सर्वांगासन हे अत्यंत सुंदर आसन आहे. याला आसनांचा राजा म्हटले जाते. प्रथम उताणे झोपावे. पाय हळूहळू वर न्यावे. पाय, नितंब आणि पाठ सरळ रेषेत ठेवावे. हातांचे कोपरे जमिनीला टेकवून दोन्ही हातांनी पाठीला आधार द्यावा. खांदे आणि मान जमिनीवर टेकलेली असू द्यावी. दृष्टि पायाच्या अंगठ्यावर स्थिर असावी. श्वसन संथ असावे. हे आसन दोन मिनिटे करावे पण अर्ध्या तासापर्यंतसुद्धा अवयव ध्यान करून हे आसन टिकवता येते. शरीराच्या सर्व अवयवांना चांगला व्यायाम देणारे अत्यंत महत्त्वाचे आसन होय. हे आसन सकाळी व संध्याकाळी दोन वेळा करावे.(sarvangasana benefits)
या आसनामुळे थॉयराइड ग्रंथींना व्यायाम मिळतो. शरीर बलवान व निरोगी बनते. नवा जोम व उत्साह निर्माण होतो. गर्भाशयाच्या तक्रारी दूर होतात. यामुळे रक्ताभिसरण, श्वसन, पचन व उत्सर्जन आणि नाडीतंत्र सुधारते.
तळपायांना येणारी सूज, होणारी आग कमी होते. यामुळे अपचन, अजीर्ण, मलावरोध, आतड्याचे रोग नाहिसे होतात. पंडुरोगावर हे आसन उपयुक्त आहे. हे आसन केल्यामुळे कुंडलिनी जागृत होते, पाठीचा कणा लवचिक राहतो, उष्णतेचे विकार दूर होतात, स्त्रियांच्या पाळी आणि गर्भाशयाच्या तक्रारी दूर होतात.
आतड्याचा जीर्ण रोग नाहीसा होतो. स्वप्नदोष दूर होतो. जननेंद्रीय व गुदद्वाराचे रोग नाहीसे होतात. मुत्राशयातील पीडा दूर होतात.
विस्तृतपाद सर्वांगासन -1
पाद म्हणजे पाय आणि विस्तृत म्हणजे विस्तारलेले. सर्वांगासन केल्यानंतर डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे व उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे घ्यावा व यात स्थिर राहावे. श्वसन संथ चालू ठेवावे. अशाप्रकारे स्थिरता आणून विस्तृतपाद सर्वांगासन प्रकार एक टिकवता येतो. आसन सोडताना दोन्ही पाय जुळवून परत सर्वांसनाची स्थितीत घ्यावी.
विस्तृतपाद सर्वांगासन-2
यामध्ये सर्वांगासनाची पूर्वस्थिती घेतल्यानंतर डावा पाय जास्तीत जास्त पुढच्या बाजूस व उजवा पाय जास्तीत जास्त मागच्या बाजूस घ्यावा. या स्थितीत स्थिर रहावे. श्वसन संथ चालू ठेवावे. आसन सोडताना परत सर्वांगासन स्थितीत यावे.
तिर्यक सर्वांगासन :
सर्वांगासनाची स्थिती घेतल्यानंतर तिर्यक म्हणजे कंबरेला तिरका पीळ द्यायचा आहे. डावा पाय डावीकडे व उजवा पाय उजवीकडे घ्यावा मग डावा पाय पुढून उजवीकडे व उजवा पाय मागून डावीकडे असा कंबरेला पीळ द्यावा. अशास्थितीत स्थिर राहावे. तसे अवघड आहे पण योगतज्ञाच्या मार्गदर्शनाखाली जमू शकते. या स्थितीत श्वसन संथ चालू ठेवावे. आसन सोडताना कंबरेचा पीळ काढून विस्तृतपाद सर्वांगासन स्थिती घ्यावी मग पाय जुळवून सर्वांगासन स्थिती घ्यावी. एकदा डावीकडून आणि एकदा उजवीकडून असे तिर्यक सर्वांगासन करता येते. पाय जुळवून परत सर्वांगासनात यावे.
भूनमन- भूस्पर्श सर्वांगासन
या स्थितीत सर्वांगासन पूर्व स्थिती घेतल्यानंतर एकेक पाय आपण पुढच्या दिशेने खाली आणत आपण जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करतो. एकदा डावा पाय व एकदा उजवा पाय असे भूस्पर्श सर्वांगासन करता येते. आसन पूर्ण झाल्यावर संथ श्वसन करावे. श्वास घेत डावा पाय वर उचलून उजव्या पायास जुळवून घ्यावा व सर्वांगासन पूर्वस्थितीत यावे. तसेच उजवा पाय वर उचलून डावा पायास जुळवून घेता येतो. एकेका पायाचा अंगठा जमिनीला सरावाने लावता येतो.
सर्वांगासनाचे विविध प्रकार करताना दोन्ही पाय गुडघ्यात सरळ ठेवावे. खांद्यापासून कंबरेपर्यंतचे शरीर हे व हातांनी छातीच्या बरगड्या पकडलेली स्थिती सुरुवातीपासून बदलू नये. प्रत्येक प्रकार 15 सेकंदांपासून 3 मिनिटांपर्यंत टिकवण्याचा प्रयत्न योगतज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली करावा.(sarvangasana benefits)