लहान मुलांमध्ये नेहमी आढळणारा विकार म्हणजे डांग्या खोकला. बोर्डेटेला पर्टूसिस नावाच्या जीवाणूचा श्वसनमार्गाला संसर्ग झाल्यामुळे हा आजार बळावतो. इंग्रजीत याला पर्टुसिस म्हणतात. लहान मुलांमध्ये अचानक श्वास घेताना घरघर ऐकू येऊ लागते आणि त्यानंतर खोकला होतो. ही घर घर प्रौढ आणि नवजात बालकांमध्ये आढळत नाहीत.
डांग्या खोकल्याबाबतचे वास्तव : डांग्या खोकला जगातील जवळजवळ सर्व देशांत आढळतो. उष्ण कटीबंधातील देशात तो जास्त प्रमाणात आढळतो. पाच वर्षांखालील मुलांमध्ये डांग्या खोकल्याचे प्रमाण जास्त असते. पण अलिकडच्या काळात किशोरवयीन मुलांमध्येही याचे प्रमाण वाढलेले दिसून येते. एक वर्षाहून कमी वय असलेल्या मुलांमध्ये डांग्या खोकल्याचे प्रमाण जास्त आहे. या वयात हा खोकला झाला तर मूल मृत्यू पावण्याची शक्यताही जास्त असते.
डांग्या खोकला संसर्गजन्य आहे आणि जिथे आरोग्याची योग्य काळजी घेतली जात नाही तेथे 90 ते 100टक्के हा रोग होण्याची शक्यता असते. मुलींमध्ये हा विकार बळावण्याचे आणि त्यात त्या दगावण्याचे प्रमाण जास्त आहे. डांग्या खोकल्यातून बरे झाल्यावर किंवा त्याबाबत लस घेतल्यास शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. एकदा बरे झाल्यावर काही रूग्णांमध्ये डांग्या खोकला सौम्य स्वरूपात पुन्हा येऊ शकतो.
हिवाळा आणि उन्हाळ्यात या विकाराचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता असते. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये या रोगाचे प्रमाण जास्त असते. तसेच गर्दीच्या आणि अस्वच्छतेच्या ठिकाणी ही या विकाराचे प्रमाण जास्त असते.
खोकल्यावाटे बाहेर पडणाऱ्या लाळेच्या थेंबाच्या माध्यमातून किंवा थेट संपर्कामुळे डांग्या खोकल्याचा प्रसार होतो. एकदा बोर्डेटेला पर्टुसिसचा संसर्ग झाल्यावर पाच ते चौदा दिवसांत हा विकार बळावतो.
डांग्या खोकल्याच्या प्रमाणात जगभरात हळूहळू वाढ झालेली दिसून येते. जेथे लसीकरण झालेले नाही तेथे या विकाराचे प्रमाण जास्त आढळते. डीपीटी लसीद्वारे या रोगाचा प्रतिबंध करता येतो.
डांग्या खोकल्याची लक्षणे : डांग्या खोकल्याचे तीन टप्पे असतात. कॅटॅऱ्हल, पॅरॉक्सीसमल आणि कन्व्हॅलीसन्ट हे ते तीन टप्पे.
कॅटॅऱ्हल टप्पा : हा सुरूवातीचा टप्पा असतो आणि तो एक ते दोन आठवडे असतो. या काळात रूग्णामध्ये सौम्य खोकल्याची सामान्य लक्षणे दिसून येतात, त्याला सौम्य ताप येतो, अशक्तपणा, नाक वाहणे आणि डोळे सुजणे दिसून येते. या स्थिीत संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते. नेहमीच्या सर्दीप्रमाणे लक्षणे दिसून येतात.
पॅरॉक्सीसमल टप्पा : हा टप्पा दोन ते चार आठवडे राहतो. या काळात सतत खोकल्याची उबळ येऊन सतत खोकला येत राहतो तोही तीवझ स्वरूपाचा. त्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. पॅरॉक्सीस्मस असे या अवस्थेला म्हणतात.असा खोकला थांबल्यानंतर श्वास घेताना मुलांच्या घशातून घरघर असा आवाज येतो. तीव्र खोकला लागल्यानंतर उलटी होते. रात्री झोपेत या खोकल्याची तीव्रता जास्त वाढते. डांग्या खोकल्यातील गुंतागुंत याच टप्प्यात वाढते.
कन्व्हॅलिसन्ट टप्पा : या टप्प्यात खोकला हळूहळू कमी होतो. त्याची तीव्रता खूप कमी होते. पण तो पूर्णपणे बरा व्हायला काही महिने लागतात. या टप्प्यात जीवाणू किंवा विषाणूंचा संसर्ग झाल्यास हा विकार उलटण्याचीही भीती असते. यावेळी तापही येतो.
किशोरवयीन मुले आणि प्रौढांमध्ये वारंवार खोकला येण्याचा टप्पा (प्रॉक्सीस्मस) येतो किंवा येतही नाही. पण त्यांच्यात हा खोकला दोन आठवड्यांपर्यंत राहतो. प्रौढांमध्ये श्वास घेताना घर घर असा आवाज येत नाही कारण श्वासनलिका रूंद झालेल्या असतात. पण तरीही खोकल्याच्यावेळी धाप लागणे, घशात खवखव होणे आणि उलटी येणे हे प्रकार दिसून येतात.
डांग्या खोकल्याकडे वेळीच लक्ष देऊन उपचार केले नाहीत तर त्यातील गुंतागुंत वाढून न्यूमोनिया, फुफ्फुसांचे काम बंद होणे, शरीरातील ताकद कमी होणे आणि अर्धांगवायूचा झटका येणे असे प्रकार घडू शकतात. यातून कदाचित मृत्यूचाही संभव असतो.
डांग्या खोकल्यातील गुंतागुंत वाढते ती खोकल्याच्या तीव्र उबळीमुळे. एक वर्षाच्या आतील मुलांमध्ये ही गुंतागुंत जास्त तीव्र असते. योग्य वेळी उपचार केले नाहीत तर मूल दगावू शकते. या खोकल्यातील गुंतागुंत पुढीलप्रमाणे असते.
श्वासविषयक समस्या : न्युमोनिया, फुफ्फुसांचे काम बंद होणे, फुफ्फुसनलिकांचे प्रसरण पावणे आणि श्वसनक्रिया बंद होणे
मेंदूविषयक समस्या : शरीर लुळे पडणे, कोमा, मेंदूत रक्तस्त्राव होणे, अर्धांगवायूचा झटका येणे
इतर समस्या : नाकातून अगर डोळ्यांतून रक्त येणे, खोकल्याद्वारे रक्त पडणे, लघवीची समस्या, तीव्र खोकला येऊन चक्कर येणे, कुपोषण आणि वजन कमी होणे.
सुरुवातीच्या टप्प्यात डांग्या खोकल्याचे निदान करणे अवघड असते. आजारी पडल्यानंतर पहिल्या तीन आठवड्यात जर जीवचाणू ओळखता आला तर यावरच उपचार तातडीने करता येतात. अलिकडच्या काळात अत्याधुनिक तंत्राद्वारे हे करणे शक्य झाले आहे. या विकाराचे निदान करताना नाक आणि घशाची तपासणी जरुर करावी.
डॉ. संजय गायकवाड