स्वावलंबी असणाऱ्या अशा नात्यातील लोकांना एखाद्या वृध्दाश्रमाचा आधार घेऊन किंवा याच संकल्पनेला मानणाऱ्या आणखी एखाद्या जोडीदारासोबत पुढचा काळ व्यतीत करता येईल हे खरे असले तरी निर्माण होणारी मानसिक आंदोलने पेलणे सोपे नाही.
मात्र, लिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारताना त्यापाठोपाठ येणाऱ्या कायद्यांचा, फायद्यांचा विचार करताना त्यातले तोटेही समजून घेऊन, तशा मानसिक तयारीनेच हे नाते प्रस्थापित करावे. कारण सहजीवनाचा कुठलाही मार्ग निवडला तरी भावना मात्र समानच असतात. एकत्रित राहणे म्हणजे आपल्या जोडीदारावरील प्रेम, त्यानिमित्ताने निर्माण होणारे हक्क आणि नात्यात गुंतणे हे ओघाने आलेच.
अशा वेळी या नात्याला धक्का लागला तर ते दुःखही पचविणे जमले पाहिजे. प्रेम, भावनिक गुंतवणूक, सहजीवन हे सगळीकडे सारखेच असते. प्रत्येकाचा विचार वेगळा, याकडे बघण्याची दृष्टीही वेगळी असू शकते आणि स्वतःला जसे जगावेसे वाटते तसे जगण्याचा प्रत्येकाला कायदेशीर हक्कही आहे. पण बरेच वर्षं रिलेशनशिपमधे राहिल्यावर नंतर त्यातल्या एकाने पाठ फिरविली किंवा वैचारिक घुसमट झाल्यावर ते नाते तुटून, मनाचे जे उध्वस्त होणे हे असह्य असते. किमान यावर विचार होणे नक्कीच गरजेचे आहे असे वाटते.
‘लग्न वगैरे नकोच! कशाला नसत्या फंदात पडायचे? केलंच तर लव्ह मॅरेज करू किंवा आम्ही आधी एकमेकांना भेटणार, तिच्या/त्याच्याबद्दल मनात काही भावना निर्माण झाल्या तर रिलेशनशिपमध्ये राहणार, जर बाकी इंटरेस्ट वाढले, अंडरस्टॅंडिंग झालंच तर रिलेशनशिप सुरू ठेवणार आणि फार काही वाटलं तर लग्नाचा विचार नंतर करणार’ असा विचार अलिकडे बळावत चालला आहे.
त्याहीपेक्षा ‘मला लग्नच करायचं नाही, किंवा मला माझ्यावर कुणाचेही वर्चस्व नको. मला माझी स्पेस हवी आहे, मी नाही घरातल्यांची सेवा करत बसणार. किंवा लग्न करुनही कुठे सुखी असतात लोक?
मी आर्थिक सक्षम असेल तर इतर कुणाच्या मिळकतीवर (अगदी नवरा नावाच्या पुरुषावरही) अवलंबून राहण्याची मला गरज नाही, मीही नोकरी करते, पैसे कमावते तर मी माझ्या स्वतंत्र घरात राहू शकत.
मी नवऱ्याच्या घरी राहयला का जाऊ? तसेच फक्त घरकाम आणि शारीरिक गरजांची पूर्तता होण्यासाठी एखाद्या मुलीशी लग्न करुन, स्वतःच्या मागे सांसारिक कटकटी कशाला लावून घेऊ? नकोच तो ड्रामा. त्यापेक्षा मलाही स्वयंपाक करता येतो, घर आवरायला जमतं तर माझा मी स्वतंत्र जगेन. रोज घरी जाऊन बायकोची कटकट कुणी ऐकावी, शिवाय जन्माला आलेल्या अपत्याची जबाबदारी कशाला? आधीच भारताची लोकसंख्या इतकी वाढलीय, त्यात आणखी भर नको, अशा वेगवेगळ्या विचारांनीही लग्न संस्कार नाकारला जात आहे.(क्रमशः)
The post Live In Relationship : तुम्हीही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे का तर मग हे वाचा… appeared first on Dainik Prabhat.