नवीन लग्न झालेल्या तसेच लग्न ठरलेल्या सर्वच व्यक्ती लैंगिक शिक्षणाने परिपूर्ण असतात असे नाही. भारतात तर या गोष्टीवर मनमोकळ्या गप्पांचा अभावच जाणवतो. लैंगिक शिक्षण न मिळाल्यामूळे कितीतरी जोडपी संभोग क्षमता असूनही त्याचा आनंद घेऊ शकलेल्या नाहीत. ताणाखाली कित्येकांचे घटस्फोटदेखील झाले आहेत तर कित्येक जोडपी कुढत जगताना आढळतात. काहीवेळा पुरूष या शिक्षणाअभावी पत्नीला समाधान देऊ शकत नाही तर काही वेळा पत्नीदेखील सुख देण्यास असमर्थ असते. आपली संस्कृती ही पुरूषप्रधान असल्यामुळे अशा स्त्रीची मुस्कटदाबी होते. मूल न होण्याचे खापर तिच्या माथी फोडले जाते. पण तरीही ती मुकाट हा दोष सहन करते कारण ती भारतीय स्त्री असते जिचे जीवन त्यागावर आधारित असते. अशी आपली संस्कृती आपला धर्म सांगतो. या सर्व गोष्टींवर उपाय म्हणजे लग्नापूर्वी मेडिकल कौन्सेलिंग करणे अत्यंत आवश्यक आहे. किंबहुना आजच्या काळाची ती गरज आहे.मनमोकळेपणाने हे टेन्शन शेअर करणारे माता पिता, मित्र मैत्रिणी, डॉक्टर्स तसेच कौन्सलर भेटणे आवश्यक आहे. शारिरीक समाधान एकमेकांना देता येणे हे अतिशय महत्वाचे आहे. ज्यावर आधारितच विवाह संस्कृती टिकून राहू शकते.
वैवाहिक जीवनाविषयी परिचय आपल्या चित्रपटांमधून विकृत स्वरुपात मिळतो व काहीवेळा तो योग्य नसतो तसेच अपुरा असतो. त्यातून साशंकता निर्माण होते. जोडीदाराला योग्य शारीरिक समाधान मिळेल की नाही? मुलं होतील की नाही? ती नॉर्मल असतील ना? आपल्यात काही दोष तर नसेल ना? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे योग्य प्रकारे मिळणे अतिशय आवश्यक असते. अशा समस्या घेऊन येणाऱ्या व्यक्तीला प्रथम धीर दिला पाहिजे. सकारात्मक विचारांचा प्रवाह कार्यान्वित केला पाहिजे. भीती दूर केली पाहिजे. काहीवेळा किळस, लाज, अपराधीपणाची भावना अशा अनेक संमिश्र भावना असतात. पण वैवाहिक सुख घेणे व देणे हे पाप नसून तो हक्क आणि एक निर्मळ आनंद आहे. हे पटवून दिले पाहिजे. अशा व्यक्तींच्या सर्व शंकांचे निरसन व्हायला हवे.
मुलींच्या ताणाला प्राधान्य; मुलाला गृहित धरले जाते
खरे तर लग्नाविषयी मुलांमध्येही तेवढाच ताण असतो जेवढा मुलींच्यामध्ये असतो. मुलीच्या टेन्शनचा विचार प्राधान्याने केला जातो नाही मुलाचा. मुलीचे नव्या घरात येणे, संस्कृतीतील नव्या भूमिकेत येणे, सर्वांशी सासरी जुळवून घेणे, आपल्यात होणाऱ्या शारिरीक बदलाला सामोरे जाणे याविषयी सर्वांना सहानुभूती असते. तिला थोडे का होईना मार्गदर्शन होते. पण मुलाच्या बाबतीत त्याला ताण नाहीच असे गृहित धरले जाते. नो प्रॉब्लेम अँड एव्हरिथिंग इज ओके हीच भूमिका असे. खरं म्हणजे मुलालाही एका नवीन किंवा अल्प परिचय असलेल्या व्यक्तीच्या हाती आपले जीवन सुपूर्द करायचे असते. शिवाय शारिरीक संबंधाच्या बाबतीत त्याला पुढाकार घेऊन ऍक्टिव्ह रोल बजावायचा असतो. आजकालच्या मुली मॉडर्न झाल्या आहेत. पूर्वीसारख्या लाजाळू नसतात. पती हाच परमेश्वर मानणाऱ्या तर मूळीच नसतात. त्यांना समजावून घेणारा जोडीदार त्यांना अपेक्षित असतो.
सहकार्य हवे
दोघेही उच्च शिक्षित असतात काही केसेसमध्ये तर दोघांचीही लग्नाआधी वर्षभर चांगली ओळख असते. मनेही छान जुळलेली असतात. मग लग्न झाल्यावर एक-दीड वर्ष फुलपाखरासारखे भुर्रकन उडून जाते. मग जसजशी वर्ष उलटू लागतात तसे दोघेही कावरेबावरे होतात कारण मुलाची गोड चाहूल लागत नसते. शेवटी धीर करून दोघे अजून मूल होत नाही म्हणून तपासण्यासाठी जातात. काही वेळा मूलाच्या तपासणीत काहीही दोष निघत नाही पण बऱ्याचदा मूली गायनिक चेकअप करून घेण्यास का कू करतात. गायनॅक चेकअप शक्य न होता अजून वाट पहाण्याचा सल्ला वडिलधारी मंडळी देतात. काही वेळा मुलींची तपासणीही अशक्य बनते कारण अशी तपासणी करून घेण्यास मुली मुळीच तयार नसतात.
मुले होण्याच्या उपचारासाठी डॉक्टरकडे खेपा सुरू होतात. काहीवेळा काही जोडपी लाजेने जात नाहीत. काहीवेळा पुरूषी अहंभाव उफाळून येतो व मुलगा उपचार करण्यास नकार देतो. तर काही वेळा ज्या क्रियेमुळे मूल राहते या क्रियेविषयी स्पष्टपणे चर्चा न झाल्यामूळे अर्धवट ज्ञानाने दोघेही प्रयत्न करीत रहातात. घरातूनही मूलाविषयी लग्नाला बरीच वर्ष झाल्यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विचारणा होऊ लागते. दोघांमध्ये नक्की काहीतरी अनुचित आहे हे दोघांनाही कळत नाही. ही कोंडी फोडायला कोणीच तयार होत नाही. पण हेच जर विवाहपूर्व मेडिकल कौन्सेलिंग झाले असते तर….किंवा लग्नापूर्वी समुपदेशनचे काही सेशन्स घेतले असते तर विवाहानंतरच्या अडचणी निर्माणच झाल्या नसत्या. भावी पति-पत्नींनी हे लक्षात घेतले पाहिजे. येताना दोघांनीही आले पाहिजे ते देखील इंटरेस्ट घेऊन. खरं तर लग्नाआधीच यायला हव पण लग्नानंतरही दोन वर्षात जर असे प्रॉब्लेम आले तर समाजाची पर्वा न करता लाज न बाळगता मेडिकल कौन्सेलिंगसाठी गेले पाहिजे. आपल्यातील न्यूनगंड घालविला पाहिजे.
रक्तगटाविषयी
पती-पत्नींच्या रक्तगटाविषयी बरेच गैरसमज अनेकांच्या मनात असतात. बायकोचा रक्तगट आर. एच. निगेटिव्ह आणि नवऱ्याचा आर. एच. पॉझिटिव्ह असेल तर होणाऱ्या मुलाचा रक्तगट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकतो. मुलाचा आर. एच. निगेटिव्ह असेल तर कुठलाच प्रॉब्लेम उद्भवणार नाही. परंतु जर मुलाचा आर. एच. पॉझिटिव्ह असेल तर आई आणि मुलात असंयोज्यता होऊ शकते. या वेळी बाळाला अति प्रमाणात काविळ होऊ शकते. मात्र गरोदरपणी व बाळंतपणात योग्य काळजी घेतल्यास ही भिती निराधार ठरते. यासाठी अँटी-डी इंजेक्शनची सोय आहे.
अनुवंशिक रोगाची तपासणी हवी
दोघांनीही अनुवंशिक रोगाची तपासणी करून घेतलीच पाहिजे. क्वचित एखाद्या कुटुंबात थॅलॅसिमिया, हिमोफिलिया, जी सिक्स पी. डी. डिफिशियन्सी इत्यादी रोग, रक्तदोष असतील तर त्याचा वाहक असलेल्या व्यक्तीने, नियोजित जोडीदार याच रोगाचा वाहक तर नाही ना, हे पडताळून पहायलाहवे. म्हणजे पुढच्या पिढीत हे रोग उतरण्याची शक्यता कमी होते.
विवाहोच्छुक जोडप्यांनी लग्न ठरताच आधीच दोघांच्याही हिपॅटायटीस-बी व एचआव्ही ह्या रक्ततपासण्या करून घ्याव्यात. काही इन्फेक्शन झाले नाही ना हे तपासून पहावे. असेल तर एकमेकांना अंधारात ठेऊ नये. याची खरोखरच आजच्या पिढीला नितांत गरज आहे. हिपॅटायसीस-बीच्या व्हॅक्सिनचा कोर्स प्रेग्नसी प्लॅन करण्याच्या आधी 3 ते 6 महिने संपलेला हवा.
लहानपणी जर रूबेला (गोवरचा एक प्रकार) झालेला नसेल व जर तो गरोदरपणात झाला तर गर्भपात होतो किंवा बाळाला काही व्यंग येऊ शकते. म्हणून याचेही व्हॅक्सिन भावी मातांनी घेतलेले बरे. कित्येक वेळा मांजरीच्या संपर्कामुळे टॉक्झोप्लाझमाच इन्फेक्शन झाल तर वारंवार गर्भपात होऊ शकतात. म्हणूनच प्रेग्नसी प्लॅन करायच्या आधीपासूनच भावी मातांनी मांजराशी संपर्क पूर्णपणे टाळावा.
वैद्यकीय कुंडली
विवाहाची तयारी करताना एक विवाहपूर्व वैद्यकीय सल्ला घ्यावा म्हणजे भविष्यात उद्भवणाऱ्या या शारिरीक, मानसिक, भावनिक समस्यांचे आधीच निराकरण होईल व सप्तपदीपासून सुरू होणारा मंगलप्रवास खरोखरच दोन्ही कुटुंबांना आनंददायी ठरेल. वैद्यकीय कुंडली तयार ठेवावी. परंतु अंधश्रद्धाळू लोकांच्या मनात ही संकल्पना रूजली तरच ती समाजात रूजू शकेल.
गर्भपाताची कारणे
एखाद्या अपघाताने पाळी लांबू शकते. काही स्त्रियांची पाळी अनियमित असते. तर कधी एखादीला घशाच्या तीव्र त्रासासाठी अँटीबायॉटिक्स घेतल्यामुळे नंतर दिवस गेले असल्याचे कळते. एखादीला दुसऱ्याच महिन्यात ताप येऊन अंगावर पुरळ येते तर एखादीला तिसऱ्या महिन्यातच बाहेरची खूप मिठाई खाल्ली म्हणून फुड पॉयझनिंग होते. काही वेळा दिवस राहिल्यावर अति लोण्याच्याचा वा चमचमीत पदार्थांचा मारा झाल्याने उष्णता होऊन लघवीला जळजळ सुरू होते. काहीवेळा एखाद्या असामान्य केसमध्ये डिलिव्हरी व कॉलेजची परीक्षा एकदम येतात.
एखादीला पती नोकरीनिमित्त परदेशी असल्याने दुसरे मूल लगेच नको असते. काहीवेळा सासरी बराच त्रास सहन करावा लागत असल्यामुळे, आपलेच काही खरे नाही तिथे मुलाचं काय करायचं म्हणून गर्भपात करायचा असतो. एखादीचे त्वचेसाठी स्टीरॉईडस् चालू असतानाच गर्भ राहिलेला असतो तर कोणाकोणाचा दोन तीन वेळा गर्भपात झाल्याने चवथ्या वेळेला काय होणार ह्याची चिंता असते. काहींचे
रक्ताच्या टॉर्च टेस्टमध्ये काही रिपोर्टस् चांगले नसतात. त्याच्या औषधांचा कोर्स घेण्याआधीच दिवस गेलेले असतात. अशी एक ना दोन असंख्य कारणे गर्भपातासाठी पुढे येतात. कधी स्वतःच्या चुकीमुळे, निष्काळजीपणामुळे तर कधी अशा कारणांमुळे ज्याच्यावर काही इलाज नाही पण नको असताना गर्भ राहिला म्हणून ती शिक्षा त्या निष्पाप जीवाला दिली जाते.
अगदी जन्माला येण्याअगोदरच आईच्या पोटात त्याची निघृर्ण हत्या केली जाते. हा गर्भपात म्हणजे शारीरिक त्रासाबरोबरच घरातल्यांचे सगळे भावविश्वच उध्वस्त करण्याची घटना होय. आपल्या समाजात अगदी केवळ सोयीसाठी गर्भपात करणाऱ्यांचीही संख्या काही कमी नाही.
गर्भधारणेच्या अलौकिक घटनेबाबत शरीर व मनाची तयारी हवी
गर्भधारणेच्या अलौकिक घटनेबाबत निष्काळजीपणा, तुच्छता, का आढळून येते? खरं तर प्रत्येक विवाहित स्त्रीच्या जीवनातली ही किती असामान्य असते.पण या अत्यंत महत्त्वाच्या घटनेकडे आपला समाज दोषपूर्ण दृष्टीकोनाने बघतो. अहो, घरात कोणी साध्या 10 वी, 12 वी च्या परीक्षेला बसलेले असले तरीे केवढे त्याचे स्तोम असते. अगदी आईबाबा वर्षभर कुठे जाणार नाहीत. सतत तो किंवा ती अभ्यासाच्या दावणीला जुंपले जातात. वर्षभर तयारी व ताण असतो. पण जर कुटुंबात एक नवा चिमुकला जीव जन्म घेणार असेल तरी पण त्यासाठी कोणाचीच काहीच तयारी नसते. आपल्याकडे कुटुंबनियोजनाची उत्कृष्ट साधने उपलब्ध आहेत. पण तरीही निष्काळजीपणा, तुच्छ व्यवहाराचे वर्तन केले जाते.
मूल नको असल्यास
जोवर मूल नको तोवर कुटुुंबनियोजनाचे साधन वापरावे.
गर्भधारणेनंतर स्त्रीची सुरू होते खरी वाटचाल
गर्भधारणेच्या आधी 3 महिने जागरूकतेने तयारी करून सावध असावे. गर्भधारणेसाठी शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक पातळीवर जोरदार तयारी करावी. गर्भ राहिला आहे. ह्याची खात्री पटल्यावरही जबाबदारी संपत नाही. त्या स्त्रीची खऱ्या अर्थाने वाटचाल सुरू होते.फक्त शारीरिकदृष्ट्या मातृत्व येऊन उपयोग नाही तर, मनानेही पूर्णपणे त्या बाळाचे स्वागत करायला हवे. मनोमन प्रत्येक गोष्ट करताना जागरूकता हवी.
पोटातल्या बाळाला प्राधान्य द्यावे. करिअर, शिक्षण, कौटुंबिक समस्यांकडे गर्भधारणा होताच दुर्लक्ष करावे.गर्भस्थ बाळाचे हे दिवसे अनमोल असतात. परत कधीच मिळणारे नसतात.
साऱ्या विश्वातली केवळ एकच व्यक्ती त्या बाळाची काळजी घेऊ शकते व ती म्हणजे त्याची आई. संपूर्णपणे हा जीव त्या आईवर अवलंबून असतो. समजा आधी एखादे मुल असेल तर इतर कोणीही त्याच्याकडे बघू शकते. पण पोटातील बाळाला मात्र इतर कोणीच मदत करू शकत नाही. हा मानसिक आमुलाग्र बदल व्हायला हवा. बाळाला प्राधान्य दिले तर अनेक चुकीच्या गोष्टी करण्याचे टाळले जाईल.
– सुजाता गानू (टिकेकर)