ताडफळाचे झाड (बोरगॅस फ्लॅबीझीफर) खूपच उपयोगी आहे. त्याच्या पातीपासून छत्र्या, पंखे बनवितात. खोड घराचे बहाले व पन्हाळे बनविण्यास उपयोगी आहे. आश्चर्य म्हणजे सिंहल द्वीप, कर्नाटक, द्रवीड येथे अजूनही ताडपत्रावर पोथ्या लिहितात.
ताडपत्राची पाने दूध पाण्यात उकळून वाळवतात व लोखंडी खिळ्यांचा उपयोग लेखणीसारखा करून त्यावर मजकूर लिहितात. या ताडपत्रावर मजकूर कागदापेक्षा खूप वर्ष अर्थात् वर्षानुवर्ष टिकतो. याची फळे म्हणजे उन्हाळ्यातले ताडगोळे! खरे तर हे ताडगोळे मूळचे समुद्र किनाऱ्यालगतचे. या ताडफळांचा रंग तपकिरी असतो. ताडफळांत जेलीसारखा किंचित पिठूळ किंचित गोड असा गर असतो.
डाएटिंग करणाऱ्यास उपयुक्त
कोवळा गर हा जर रोज उन्हाळ्यातील आहारात समाविष्ट केला तर वजन नियंत्रित होते. ताडफळ हे लो कॅलरी फळ आहे. त्याचा उष्मांक 29 एवढा कमी आह तर शर्करेचे प्रमाण हे 20.7 आहे.
वात व पित्तनाश
ह्या वृक्षापासून ताडी काढतात. जी काढल्यावर लगेच प्यायली असता पित्ताचा नाश करते. ही मादक असते; परंतु ही आंबट झाली असता पित्तकर होते. ताडी वातनाशकही आहे. अशाप्रकारे ताडफळीचे झाड हे औषधी आणि उपयुक्त आहे.