सध्या सर्व जगाचे लक्ष आयुर्वेदाकडे, (Ayurveda) पंचकर्माकडे लागलेले आहे. काय आहे हे आयुर्वेद? पंचकर्म (Panchakarma) म्हणजे काय, ते कुणी करावेत, कुणी करू नयेत, असे अनेक प्रश्न दिसतात. त्याविषयी जाणून घेऊयात.
“आयु’ म्हणजे आयुष्य, “वेद’ म्हणजे विज्ञान
“आयुष वेद, आयुर्वेद’ (Ayurveda) जो आयुष्याचा वेद घेतो तो आयुर्वेद होय. आयुर्वेदाचे (Ayurveda) प्रमुख प्रयोजन
“स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम् आतुरस्य व्याधी परिमोक्षणम्।”
जे स्वस्थ आहेत म्हणजे व्याधीमुक्त आहेत त्यांच्या स्वास्थाचे रक्षण करणे व जे आजारी आहेत त्यांच्या रोगाचे निवारण करणे हे आयुर्वेदाचे (Ayurveda) मुख्य प्रयोजन आहे. अशा या आयुष्याचा सर्वांगीण व वैज्ञानिक दृष्टीने विचार करणारे शास्त्र म्हणजे
आयुर्वेद होय.
आयुर्वेदात (Ayurveda) प्रामुख्याने दोन प्रकारची
उपचार पद्धती अवलंबली जाते.
शमन चिकित्सा :
प्रकुपित झालेल्या दोषांना शरीराबाहेर न काढता चूर्ण, काढे,
वटी इत्यादी स्वरूपाची औषधोपचार करून शरीरात साम्य अवस्थेत आणणे होय.
शोधन चिकित्सा :
ज्यामुळे दोषांना शरीराबाहेर काढून टाकले जाते. त्या चिकित्सा पद्धतीला शोधन असे म्हणतात, उदा. एखाद्या डबक्यात पाणी आहे, तोपर्यंतच त्या जलाच्या आश्रयाने राहणारे प्राणी, शेवाळ इत्यादी जिवंत राहतात, परंतु पाणी काढून टाकल्यास या सर्वांचा नाश होतो. तसेच शरीरातील दोष बाहेर काढून टाकल्यास शरीरातील रोगांचा नाश होतो म्हणून पंचकर्माला (Panchakarma) अनन्यसाधारण असे स्थान आयुर्वेदात (Ayurveda) आहे.
(“पंच’-पाच,- “कर्म’-क्रिया)
पुढील पाच क्रियांचा समावेश पंचकमीत (Panchakarma) होतो…
पंचकर्म (Panchakarma) ही क्रिया तीन टप्यात केली जाते.
1) पूर्वकर्म 2) प्रधान कर्म 3) पश्चात कर्म
पूर्वकर्म –
म्हणजे आपण प्रधान कर्मासाठी (पंचकर्मासाठी) (Panchakarma) आपले शरीर तयार करतो यात प्रामुख्याने “स्नेहन’ आणि “स्वेदन’ येते.
स्नेहन –
म्हणजे शरीरात स्निग्ध गुण उत्पन्न करणे यासाठी तुप किंवा तेलाचे सेवन करणे व शरीराला तेल लावणे यांचा समावेश होतो. वमन व विरेचनसाठी तुप किंवा तेलाचे सेवन करावे लागते आणि ते आदल्या दिवशी रात्री घेतलेल्या आहाराचे सम्यक पचन झाल्यावर प्रात:काळी अनोशापोटी घ्यावयाचे असते.
स्वेदन –
(औषधी वाफ)
स्नेहनानंतर स्वेदन हा उपक्रम केला जातो. यामध्ये शरीराला औषधी वनस्पतींची वाफ देऊन घाम आणला जातो. स्नेहन आणि स्वेदनाचे महत्त्व सांगताना आचर्यांनी फार सुंदर उदाहरण दिले आहे. उदा. सुक्या कोरड्या रुक्ष अशा वेतास वाकवण्याचा प्रयत्न केल्यास ती तुटते व तीस तेलाची मालीश व वाफ दिल्यास ती हवी तशी वाकवून आकार देऊ शकतो.
प्रधान कर्म –
बस्ती – बस्तीला “अर्ध चिकित्सा’ असे म्हणतात. पूर्वी हा उपक्रम प्राण्यांच्या बस्तीचा (बस्ती अवयाचा) उपयोग केला जात असे, म्हणून यास “बस्ती’ असे नाव मिळाले. बस्ती ही वात रोगांसाठी विशेष कार्य करणारा उपक्रम आहे. आता मात्र प्लॅस्टिक, धातुंचे बस्ती यंत्र मिळतात यात गुदावाटे औषधी तेल, काढे आत सोडले जातात.
वमन – साध्या भाषेत सांगायचे म्हटले तर उलटी करणे होय. स्नेहन, स्वेदन करून दोष पोटात आणले जातात व नंतर औषधी द्रव्ये पाजून त्यांना मुखावाटे बाहेर काढले जाते हा उपक्रम प्रामुख्याने कफ दोषांवर लाभदायी आहे.
विरेचन – या शब्दाचा अर्थ आहे “बाहेर जाणे’/”काढून टाकणे’ अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर जुलाब करवणे असे. म्हणून स्वेहन स्वेदन करून पोटात आणलेले दोष औषध घेऊन गुदावाटे बाहेर काढून टाकले जातात. हा पित्त दोषासाठी श्रेष्ठ उपक्रम आहे.
नस्य – नाकात औषधी तेल, तुप काढा इत्यादी थेंब टाकून शिर:प्रदेशातील दोष बाहेर काढण्याच्या उपक्रमास नस्य म्हणतात. “नासाहि शिरसो द्वारम्। नाक हे शिराचे म्हणजे डोक्याचे द्वार आहे असे आयुर्वेदाचार्य (Ayurveda) सांगतात. आणि म्हणून शिर:प्रदेशी असलेल्या विकारांसाठी हा उपक्रम लाभदायी ठरतो.
रक्तमोक्षण – यात दुषित रक्त शरीराबाहेर काढले जाते. रक्तदुष्टी असल्यास हा उपक्रम उपयोगी ठरतो यात जळवा लावणे, शिरेवाटे दुषित रक्त काढणे इत्यादी समावेश होतो.
पश्चात कर्म – पथ्याचे पालन करणे हे यात मोडते. वमन विरेचनात दोष एकत्र करून पोटात आणले जातात व नंतर ते बाहेर काढले जातात. हे करताना रुग्णास तीव्र स्वरुपाचा अग्निमांद्य होतो. हा अग्नी वाढवण्यासाठी हळूहळू हलक्या आहारापासून म्हणजे पेय, पातळ खिचडी असे क्रमाक्रमाने वाढवत नेऊन गुरू आहारापर्यंत म्हणजे नेहमीचे जेवणापर्यंत आहार, हळूहळू वाढवयाचा असतो. यास “संसर्जन क्रम’ असे म्हणतात.
आहार क्रमाक्रमाने का वाढवावा, याविषयी आयुर्वेदाचार्य (Ayurveda) म्हणतात की, लहानशी ठिणगी असल्यास, त्यात छोट्या व थोड्या थोड्या गवताच्या काड्या घालून अग्नी वाढवायचा असतो. जर सुरवातीसच भरगच्च काड्या टाकल्या तर अग्निचा नाश होतो. तशीच आपल्या शरीरातील अग्निचेही आहे म्हणून पथ्य पाळणे फार महत्त्वाचे आहे. तसेच बस्ती नस्य व रक्तमोक्षण नंतर ही त्या-त्या कर्मानुसार पथ्य पाळावयाचे असतात.
पंचकर्म (Panchakarma) कोणी करावे?
बहुदोषी-म्हणजेच शरीरात खूप दोष वाढल्यामुळे व्याधींनी ग्रस्त आहेत, औषधोपचार करूनही ही व्याधी पुन्हा पुन्हा होतो, अशा रुग्णांनी तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेऊन आपल्या रोगानुसार पंचकर्म (Panchakarma) करून घ्यावे, विविध ऋतुनुसार जसे वातावरणात बदल घडतो. त्यानुसार शरीरातही बदल घडतात. त्या-त्या ऋतुनुसार शरीरातील दोषांमध्ये बदल होतात.
उदा. वर्षा ऋतूत वात अधिक बळावतो, शरदात पित्त तर वसंतात कफ या ऋतुनुसार होणाऱ्या दोषप्रकोपातून वाचण्यासाठी आचार्यांनी पंचकर्माचा (Panchakarma) सल्ला दिला आहे. आजकाल वासंतिक वमन शिबिर, शरदात विरेचन असे मोठे-मोठे उपक्रमही राबवले जातात. थोडक्यात, स्वस्थ तसेच व्याधींनी ग्रस्त व्यक्ती पंचकर्म करू शकतात.
पंचकर्म (Panchakarma) कोणी करू नये?
जो खूपच क्षीण आहे किंवा जो मृत्युच्या समीप आहे, बालक, गरोदर स्त्रिया व अती वृद्धांना देऊ नये. तसेच आचार्यांनी मानवी स्वभावाचा वेध घेत म्हटले आहे की, जो अती साहसी आहे. वैद्यांच्या आदेशाचे पालन करत नाही अशा रुग्णांनी पंचकर्म (Panchakarma) करू नये. व्यवहारात ही असे दिसते की, काही रुग्ण स्वत:च एखादे औषध घेणे सुरू करतो अथवा पथ्याचे अजिबातच पालन करत नाही.
पंचकर्मात (Panchakarma) काय टाळावे?
खूप प्रवास, खूप चालणे, एकाच ठिकाणी खूप वेळ बसून राहणे, अत्याधिक जेवण करणे, दुपारी झोपणे, मैथुन टाळावे (ब्रह्मचर्याचे पालन करावे) इत्यादी सारख्या गोष्टी टाळाव्यात. कुठल्याही प्रकारचा शारीरिक अथवा मानसिक ताण नसावा हे मुख्य उद्देश आहे.
पंचकर्माचे (Panchakarma) फायदे…
पंचकर्माने (Panchakarma) विविध आजार बरे होतात.
पंचकर्मानंतर (Panchakarma) घेतलेल्या औषधाचे कार्यकारित्व वाढते. हे सांगताना आचार्य समजवतात, जर एखाद्या कपड्याला रंग द्यायचा आहे. परंतु ते कापड मलीन झाले असेल तर त्यावर रंग नीट बसणार नाही. यासाठी आधी कपड्याला स्वच्छ धुवून घ्यावे लागेल आणि नंतर त्यावर रंग द्यावा लागेल. म्हणजे रंग नीट बसेल. तसेच शरीराचेही आहे. पंचकर्मानंतर दोष बाहेर काढून टाकून औषधोपचार केल्यास औषध चांगले लागू पडते.
ऋतुमानानुसार पंचकर्म (Panchakarma) केल्यास त्या-त्या दोषांच्या प्रकोपापासून तर वाचतोच आणि स्वास्थ्य ही टिकून राहते.
नियमित व नीट पंचकर्म (Panchakarma) केल्यास वृद्धावस्था उशिरा येते. शरीरपुष्ट होते. बल वाढते. कांती सुंदर होते. पचनशक्ति सुधारते आणि स्वास्थ्य चिरकाल टिकून राहते.
अशा प्रकारे शरीराचा शुद्धीसाठी पंचकर्म (Panchakarma) हे अतिव उपयोगी आहे. थोडक्यात म्हणजे, आजच्या या धावपळीच्या जीवनात स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी आयुर्वेद आणि पंचकर्म (Panchakarma) हा राजमार्ग आहे.