[[{“value”:”
Maternal Health: अलीकडील विविध संशोधनांतून आरोग्याबाबत काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. विशेषतः मातेचा लठ्ठपणा, पेनकिलरचे अति सेवन, साबणातील रसायने आणि गर्भवतींचे जंकफूड सेवन यामुळे गंभीर आजारांचा धोका वाढत असल्याचे दिसून आले आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आई जर लठ्ठ असेल आणि जास्त मेद व साखरयुक्त आहार घेत असेल, तर त्याचा परिणाम पुढील तीन पिढ्यांपर्यंत दिसू शकतो. Washington University in St. Louis येथे उंदरांवर करण्यात आलेल्या संशोधनात असे आढळले की, गर्भधारणेपूर्वीच आईच्या शरीरातील चयापचयातील दोष पुढील पिढ्यांमध्ये उतरतात. आईकडून मिळणाऱ्या मायटोकॉंड्रियल डीएनएमुळे हा लठ्ठपणा आणि इन्सुलिन प्रतिकार पुढील पिढ्यांपर्यंत जातो. त्यामुळे टाइप-२ मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. संशोधक प्रा. केली मोले यांच्या मते, आई लठ्ठ असल्यास मुलांनी नंतर चांगला आहार घेतला तरीही चयापचयातील बिघाड पूर्णपणे सुधारत नाही. हे संशोधन Cell Reports या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
दुसरीकडे, पेनकिलर गोळ्यांचा अति वापरही धोकादायक ठरू शकतो. विशेषतः आर्थरायटिस किंवा दीर्घकाळ वेदना असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे. काही स्ट्रॉंग पेनकिलरमुळे रक्तदाब वाढू शकतो, कोलेस्ट्रॉल वाढू शकतो आणि गंभीर प्रकरणांत किडनी फेल होण्याचा धोका असतो. गरज असल्यास पॅरासिटामोलसारखी हलकी औषधे वापरली जाऊ शकतात; मात्र तीही सवयीची होऊ देऊ नयेत, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
तिसरे महत्त्वाचे संशोधन साबण आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या वस्तूंशी संबंधित आहे. शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही साबण, शॅम्पू आणि टूथपेस्टमध्ये ट्रायक्लोझन नावाचा घटक आढळतो. University of California, San Diego येथील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात ट्रायक्लोझनचा अतिवापर कर्करोग आणि यकृताच्या आजारांना कारणीभूत ठरू शकतो, असे आढळले. उंदरांवर सहा महिने प्रयोग केल्यानंतर त्यांच्यात कर्करोगाची लक्षणे दिसून आली. संशोधकांच्या मते, मानवामध्ये दीर्घकाळ वापर केल्यास असे दुष्परिणाम दिसू शकतात. त्यामुळे स्वच्छतेच्या वस्तूंचा अतिवापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चौथ्या संशोधनात गर्भवती महिलांनी जंकफूड टाळण्याचा इशारा देण्यात आला आहे. स्पेनमधील बार्सेलोना शहरात हजार महिलांवर करण्यात आलेल्या अभ्यासात जंकफूडमध्ये असलेल्या आक्रेलामाईड या रसायनाचा गर्भातील बाळाच्या मेंदूच्या वाढीवर वाईट परिणाम होत असल्याचे दिसून आले. बटाट्याचे चिप्स आणि कुरकुरीत पदार्थांमध्ये हा घटक आढळतो. गर्भवती महिलांनी असे पदार्थ खाल्ल्यास बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासात अडथळे निर्माण होऊ शकतात. काही अभ्यासांनुसार, जंकफूडमुळे प्रजनन क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो.
एकूणच, आईचे आरोग्य, औषधांचा वापर, स्वच्छतेच्या सवयी आणि आहार या सर्व गोष्टी पुढील पिढ्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम करतात. त्यामुळे संतुलित आहार, नियमित व्यायाम, डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य जीवनशैली यांचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे.
“}]]
