-डॉ. भावना पारीख
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार 2005 ते 2017 या बारा वर्षांमध्ये 84 दशलक्ष लोकांचा मृत्यू कर्करोगामुळे झाला आहे. त्यामुळे कर्करोग हे जगभरातील मृत्यूंचं मुख्य कारण असल्याचं सिद्ध झालं आहे. अशा या कर्करोगाविषयी जनजागृती करणं आवश्यक आहे. आपल्याला कर्करोग झाला आहे हे समजताच आपले हातपाय गळून जातात. मुळात आपण जागरूक असू तर कर्करोगासारख्या आजारापासून आपण आपली मुक्तता करून घेऊ शकतो.
कर्करोग हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे. हा कर्करोग कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो. कॅन्सरचे कितीतरी प्रकार असून या सगळ्या प्रकारांमधला समान दुवा म्हणजे अनिर्बंध पेशींची वाढ. सामान्यपणे पेशी विभाजन क्रमाने नियंत्रित पद्धतीने होते.
शरीराच्या आवश्यकतेनुसार नव्या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. पेशी विभाजनाची ही नेहमीची पद्धत आहे. कधी कधी पेशी विभाजन नव्या पेशींची आवश्यकता नसताना होत राहते. या अतिरिक्त पेशींचे गाठोडे म्हणजेच अर्बुद किंवा ट्युमर (गाठी) होय. हे ट्युमर दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे बिनाइन ट्युमर म्हणजे कर्करोगाची गाठ आणि दुसरा प्रकार म्हणजे मारक गाठी (मॅलिग्नंट).
पहिल्या प्रकारची गाठ ही सहज काढून टाकता येते. या गाठी नवनवीन अवयवांमध्ये नव्याने कर्करोगाच्या गाठी तयार करत नाहीत. मात्र दुसऱ्या प्रकारात कर्करोगाच्या अनियमित आणि अनिर्बंध वाढणाऱ्या पेशींच्या गाठीपासून मारक गाठी बनतात. या गाठी सभोवतालच्या उती आणि अवयवांमध्ये पसरतात. गाठीमधून बाहेर पडलेल्या पेशी लसिकेमार्फत किंवा रक्तवाहिन्यांमधून इतर अवयवांमध्ये प्रवेश घेतात. त्यामुळे मूळ अवयवाबरोबरच इतर अवयवांमध्येही कर्करोग पसरतो.
तसंच आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यात कर्करोग होऊ शकतो. काही प्रकारचे कर्करोग लहान मुलांमध्ये होतात, उदाहरणार्थ, डोळ्याच्या दृष्टिपटलाच्या पेशींचा कर्करोग तसंच बहुतेक प्रकारचे ल्युकेमिया म्हणजे रक्ताचे कर्करोग लहानपणी होतात. स्तनांचा, प्रोस्टेट किंवा पौरुष ग्रंथी आणि मोठ्या आतड्याचा कर्करोग प्रौढपणी होतो. या अर्बुदविज्ञानाचा अभ्यास केल्यास निदान आणि उपचाराद्वारे कर्करोग हा आजार बरा होऊ शकतो.
काय टाळाल?
-शरीराला उच्च कोलेस्टेरॉल देणारे पदार्थ जसं की मांस, लिव्हर आणि दुधाचे पदार्थासारखे आहार टाळावेत.
-अतितेलकट पदार्थ टाळावे.
-सकाळी दहा ते दुपारी 4 वाजेपर्यंत उन्हात उभे राहू नये.
-मद्यपान टाळावे.
काय करावं?
-उन्हातून फिरताना मोठी हॅट वापरावी.
-उन्हातून जाताना 15 किंवा त्याहून अधिक संरक्षक घटक असलेलेच क्रीम लावावं.
पेरू, द्राक्ष, अननस यासारख्या फळांचा आणि टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या अशा भाज्यांचा तसंच कडधान्याचा आहारात समावेश करावा. तसंच आहारात पास्ता, तांदूळ आणि घेवडा अशा पदार्थांचा समावेशक करावा. थोडक्यात तंतुमय पदार्थाचे सेवन, जीवनसत्त्व, क्षार, तेलाचे कमी प्रमाण आणि संतुलित आहार घेतल्याने कर्करोगाची शक्यता कमी होते.
कॅन्सरची रूपरेषा आणि उपचार (भाग-2)