करोना विषाणूपासून मुले सुरक्षित राहावी यासाठी मुलांना घराबाहेर पाठवू नका, अशा सूचना लॉकडाऊनमध्ये करण्यात आल्या. पण लहान मुलांचा ओढ खेळण्याकडे जास्त असतो. अशा वेळी मुलांना घरात थांबणे कसे शक्य आहे? बऱ्याच मुलांचे आईवडील हे वर्किंग आहेत. लॉकडाऊनमध्ये काही ऑफिसेस बंद असल्याने पालक घरून काम करीत आहेत. मात्र, घरात मुलांच्या गोंधळामुळे त्यांना काम करणे अशक्य किंवा अवघड आहे.
आईवडिलांना आजी-आजोबा म्हणतात मुलांवर चिडू नका शाळा, ट्युशन, चिल्ड्रन्स सेंटर्स, हॉकी क्लासेसला नियमित जाणारी मुले घरात अडकून पडली आहेत. म्हणून ही मुले आईबाबांकडे विचारायला येणे साहजिकच आहे. म्हणून तुमच्या कामांतून काही ब्रेक घ्या आणि काही वेळ मुलांसोबत घालवा.
स्वत: वाचून मुलांना वाचनाची गोडी लावा. त्यांच्या आवडीची पुस्तके वाचायला घ्या. मुलांना चित्र काढणे फार आवडते म्हणून काही वेळ त्यांच्याकडून चित्र करून घ्या.
मुलांना स्वावलंबनाची सवय लावा. घरांतील बगीच्याला पाणी घालायला सांगा. वेलीवरची फुले तोडून देवपूजेला वापरा, सकाळी सूर्याला अर्ध्य देणे, देवाची पूजा प्रार्थना करणे, आपली बेडरूम स्वच्छ करणे, आपल्या कपड्याच्या घड्या करणे अशी छोटी कामे करण्याची चालना द्या. लहान मुलांचे वय सतत काहीतरी शिकण्याचे असते. आपल्या घरी सर्वांचे फोटो अल्बम असतातच, अशा वेळी फोटोना प्रसंगानुसार ठेवून कोलाज करणे फार आवडेल लहान मुलांना तसेच मुलांना ऑनलाईन लॅंग्वेज क्लासेस उपलब्ध करून त्यांच्या आवडीने दुसरी भाषा शिकणे फार फायद्याचे आहे.
चेस बोर्ड, स्नेक ऍण्ड लॅडरसारखे खेळ बोर्डवर खेळणे बुद्धीला प्रखर करतात. त्यांच्याबरोबर तुम्हीही थोडा वेळ खेळून त्यांना रममाण करा. लंगडी, लिंबू-चमचा, रस्सीखेच, उठाबश्या अशी कवायत केल्याने स्नायूंची शक्ती वाढते. शारीरिक तणाव दूर होतो.
व्यायाम किंवा योगा करण्यासाठी काही वेळ काढा. सुलभ योगासनाची चित्रे पाहून तुम्ही ही योगासने करण्याची सवय लावा. त्याने तुम्हा सर्वांची शारीरिक लवचिकता आणि स्नायूंना शक्ती मिळेल तसेच पचनाची, फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढेल. सूर्यनमस्कार केल्याने हृदय बळकट होईल. पश्चिमोतनासन, वीरभद्रासन, ताडासन, नौकासन, भुजंगासन इत्यादी योगासने मुले सहज करू शकतात.
काही शाळा विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासेस आयोजित करतात. त्या शिकण्यात काही मुलांचा वेळ त्यांच्या शिक्षणासाठी उपयोगी ठरतो. जी मुले आधीच कमी बोलतात किंवा फार कुणात मिसळत नाही त्यांच्याशी आईवडिलांनी संवाद किंवा चर्चा करून त्यांच्या मनातील समस्यांना समजावून घेणे फार महत्त्वाचे आहे. उदाहरण – काही मुले परीक्षा रद्द झाल्याने किंवा शिक्षकांशी किंवा मित्रांशी समोरासमोर भेटता येत नसल्याने चिंताग्रस्त असतात.
काही आईवडिलांमध्ये तणावग्रस्त वावरणे दिसल्याने लहान मुलांवर घातक परिणाम होतात. अशा वेळी पालकांनी घरातील वातावरण प्रेरणादायी ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यांना ऑनलाइन क्लासेस माध्यम समजावून दिले तर त्यांची चिंता कमी होईल.
आई-वडील “”वर्क फ्रॉम होम” वरच संतुष्ट राहतात. पण ऑफिसचे काम घरी करताना अनेक लोक ए.सी. लावून बेड, पलंग, खुर्च्या, सोफासेट यावर बसून सर्व कामे करतात. त्यामुळे घरात मोकळे फिरायला मुलांना फार कठीण होते. अशा वेळी आईवडिलांनी स्वत:ची व मुलांची काळजी घेतली पाहिजे.