साहित्य :
ज्वारी, बाजरी, नाचणी आणि तांदळाची पिठे समप्रमाणात घ्यावीत, म्हणजे अंदाजे प्रत्येकी पाऊण वाटी; थोडेसे हिरवे असलेले छोट्या आकाराचे खरबूज बिया काढून, किसून घ्यावे, (खरबुजाला चांगले पाणी सुटते आणि एक विशिष्ट चवही असते.) हा कीस साधारण दीड वाटी घ्यावा, दोन चमचे साय, दोन चमचे धने-जिरे पावडर, चवीपुरते मीठ आणि अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, दीड चमचा आले-मिरची-लसूणची पेस्ट (सगळे मिळून दीड चमचा), पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती :
सर्व पिठे, मीठ-साखरेसह सर्व मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर चांगली एक करावी. यामध्ये साय घालून सगळे मिश्रण एकत्र करावे. त्यानंतर खरबुजाचा कीस घालून त्याच्या पाण्यातच हे पीठ घट्ट मळावे. वरून साधे पाणी घालू नये. हा मळलेला पिठाचा गोळा अर्धा तास झाकून ठेवावा. त्यानंतर थालिपिठे करायला घ्यावीत. ही थालिपिठे आपण नेहमी करतो तशी तव्यावर तेल टाकून देखील करता येतात, किंवा पुरीसारखी तळून त्याचे धपाटेही करता येतात. तेल नको असेल, तर पुरीच्या आकाराची थालिपिठे लाटून ती ओव्हनमध्ये भाजूनसुद्धा घेता येतात. याप्रमाणेच कलिंगडाच्या पांढऱ्या गराचे देखील थालिपिठे करता येतात.