साहित्य – गव्हाचे पीठ (कणिक), थोडेसे डाळीचे पीठ (बेसन), साल काढलेला दुधी, 2 गाजर, 2 ते 3 काकड्या, 1 बीट रुट, 1 मुळा, कोथिंबिर, तीळ, ओवा आणि मीठ
कृती – सर्वप्रथम एका ताटात गरजेनुसार गव्हाचे पीठ घ्यावे त्यात अगदी थोडेसे डाळीचे पीठ घालून एकत्र करून घ्यावे. त्यामध्ये ओवा, तिळ आणि गरजेनुसार मीठ घालून ते एकसारखे करून घ्यावे. त्यानंतर साल काढलेला दुधी, गाजर, काकडी, बीट आणि मुळा हे सर्व बारीक खिसणीने खिसून घ्यावे.
त्यात थोडी कोथिंबीर चिरून घालावी. या सर्व खिसलेल्या फळ भाज्या एकत्रित केलेल्या पीठात घालून ते पुन्हा मिसळून घ्यावे. गरज असल्यास त्यात थोडे पाणी घालू शकता. एकत्र करून साधारण आपण पोळी करण्यासाठी ज्याप्रमाणे कणिक मळून घेतो तशी ती आपल्या सोयीने मळून घ्यावी.
या उंड्याचे पराठे लाटून ते छान खरपूस भाजून घ्यावेत. गरम गरम खाल्ल्यास उत्तम. हे मिक्स व्हेज पराठे लोण्याबरोबर खाल्ल्यास आणखी लज्जतदार लागतात.