एकसारखे कपडे, एकाच स्टाईलचे, एकाच रंगाचे.. कुणी कॉलेज, ऑफिसमध्ये असा पेहराव करून आलेले दिसले, तर त्याला मस्करीत काहीबाही बोलले जाते. अलीकडे या एकाच रंगाची फॅशन आलेली दिसून येते. एकाच रंगाच्या साड्या, एकाच पॅटर्नचे, रंगाचे ड्रेस मटेरियल, एकाच कपड्याच्या रूपात सुती ते अगदी वेस्टर्न स्टाईलचे कपडे दिसून येतात. एकाच प्रकारच्या कपड्यांची लाट आली की, ती फॅशन अगदी शहरापासून ग्रामीण भागापर्यंत पोहोचते. फॅशनचं हे रूप नव्या रूपाने अगदी लहानांपासून थोरांपर्यंत अंगीकारलं जातं आणि फॅशनचं हे रूप अगदी तारुण्याने बहरलेलंही दिसून येतं.
एखादा कार्यक्रम असो किंवा असो एखादं सार्वजनिक अथवा घरगुती सेलिब्रेशन यासाठी एकत्र येऊन कुटुंबीयांमार्फत, मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपमार्फत त्या कार्यक्रमासाठी कोणता पेहराव करावा याचं नियोजन केलं जातं. जसे एखाद्या फंक्शनच्या निमित्ताने एकाच रंगाच्या कपड्यांचा पेहराव भाव खाऊन जातो, प्रेक्षकांच्या नजरेत भरतो, त्याचप्रमाणे एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्ताने हा एकच रंग आकर्षक ठरतो.
तर काही ठिकाणी यात्रोत्सवाच्या निमित्ताने एकाच रंगांच्या साड्या वाटप केल्या जातात. तर हळदी समारंभासाठी सर्वांनी एकाच रंगाच्या साड्या परिधान करण्याचे नियोजन केले जाते किंवा विवाह समारंभाच्या निमित्ताने साऱ्यांनीच नऊवारी साडी परिधान करणे किंवा एकच स्टाईल अंगीकारणे अथवा एकाच रंगाचे कपडे परिधान करण्याकडे कल दिसून येतो.
साऱ्यांनी एकाच रंगाचे कपडे परिधान करणे ही फॅशन समारंभाच्या एकत्रिकरणाचे प्रतीकही दिसून येते. त्याचप्रमाणे औत्सुक्य, आनंद, उत्साहदेखील समारंभाच्या निमित्ताने अनुभवास मिळतो. असा लूक मोबाइलमध्ये कॅमेराबद्ध करणे, हे फोटो सोशल मीडियावर शेअर करणे आणि आठवणींच्या रूपाने जतन करून ठेवणे यासारखा आनंद नाही. एकाच रंगाची फॅशन आता समाजमनात रुळू लागलेली दिसून येत आहे.
– श्रुती कुलकर्णी