भारतात आवळा या फळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आवळा हिरवा असो की सुकलेला, चूर्ण केलेला किंवा मुरवलेला, त्याचे जो सेवन करील, त्याची जीवनशक्ती वाढते व रोगनिवारण होते. आवळ्याचे शास्त्रीय नाव ‘एम्ब्लिका ऑफिसिनेलीस’ असे आहे.
‘एम्ब्लिका’ हे नाव आवळ्याचे संस्कृत नाव ‘अम्लिका’चा अपभ्रंश आहे. इंग्रजीत त्याला ‘एम्बिका मायरोबेलन’ असे म्हणतात. आवळ्यामध्ये पाणी ८१.२ टक्के, प्रोटीन ०५ टक्के, लोह १.०२ मि. ग्राम (१०० ग्रॅममध्ये) व ‘क’ जीवनसत्व ६०० मि. ग्रॅम (१०० ग्रॅममध्ये) मिळते. एकूणच ‘क’ जीवनसत्व आवळ्यात भरपूर प्रमाणात असते.
३ हजार वर्षापूर्वी चरकाचार्यानी त्याचे वर्णन ‘सर्वरोगहारक’ असे केले आहे. आवळ्याचा वृक्ष मध्यम आकाराचा, २० ते २५ फूट उंचीचा असतो. पाने चिंचेच्या पानासारखी बारीक असतात. मात्र पानांचा देठ लांब असतो. या झाडास पिवळी लहान फुले येतात.
फळांचे झुबके असतात. साल खडबडीत भस्मरंगी असते. ही झाडे भारतात विनासायास उगवतात व झाडाचे मूळ सोडल्यास सर्व भाग औषधात वापरतात. मात्र ताजा आवळा जास्त गुणकारी असतो.
आंबटपणामुळे शरीरात पित्त वाढते. पण आवळा आंबट असला तरी खाल्ल्यावर त्याचा विपाक मधुर होतो. त्यामुळे पित्तप्रकोप शांत होतो. पित्तशमनासाठी तो अत्यंत उपकारक आहे. हिरडा, बेहडा व आवळा समप्रमाणांत घेऊन त्याचे जे चूर्ण तयार करतात, त्यास ‘त्रिफळाचूर्ण’ म्हणतात. हे एक रसायन आहे याने कफ, पित्त व मलावरोध दूर होतो.
सकाळी अनशेपोटी आवळ्याचा रस प्यायल्यास फार फायदा होतो. बारीक ताप जातो, तापात हा रस चमचाभर घेतल्यास रुग्णाला अशक्तपणा जाणवत नाही. जेवणापूर्वी एक-दोन आवळे खाल्ले तर पचनशक्ती वाढते व आम्लपित्त, अति तहान, घशातील जळजळ दूर होते.
अति थंड वातावरणात शीत व नाजूक प्रकृतीच्या तसेच कफ प्रकृतीच्या रुग्णांनी आवळा वैद्यकीय सल्ल्याशिवाय खाऊ नये. रक्तात आहारदोषाने क्षार, आम्ल, कृमी इ.ची अनावश्यक वाढ झाल्यास रक्त दूषित होते व अनेक विकृती निर्माण होतात. हे दोष नाहीसे करण्याची शक्ती आवळ्यात आहे.
आवळ्याचे चूर्ण खडीसाखरेबरोबर खाल्यास स्त्रियांना बहुमुत्रतेच्या रोगात व प्रदररोगात फायदा होतो. आवळ्याच्या रसात हळद व मध घालून चाटल्याने सर्व प्रकारचा प्रमेह दूर होतो. आवळ्याचे चूर्ण दुधात कालवून रात्री झोपताना ते केसावर बांधल्याने केस वाढतात.
मेंदूतील जास्त उष्णता दूर होऊन नाकाचा घोणा फुटण्याचे बंद होते. सतेज कांतीसाठी दोन ताजे आवळे व पांढरे तीळ पाण्यात भिजवून बारीक वाटून अंगाला लावून ठेवावे. अर्धा-एक तासाने स्नान करावे. आवळा रक्ताभिसरण व स्मरणशक्तीसाठी अत्यंत फायदेशीर आहे.