[[{“value”:”
Memory Loss: आजकाल अनेकांना छोटी-छोटी गोष्टी विसरण्याची समस्या वाढताना दिसते. लोकांची नावे, रोजची कामं किंवा साध्या गोष्टी आठवत नाहीत, अशी तक्रार अनेकजण करत आहेत. यामागे केवळ चुकीची जीवनशैली किंवा आहार कारणीभूत नसून वाढतं वायू प्रदूषणही एक मोठं कारण असल्याचं नव्या संशोधनातून समोर आलं आहे.
वैज्ञानिकांच्या मते, वायू प्रदूषणाचा परिणाम फक्त फुफ्फुसांवर किंवा हृदयावरच होत नाही, तर तो थेट मेंदूवरही परिणाम करतो. विशेषतः हवेत असलेले सूक्ष्म कण म्हणजेच पीएम २.५ हे अत्यंत धोकादायक ठरत आहेत. हे सूक्ष्म कण शरीरात शिरून मेंदूच्या कार्यावर परिणाम करतात.
‘प्लस मेडिसिन’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, वाढतं वायू प्रदूषण लोकांची स्मरणशक्ती कमी करत आहे. यामुळे पुढे जाऊन अल्झायमर आणि डिमेन्शिया सारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो आहे. ज्या भागात हवा अधिक प्रदूषित आहे, तिथे राहणाऱ्या लोकांमध्ये या समस्या अधिक प्रमाणात दिसून येत आहेत.
यापूर्वी वायू प्रदूषण हे मुख्यतः श्वसनाच्या आजारांशी संबंधित मानलं जात होतं. पण आता संशोधनातून स्पष्ट झालं आहे की प्रदूषित हवा मेंदूतील स्मरणशक्ती साठवण्याची क्षमता आणि विचार प्रक्रियेशी संबंधित मज्जातंतूंवरही परिणाम करते. त्यामुळे मानसिक आरोग्यावरही त्याचा नकारात्मक परिणाम होतो.
या अभ्यासात २००० ते २०१८ या कालावधीत ६५ वर्षांवरील सुमारे २.७८ कोटी लोकांच्या आरोग्याची माहिती तपासण्यात आली. त्यातून असे आढळले की, जे लोक दीर्घकाळ पीएम २.५ च्या संपर्कात होते, त्यांच्यात स्मरणशक्ती कमी होणे आणि विचारक्षमता घटणे यासारख्या समस्या जास्त प्रमाणात आढळल्या.
जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) नुसार, हवेत पीएम २.५ चे प्रमाण एका मर्यादेपेक्षा जास्त नसावे. मात्र भारत, चीन आणि आफ्रिकेतील अनेक भागांमध्ये हे प्रमाण सुरक्षित मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे या देशांमध्ये राहणाऱ्या लोकांना मेंदूशी संबंधित आजारांचा धोका अधिक असल्याचं सांगितलं जात आहे.
विशेष म्हणजे, ज्यांची मेंदूची क्षमता आधीच कमी आहे किंवा वृद्ध व्यक्ती आहेत, त्यांच्यासाठी प्रदूषित हवा अधिक घातक ठरू शकते. अशा लोकांमध्ये अल्झायमर आणि डिमेन्शिया यांसारख्या आजारांची शक्यता अधिक वाढते.
एकूणच, वाढतं वायू प्रदूषण ही केवळ पर्यावरणाची समस्या नसून ती आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठीही मोठा धोका ठरत आहे. त्यामुळे स्वच्छ हवा, योग्य आहार आणि आरोग्यदायी जीवनशैली याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे.
“}]]
