“तुम्ही भोजनाची पाकिटं बनवत आहात का?’
आवाज ऐकून मी मान वर केली आणि बघितले तर एक निम्न मध्यम वर्गीय सावळ्या रंगाची कृश काया असलेली एक स्त्री समोर उभी होती. थोडीशी जुनाट अशी साडी, हातात एक कापडी पिशवी, चेहऱ्यावर फिकटपणा, अंदाजे साठीच्या घरातील असावी ती. प्रत्युत्तरादाखल मी “हो’ म्हणालो, “…पण ही पाकिटं किष्किंधानगर, पौड रोडसाठी आहेत’, अशी पुस्तीही जोडली. “…आता तुम्ही आलाच आहात तर तुम्हाला दोन पाकिटे देतो,’ असे म्हणत मी खाण्याची दोन पाकिटे हातात घेऊन जागेवरून उठला.
माझ्या हालाचालीकडे बघत ती स्त्री सौम्य स्वरात म्हणाली, “नाही नाही! मी भोजनाची पाकिटे घ्यायला नाही आले, मला तर शेजारच्याकडून तुमच्या या अन्नसेवा उपक्रमाबद्दल कळाले. मला वाटले मीही काही मदत करावी; काही रक्कम द्यावी जेणेकरून आणखी कोणाच्या तोंडी दोन घास पडतील.’
त्या बाईंच्या औदार्याने मी पुलकीत झालो. आपल्या क्षमतेपेक्षा जास्त देणं यालाच औदार्य म्हणतात ना?
पण त्याच वेळी मी अर्धमेलाही झालो. कारण त्या बाईंचे बाह्यरूप पाहून मी, “ती भोजनाची पाकीटं मागायला आली असावी,’ असे परस्पर ठरवून टाकलं होतं. मी खजील झालो. पुढे तिने उपक्रमाची सारी माहिती घेतली आणि “उद्या देणगीची रक्कम घेऊन येते,’ असे सांगून निघून गेली. करोना आणि लॉकडाऊनच्या या बिकट प्रसंगी कोणीही अन्नापासून वंचित राहू नये यासाठीच्या व्यवस्थेत त्या माऊलीचा सिंहाचा वाटा ठरला.
या प्रसंगी एका चिमणीची एक गोष्ट आठवते. एके ठिकाणी मोठी आग लागलेली असते. परिसरातील लोक आग शमविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात. अशात एक चिमणी आपल्या इवल्याशा चोचीत कुठून तरी पाणी आणून त्या आगीवर शिंपडत रहाते. आग विझविण्यासाठी ती करत असलेला आटापिटा पाहत, एक जण तिला विचारतो की, या एवढ्या मोठ्या आगडोंबासमोर तुझ्या चोचभर पाणीने असा काय फरक पडणार आहे?’
पंखांची फडफड थांबवत ती म्हणते, “माझ्या चोचभर पाण्याचा आग विझविण्यासाठी किती उपयोग होईल, हे मला माहीत नाही; पण भविष्यात जेव्हा या आगीबद्दल चर्चा होईल तेव्हा मी मदत करणाऱ्यांच्या बाजूने उभी होते, असा उल्लेख केला जाईल, महत्वाचे ते आहे.’
बऱ्याच वेळेस मी एकटा काय करू शकतो, या विचारामुळे आपण पुढं यायचं राहून जाते. पण खरं पाहता वैयक्तिकरित्या करण्यासारखं खूप काही असतं. अन्नछत्र नाही पण एखाद्या भुकेल्या माणसाला डबा देणे सहज शक्य असते. रुग्णसेवा करणे नसेल पण कोणा एकट्या आजारी माणसास औषधं आणू देऊ शकू. कोणाला तातडीने दवाखान्याला घेऊन जाण्यास मदत करु शकू.
मुलगा परदेशी अडकल्याने सैरभैर आई वडिलांना धीर देत त्यांची काळजी घ्यायला आपण आहोत, असे आश्वासन देऊ शकू. या करिता आपण समुपदेशक असणे गरजेचे नसते. कंटाळलेल्या प्रौढांशी गप्पा मारून किंवा इतर पद्धतीने त्यांचे मन रीझवणे शक्य आहे. यासाठी खूप काही सायास पडत नसतात पण याने इतरांचे जगणे सुसह्य होते.
अर्थात हे सारे करताना नियम आणि सोशल डिस्टन्स पाळणे हे आले. माणूस म्हणून आपली ओळख आपल्या संवेदनशीलतेमुळेच होत असते. यामुळे आपल्यातही सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपत्ती कोणतीही असो ती आपल्याला कर्मांचे सुसंधान करण्याची संधि देत असते. अशा प्रसंगी सामाजिक जाणिवा उत्कट व्हायलाच हव्या. देवळाची दारं बंद असल्याने मनाची कवाडं उघडी व्हायला हवीत.
आपण स्वेच्छेने मदतीचा हात पुढे केल्यास कोणते ही संकट उलथवून टाकणे शक्य आहे. कारण आपण प्रत्येकाला मदत करू शकत नाही पण प्रत्येक जण कोणाला ना कोणाला मदत करू शकतो.
– सत्येंद्र राठी