घेऊन गेले त्यावेळी काही चाचन्या केल्यानंतर; तो हार्ट अटॅक नसून पॅनिक अटॅक असल्याचे समजले.
प्रियाने या आधी आपल्या आईला कधीच रुग्णालयात दाखल झालेले बघितले नव्हते परंतु, आता आईचे हळू हळू वय होत आहे व आई आजारी पडली आहे आणि आता तिचे काहीतरी बरी वाईट होईल की काय; या प्रचंड भीतीने तिला हा प्रथम पॅनिक ऍटॅक आला. हा प्रथम अटॅक तिला काही वेळासाठी आला होता परंतु, यानंतर कुठेही अपघात बघितल्यावर, स्मशानभूमी जवळून जाताना, तसेच कोणाचे निधन झालेले बघून, प्रिया या सर्व गोष्टींचा संबंध तिच्या आईच्या आजारी पडण्याशी व आईला गमावण्याशी लावत असे.
त्यामुळे तिला अत्यंत भीती वाटून वारंवार पॅनिक अटॅक येण्यास सुरुवात झाली; परंतु, आता मानसोपचार तज्ञान कडून औषधे व समुपदेशकाकडून समुपदेशन घेतल्याने तिचा पॅनिक आजार हा बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे. पॅनिक म्हणजे एखाद्या गोष्टीची वाटणारी भयंकर अथवा तीव्र भीती होय. पॅनिक आजार हा एक चिंतेसंबंधित आजारातीलच एक प्रकार आहे.
पॅनिक अटॅक हे अचानकपणे कधीही कोठेही उद्भवतात व हे उद्भवल्यानंतर काही मिनिटे, काही तास, तर कधीकधी काही दिवसांपर्यंत टिकून राहतात. पॅनिक अटॅकची लक्षणे ही हार्ट अटॅकच्या लक्षणांशी काही प्रमाणात मिळतीजुळती असल्याने, प्रथमदर्शी कोणालाही पॅनिक अटॅक हा हार्ट अटॅक भासू शकतो. तसेच पॅनिक अटॅक आल्यावर कोणतेही ठोस कारण नसताना देखील अत्यंत भीती वाटू शकते.
पॅनिक अटॅकचे प्रकार :
अनपेक्षित/आकस्मिक पॅनिक अटॅक
या प्रकारचे पॅनिक अटॅक हे येण्याच्या आधी कोणत्याही प्रकारची लक्षणे दाखवीत नाहीत. हे अटॅक कधीही कोठेही उद्भवतात तसेच, या प्रकारातील पॅनिक अटॅक हे कोणत्याही ठराविक परिस्थितीशी जोडले गेलेले नसतात. याचे कोणतेही मूळ शारीरिक आजारात नसते.
परिस्थितीजन्य पॅनिक अटॅक
परिस्थितीजन्य पॅनिक अटॅक हे एखाद्या परिस्थितीशी निगडीत असतात, त्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती उद्भवल्यास अथवा केवळ त्या परिस्थितीचा विचार मनात डोकावल्यास या प्रकारातील पॅनिक अटॅक येतात.
परिस्थितीजन्य संवेदनशील पॅनिक अटॅक
या प्रकारातील पॅनिक अटॅक हे परिस्थितीजन्य असले तरीही ती परिस्थिती उद्भवल्यावर लगेचच येतील असे नाही. ती परिस्थिती उद्भवल्यावर अर्ध्या तासानंतरसुद्धा हे अटॅक सुरू होऊ शकतात.
पॅनिक अटॅकची लक्षणे :
पॅनिक अटॅक हे अचानकपणे उद्भवतात व त्यानंतर त्या व्यक्तीस खूप थकवा जाणवतो.
मृत्यूची भीती वाटणे
खूप घाम येणे
हात पाय थरथरणे
श्वास फुलणे
थंडी वाजणे किंवा चेहरा मान
कान या ठिकाणी खूप गरम
जाणवणे.
छातीत खूप धडधडणे
डोके दुखणे
चक्कर येणे
गिळताना त्रास होणे
अस्वस्थ वाटणे
पॅनिक अटॅकची कारणे :
अनुवंशिकता
तणाव
उदा.जवळच्या व्यक्तीचे निधन किंवा जवळच्या व्यक्तीला गंभीर आजार
अतिसंवेदनशील स्वभाव
व्यसने करणे
वरील प्रकारची कोणतीही लक्षणे जाणवल्यास पीडित व्यक्तीला त्वरित मानसोपचार तज्ञाकडे नेणे गरजेचे असते. औषधे समुपदेशन व थेरपी या सर्व उपचार पद्धती मुळे हा होणारा त्रास आटोक्यात राहू शकतो.
डॉ. मृणाल घोळे-मापुसकर