पुणे – पाल्म किंवा ताडाच्या झाडाला येणारं फळ म्हणजे ताडगोळा हे होय. याचं शास्त्रीय नाव बोरासस फ्लॅबिलिफर असं आहे. हे फळ महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारी प्रामुख्याने लागवड होते. बंगालमध्ये तालफ, तेलगूमध्ये ताती मुंजलूफ, तामिळमध्ये नुन्गूफ, इंग्रजीमध्ये आइस ऍपलफ तर हिंदीमध्ये तारीफ या नावाने ओळखलं जातं. या झाडाची पानं सदाबहार हिरवीगार आणि आकाराने मोठी असतात.
ताडगोळे हे अतिशय मऊ, रसदार असून त्यावर जाड साल असते. ही साल काढणं म्हणजे कंटाळवाणं काम असतं. सालीचा रंग पिवळसर केशरी असून आतील गराचा रंग करडा किंवा पांढरा असतो. चवीला गोड असून प्रकृतीने थंड असणारं हे फळ आहे.
पाणीदार फळ असून ते कापायची गरज भासत नाही. या फळाची प्रवृत्ती थंड असून हे फळ उन्हाळ्यात खाणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे. यात खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि ए, बी, सी या जीवनसत्त्वांचा भरपूर साठा आहे. त्यामुळे एकंदरीतच शरीराला अतिशय उपयुक्त ठरतं.
अशा या फळाचे उपयोग पुढीलप्रमाणे :
यात भरपूर प्रमाणात पोटॅशिअम आणि फायबरचा साठा असतो.
हे फळ तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्याचं काम करतं, त्याचबरोबर शरीराचं तापमान नियंत्रित राहतं.
उन्हाळ्याच्या दिवसांत या फळाचे आवर्जून सेवन करावे. उष्णतेमुळे होणारी पोटातली जळजळ कमी होण्यास मदत होते.
उन्हामुळे लहान मुलांना किंवा मोठया माणसांनाही त्वचेवर पुरळ किंवा ऍलर्जी होते. ताडगोळ्यांचा गर पुरळ आलेल्या ठिकाणी लावल्यास लवकर आराम पडतो.
उन्हाळ्याच्या दिवसांत हे फळ आवर्जून खावं, कारण या दिवसांत काही जणांना उन्हाळे लागतात, ही जळजळ कमी होते.
हे फळ या दिवसांत फ्रीजमध्ये साठवून ठेवावं. बाहेर ठेवल्यास हे लवकर खराब होतं. त्यामुळे त्याची साल न काढता फ्रीजमध्ये साठवून ठेवल्यास दीर्घकाळ टिकतं. सुट्टीच्या दिवसांत मुलं अधिक वेळ घराबाहेर असतात, अशा वेळी त्यांना हे फळ खाऊन मगच बाहेर पडायला सांगावं.
ताडगोळ्याचा फेसपॅकही अतिशय उत्तम आहे. चंदनाची साल उगाळून घ्यावी. त्यात थोडं नारळपाणी आणि ताजा ताडगोळा कुस्करून घालावा. याची चांगली पेस्ट तयार करून ती चेह-याला लावावी. फ्रेश वाटतं आणि उन्हामुळे रापलेली त्वचा उजळते.
किडणीच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून शरीराला नको असलेली द्रव्यं याच्या सेवनाने बाहेर फेकली जातात.
याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
कांजण्या आलेल्या रुग्णांनी हे फळ खावं म्हणजे कांजण्यांमुळे अंगाला येणारी खाज कमी होते. शरीरातील साखरेची पातळी संतुलित राहते. याचं सेवन केल्यावर अधिक भूक लागत नाही, त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
– सुजाता गानू