अनुभूती जगण्यापलीकडच्या जीवनाची
आपण सहजासहजी आपल्या विचार, वर्तन आणि व्यवहार ह्यांमध्ये बदल करू इच्छित नसतो. आपल्या जीवनशैलीत बदल करण्यासाठी आपलं मन तयार नसतं. दैनंदिन कार्यामध्ये थोडासा बदल करून बघितला तर, नक्कीच एका वेगळ्या वातावरणाची आपल्याला प्रचिती येऊ शकते. प्रॉब्लेम कोणाला नसतात..? पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तरही असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी आपल्या हक्काची माणसं गरजेची असतात. यांच्या व्यतिरिक्त आणि त्याच्या पलीकडचा प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो. प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी आपलं मन धावत असतं. हे मनाचं प्रकरण खरंच खूप छान असतं. जागा न सोडता ते हजारो मैल भटकत असतं आणि सगळ्यांना भेटत असतं. पण शरीर त्यापैकी एकदोन ठिकाणीच जाऊ शकतं.
आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही, तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त तडजोड, कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून स्वीकारता येत नाही; परंतु निवडलेलंच जेव्हा आवडायला लागतं, तेव्हा तडजोडीचा प्रश्नच उरत नाही. शब्दांचा व्याकरणातला अर्थ आणि स्थान हे परीक्षा देताना समजतं आणि त्याच शब्दांचं जीवनाशी काय नातं असतं त्याचा अर्थ जगण्यापलीकडचं जीवन जगताना समजतो. परीक्षेचा हॉल सोडला, की परीक्षेचं ओझं झटकता येतं, कारण परीक्षेपुरातच त्या हॉलशी संबंध असतो. पण जीवन जगताना जेव्हा शब्द झटकता येत नाहीत, तेव्हाच त्यांचा खरा अर्थ समजतो. या बाबींची जाणीव होणं म्हणजेच जगण्यापलीकडचं जीवनाची अनुभूती होय.
मनाची मशागत
एका क्षणात दृष्टिकोन बदलणं हे साधसुधं स्थित्यंतर नाही. जगातील सर्वांत अवघड गोष्ट म्हणजे विचार बदलणं. इतर गोष्टी केव्हाही बदलता येतात. आज आवडलेली गोष्ट उद्या फेकून देता येते, पण नवा विचार स्वीकारणे ही खूप मोठी गोष्ट आहे. “आजचा दिवस नवा विचार स्वीकारण्यासाठी शुभ आहे. नव्या विचारांची नवीन पालवी फुटायला सुरुवात आजपासून व्हावी’, अशाप्रकारच्या सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात करून पाहावी. सकारात्मक विचारांमुळे आपल्याच मनाला प्रसन्न वाटायला सुरुवात होते. मनाला आशेचे पंख असतात, हृदयात ध्येयाचं वादळ असतं, अंत:करणांत जिद्द असते, भावनांना फुलांचे गंध असतात आणि डोळ्यासमोर खुलं आकाश असतं, तेव्हा प्रत्येक क्षण विलक्षण ठरू शकतो. मनाला मन:पूर्वक मानलं, समजून घेतलं, मोकळं केलं, आनंदी ठेवलं, तंदुरुस्त ठेवलं, सकारात्मक विचारांमध्ये गुंतवलं आणि नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवलं की फक्त यशच प्राप्त होत राहतं.
वर्ष बदललं की आपण भिंतीवरील कॅलेंडर बदलतो; पण आपल्या स्वतःच्या विचार वर्तन आणि व्यवहारांमध्ये आवश्यक बदल करत नाहीत. भावनांच्या रंगांची उधळण सर्वात जास्त माणसाचं मनच करत असतं. माणूस कधी कधी पूर्ण भरलेला असतो, तर कधी पूर्ण रिता असतो. दोन्ही स्थितीत चंचलता असते. आणि या दोन्हींच्या मध्ये असते ते म्हणजे मानसिक स्थैर्य. ज्या व्यक्तीला सतत शुभ, सकारात्मक आणि आशावादी विचार करण्याची सवय असते; त्याचं मन नेहमी आनंदानं आणि उत्साहानं भरलेलं राहतं. अशा उत्साही मनाच्या व्यक्तीला नेहमीच यशप्राप्ती होत असते. कारण गुंतवणूक भावनांची आणि आनंद कोट्यवधींचा असतो. सकारात्मक, आशावादी, आनंदी विचार हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली असते, त्यासाठी मनाची मशागत करत राहणं जरुरीचं असल्याचं समजून घेतलं पाहिजे.
आनंदी जीवनशैली गरजेची
आपण अनेकदा घडून गेलेल्या घडामोडी आणि घटना ह्यांच्यातच गुरफटलेले असतो. त्या लवकर विसरत नाहीत. त्यांतही नकारात्मक गोष्टी आपल्याला अधिकच सतावत राहतात, दु:खी करतात. आपल्या विचारांत सकारात्मकता आणल्याने येणारा अनुभव आणि त्याद्वारे मिळणारा आनंद निश्चितच आंतरिक समाधान आणि मानसिक शांती देणारा असतो. प्रत्येक बाबीकडे खिलाडूवृत्तीनं बघितलं, आनंदानं प्राप्त परिस्थितीचा स्वीकार केला तर आपल्या जीवनशैलीत नक्कीच बदल घडून येऊ शकतात.
हे अनुभवण्यासाठी चांगल्या माणसांची एक साखळी तयार करण्याचा आपला नेहेमी प्रयत्न असावा. अर्थात त्यामुळे आपण नेहमीच भेटू अगर न भेटू परंतु आपले चांगले विचार नक्कीच एकमेकांपर्यंत पोहोचत राहू शकतात. चांगली भूमिका, चांगली ध्येयं आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात. मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही. ह्या सकारात्मक विचारांचा उपयोग आपल्याला होत राहतो. जेवणातल्या मिठाप्रमाणे जीवनात चव आणणाऱ्यांपैकी आणि जीवनाची गोडी वाढवणाऱ्यांपैकी आपण एक असावं आणि आपल्या जीवनाला सार्थकता प्राप्त करून घ्यावी, असा सकारात्मक विचार प्रत्येकानं करायला सुरुवात केली तर एकूणच वातावरणात सकारात्मकता, जाज्वल्य, आश्वासकता निर्माण झाल्याची प्रचिती येऊ लागते.
अंतरंगात व्हावी आनंद निर्मिती
आपल्या शरीराचे चोचले पुरवायला आपण नेहेमीच इच्छुक आणि उत्सुक असतो, पण मनाला आनंद देऊ करण्यासाठी आपण कंजुषी करतो. आपला नेहेमीच दृश्य गोष्टींवर विश्वास असतो; त्यामुळेच आपलं प्राधान्य शारीरिक गरजांची पूर्तता करण्यासाठी दिलं जातं, त्यासाठी आपण उतावीळ झालेले असतो. न दिसणाऱ्या मनाचा, मनातल्या मनात, मनमुरादपणे, मनापासून अथवा मन मारूनही आपण विचार का बरं करत नाही? मनाला आनंदी करण्यासाठी खरं तर केवळ सकारात्मक विचारांची जरुरी असते.
शरीराला सुखावण्यासाठी, जगाच्या पाठीवर कोठेही गेलं तर, सर्व काही विकत घेता येऊ शकतं; पण सकारात्मक विचार मात्र आपल्या अंतर्मानातच प्रसूत व्हावे लागतात. ते काही विकत मिळत नाहीत आणि त्याची अनुभूतीही विकत मिळत नाही. संपूर्ण जग सुंदर आहे, फक्त तसं पाहायला हवं; प्रत्येक नातं जवळचं आहे, फक्त ते उमजायला हवं; प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे, फक्त तसं समजायला हवं, प्रत्येक वेळेत समाधान आणि आनंद आहे फक्त तसं जगायला हवं.