कोविड-१९ ने आज जागतिक पातळीवर प्रचंड परिणाम घडवून आणला आहे, आणि प्रत्येकजण मनामध्ये भय व चिंतेची भावना घेऊनच या आव्हानात्मक परिस्थितीला सामोरा जात आहे. या आव्हानांनी माणसांचे आणि विशेषत: स्त्रियांचे एकूण स्वास्थ्य व त्याचे विचार यांवर मोठा गहिरा परिणाम झाला आहे.
सगळ्यांना या गोष्टीची चांगलीच कल्पना आहे ओसंडून वाहणा-या जबाबदा-या, अंगावर पडलेली अगणित कामे, अपेक्षित कर्तव्ये या सगळ्यामुळे बहुतांश स्त्रियांचे आपल्या एकूण स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होते. नोकरदार स्त्रियांच्या आयुष्यात वर्क फ्रॉम होम अर्थात घरून काम करण्यामुळे निर्माण झालेल्या तणावाबरोबरच, मुलांच्या शाळा बंद असल्याने पडणारी अधिकची कामे, लॉकडाऊन आणि संपूर्ण कुटुंबाच्या गरजा भागवण्याची अंगावर येऊन पडलेली जबाबदारी या सगळ्याचा ताणही वाढला आहे, व यात त्यांच्या केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्याचाही बळी जात आहे.
तणावाच्या पातळीचा स्त्रियांच्या शरीरातील संप्रेरकांच्या कार्यावर मोठा परिणाम होतो व मासिक पाळीचे चक्र बिघडण्याशी, त्यातून अनेक आजारांसाठी पुरक परिस्थिती तयार होण्याशी या गोष्टीचा फार घनिष्ट संबंध असल्याचे व याच मनोसामाजिक ताणतणावांची परिणती दीर्घकालीन आरोग्यसमस्यांमध्ये होत असल्याचे सिद्ध झाले आहे.
प्रजननक्षम वयातील स्त्रियांमध्ये सरसकट आढळून येणा-या आरोग्य समस्यांमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरीज सिंड्रोम (PCOS), थायरॉइड डिसॉर्डर, लठ्ठपणा आणि वंध्यत्वाशी संबंधित समस्यांचा समावेश होतो. पॉलिसिस्टिक ओव्हरीयन डिजिज ही तुलनेने तरुण वयोगटामध्ये सरसकटपणे आढळून येणारी एंडोक्राइन किंवा शरीरातील अंत:स्त्रावांशी निगडित आरोग्यसमस्या आहे.
अंडाशयामध्ये अनेक फॉलिकल्स विकसित होणे व त्याच्या परिणामी पाळी लांबणे, पाळी न येणे इत्यादी पाळीतील अनियमिततेशी संबंधित अडचणी निर्माण होतात. या समस्येमध्ये संप्रेरकांच्या पातळीमध्ये बदल झाल्याने स्त्रियांना मुरुमे, अवांच्छित ठिकाणी पुरुषी पद्धतीने केस उगवणे, केस गळणे, डिस्मेनोरिया किंवा वेदनादायी मासिक पाळी, शरीर सुजणे इत्यादींसारख्या समस्या आढळून येतात.
त्यात आता, PCOS शी थेट संबंध असलेल्या अती जळजळ, ड जीवनसत्वाची घसरलेली पातळी आणि हायपरअँड्रोजेनिजम (पुरुष संप्रेरके अतिरिक्त प्रमाणात तयार होणे) या गोष्टींचा थेट संबंध कोविड-१९च्या तीव्र लक्षणांसाठी कारणीभूत ठरत असल्याचे दिसून आले आहे.
टाइप टू डायबेटिस, लठ्ठपणा, हायपरटेन्शन आणि हायपोथायरॉयडिझम यांसारख्या PCOS शी संबंधित इतर समस्यांमुळेही कोविड-१९ ची लागण झाल्यास त्यातील गुंतागुंत वाढण्याचा धोका अतिशय जास्त आहे. PCOS ही एक गुंतागुंतीची स्थिती आहे, जिच्यामुळे शरीराच्या विविध यंत्रणा प्रभावित होतात व म्हणूनच त्यातून ताणतणाव, नैराश्य, चिंता यांचे चक्र सुरू होऊ शकते व त्याचाही कोविडच्या प्रकरणांवर विपरित परिणाम होऊ शकतो.
खबरदारीच्या काही सूचना:
या समस्येची कोणतीही लक्षणे दिसून आल्यास आपल्यावर उपचार करणारे डॉक्टर/ स्त्रीरोगतज्ज्ञ यांच्याशी संपर्क साधून वैद्यकीय सल्ला घेणे स्त्रियांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. लक्षणांविषयी सजगता आणि त्यांचे बारकाईने निरीक्षण या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत.
आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी काही झटपट सूचना पुढीलप्रमाणे:
कोविड-१९च्या काळामध्ये एकाग्र, निवांत राहणे आणि सकारात्मक विचार करणे हे आवर्जून करायला हवे.
स्वत:ची काळजी घेण्याच्या दृष्टीने वास्तवात अंमलात आणण्याजोगे वेळापत्रक बनवून वेळेचे व्यवस्थापन करणे योग्य.
समतोल आहार घेऊन आणि जंक फूडचे अतिरिक्त सेवन टाळून निरोगी जीवनशैली जपणे हे लठ्ठपणा व त्याच्याशी संबंधित इतर आजारांच्या व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
आहारामध्ये साखरेचे प्रमाण नियंत्रित असलेल्या, कर्बोदकांची मात्रा कमी असलेल्या व प्रथिनांनी समृद्ध पदार्थांसह ताजी फळे व भाज्यांचा समावेश असायला हवा.
अनेक ऑनलाइन फिटनेस क्लासेस आणि व्यायामपद्धती आता उपलब्ध आहेत. त्यांच्या मदतीने तंदुरुस्त राहता येईल. शारीरिक स्वास्थ्यासाठी वेळ काढल्यामुळे वजन नियंत्रणात राहते तसेच भावनिक स्वास्थ्यही जपले जाते.
धूम्रपान आणि मद्यपान यांचा वापर मनावरचा ताण हलका करण्यासाठीही करता कामा नये.
सध्याच्या परिस्थितीमध्ये नियमितपणे हॉस्पिटलमध्ये जाणे टाळलेलेच चांगले मात्र फॉलोअपसाठी ऑनलाइन टेली-कन्सल्टिंगच्या पर्यायाचा विचार करता येईल. या काळात माहितीविषयी सजगता बाळगणे, सुसज्ज राहणे, शांत राहणे आणि सुरक्षित राहणे या गोष्टीच परिस्थिती सुधारण्याचे उपाय आहेत.
लेख इंडस हेल्थ प्लसच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि प्रिव्हेन्टिव्ह हेल्थकेअर स्पेश्यालिस्ट श्रीमती कांचन नायकवाडी यांच्या सौजन्याने.