आपलं मन जेव्हा चांगल्या अर्थी भरकटलेलं असतं, बऱ्यापैकी शांत, स्थिरचित्त असतं, तेव्हा मनाला भविष्याचा विचार करायची आवड असते. पुढचा विचार करणं ही मनाची मूलभूत वृत्ती आहे. कोणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना आपण सहज म्हणतो, मग आज काय करणार? आपण असं विचारत नाही, गेल्या वर्षीच्या वाढदिवसाला काय केलं होतं? आजचा नजीकच्या भविष्यातला काय प्लॅन आहे, हे आपण विचारतो.
मनाला गत काळामध्ये रमणं फारसं आवडत नाही. त्यातली मेख ते पुढील वागण्यात उचलू शकतं. त्यातून शिकलेले धडे पुढे वापरू शकतं. पण ते तिथेच थांबलेलं नसतं. त्यामुळेच कोणीही आपल्यासाठी कितीही महत्त्वाचं असलं तरी ते गेलं, तर आपल्याला जगराहाटी चुकते, असं होत नाही. राम-कृष्णही आले गेले, असं आपण म्हणतोच.
अगदी जन्मदात्री आई जन्म देतांना गेली, तरी त्या बाळाला पुढचं आयुष्य बघणं भाग असतं. जिथे बेसिक गरजा भागतील आणि थोडीफार माया मिळेल, त्या कमी भांडवलावर देखील ते वाढतं.
कोणी म्हणतं की शिवणकाम करताना बरं वाटतं. कोणाला विणकाम करतांना वाटतं. कोणी गाडी चालवत असतात तेंव्हा त्यांना अचानक काही सुचतं. आंघोळीला गेल्यावर खूपच कल्पक काय काय सुचत असतं, असं नोंदवणारे तर अनेक जण आहेत. हे का होतं? कारण तेव्हा तुम्ही आजूबाजूच्या मनाच्या अडथळ्यांमधून जाऊन ते एक स्पेसिफिक काम करण्यासाठी एकाग्र होऊ पाहत असतात.
मनावर येऊन आदळणाऱ्या असंख्य विचारांना थोडं कमी करून आपला मार्ग कसा काढता येईल किंवा आपलं काम कसं संपेल, त्याच्या मागे लागलेले असतात. विचारांमध्ये स्पष्टता असते. पण हे होण्यासाठी आपण मनाचं ऐकायला एक ठहराव तर मिळवला पाहिजे. आधीच आपल्या मनावर हजारो विचार दर सेकंदाला आदळत असतात. त्यातून वाट काढून जरा कुठे स्थिर होत नाही, तर आपण हातात वेगवेगळी घेऊन बसतो. मनाचं ऐकणार तरी केंव्हा? त्याला आजूबाजूची माहिती नीट प्रोसेस तरी कधी करू देणार?
तर, लक्षात ठेवा. मनाला वेध असतो भविष्याचा. आपण कधी काळच्या दुःखात डुंबत बसलेलो असू, तर ती गोष्ट मुळातच आपण मनाला शब्दशः मारून करत असतो. वर्तमान आणि भविष्य हेच आपल्या कामास येणार आहेत. करून पाहा प्रयोग. स्वतःच्या मनाचं ऐकल्याचा आनंद मिळेल, ते वेगळंच.
– प्राची पाठक