“शिवू नकोस गं फ्रिजला, त्यात फुलं आहेत देवाच्या पूजेची”‘; किंवा “हात नको लावूस मला , देवळात चालले आहे मी” ही अशी किंवा ह्याच अर्थाची अनेक वाक्ये माझी आई काय किंवा सासू काय दोघींच्याही तोंडून मी ऐकलेली आहेत आणि अजूनही ऐकत आहे. हो, कारण त्या चार दिवसात आपल्या हिंदू धर्मात देवाला शिवणं निषिद्ध मानले जाते. काही गोष्टी आपल्याला पटल्या नाहीत तरीही आपण ज्या समाजात किंवा ज्या कुटुंबात राहतो त्याच्या नियमांचे पालन म्हणून किंवा संस्कृतीची जपणूक म्हणून मान्य कराव्या लागतात. मला तर हा शिवाशिवीचा खेळ लहानपणापासूनच आवडला नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी सोयीस्कर रित्या पाळल्या जायच्या.( women Menstruation hindu tradition )
पाळी, मासिक धर्म म्हणजेच रजस्वला स्त्री. साधारण वयाच्या चौदा ते पंधराव्या वर्षी वयात आलेल्या प्रत्येक स्त्रीच्या शरीरात होणार मोठा बदल, ज्यामुळे तिला मातृत्वाचे दान मिळते. प्रत्येक धर्मात ह्या काळात स्त्रियांनी कसे वागावे ह्याचे काही ठराविक नियम ठेवलेले आहेत. जसे ख्रिश्चन धर्मात ह्या काळात स्त्रियांना चर्चमध्येसुद्धा प्रवेश दिला जातो , काही अपवाद वगळता. ( women Menstruation hindu tradition )
आपल्या हिंदू धर्माच्या प्रथेनुसार ह्या काळात रज:स्वला स्त्री कोणत्याही गोष्टीला स्पर्श करू शकत नाही , स्नान करू शकत नाही आणि कोणत्याही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकत नाही, कारण तिला ह्या काळात अपवित्र मानले जाते. भारतात मासिक पाळीविषयी मोकळेपणाने बोलायला आता कुठे सुरुवात झालेली असली तरीही अजूनही टीव्हीवर सॅनिटरी नॅपकिनची जाहिरात आली तर चॅनेल बदलले जाते किंवा प्रत्येकजण ती जाहिरात बघणे टाळते.
ह्या सगळ्या फार वर्षांपूर्वीच्या गोष्टी झाल्या. त्यानंतर अनेक बदल घडले, समाज, समाजातील नियम सोयीनुसार बदलले गेले. स्त्री कमावती झाली, किंवा असे म्हणू शकतो कि तिने आत्मविश्वास कमावला, ती मनातील बोलू लागली. तिला असे हे टाळणे, कुठल्याही आनंदाच्या गोष्टीत केवळ पाळीमुळे नाकारले जाणे ह्यासगळ्याला ती ठामपणे नकार देऊ लागली. खरंतर त्या चार दिवसात बघायला गेलं तर शास्त्रीय दृष्ट्या जे स्त्रीला बाजूला बसवले जायचे काही अंशी ठीकच होते., कारण त्या काळात तिला आराम हवा असतो. काहीजणींना पाठदुखी, ओटीपोटात दुखणे, कंबरदुखी असे त्रासही सहन करावे लागतात. पण स्नान न करणे हे जे नियमात होते ते फारच चुकीचे होते, कारण ह्याच काळात तिने स्वच्छता बाळगणे खरे गरजेचे असते.
मुळातच मासिक धर्म हा नैसर्गिक आहे. त्यात अस्वच्छ असे काही नाही. देवळात न जाणे, लोणच्याला हात न लावणे हे शास्त्रीय दृष्टिकोनातून योग्य असल्याचे कुठे संदर्भ निदान वैद्यकशास्त्रात नाहीत. पण स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर काही गोष्टी टाळायला हव्या आहेत आणि काही पाळायला. हल्ली ज्या सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिराती दाखवल्या जातात, त्यात ती स्त्री अगदी त्या चार दिवसात धावू शकते, कोणतेही खेळ खेळू शकते अगदी लांब उडी वगैरे सुद्धा, तर हे जे दाखवले जाते ते म्हणजे अतिशयोक्तीचे वाटते. खरंच इतके शारीरिक कष्ट मुद्दाम त्या काळात घ्यायची गरज असते का? घरकाम, नोकरी ही रोजची कामे वगळता मुद्दामहून शारीरिक अति श्रमाची कामे मला तरी वाटते तिने टाळणे योग्यच.
ह्या काळात स्त्रीच्या शरीरात हार्मोनल बदल घडत असतात. काही जणींची ह्या काळात चिडचिड होते, किंवा काहींना होणाऱ्या अती किंवा कमी स्त्रावामुळे कंबर,पोट दुखणे हे त्रास सहन करावे लागतात. तिला घरच्यांनी “इकडे हात नको लावूस’, “इथे नकोय बसूस’ वगैरे हे बोलून शिवाशिव ना पाळता “बरी आहेस ना? “काही दुखत तर नाहींना”? असे विचारून मानसिक दृष्ट्या तरी आधार द्यायला हवा. ( women Menstruation hindu tradition )
धार्मिक कार्यात सहभागी होणे न होणे किंवा घरात शिवाशिव पाळणे हे व्यक्ती आणि कुटुंब परत्वे वेगवेगळे असू शकते, पण स्त्रियांनी स्वतःच ह्या मासिक पाळीला आपली सखी, मैत्रीण समजले तर त्रास कमी होण्यास मदत होईल शरीर आणि त्याच बरोबरीने मन सुद्धा शुद्ध असले तर विचार सुद्धा शुद्धच आणि पवित्रच असतील, त्यात पाळी असो वा नसो, त्याने काहीही फरक पडत नाही.
– मानसी चापेकर