पुणे – हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे खाजगी जीवन हा चाहत्यांसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय राहिला आहे. कलाकार मंडळी मॉल-हॉटेल, जिम, किंवा सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसल्यास प्रसारमाध्यमांत त्याची चर्चा चवीने रंगते. हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात पापाराझीं (paparazzi) चा मोलाचा वाटा असतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे ‘पापाराझी’ (paparazzi) आहेत तरी कोण? कलाकारांच्या नकळत त्यांचे फोटो काढणाऱ्या छायाचित्रकारांना ‘पापाराझी’ (paparazzi) छायाचित्रकार असे म्हणतात. ‘पापाराझी’ (paparazzi) या शब्दाचा उगम कसा झाला याचीही रंजक कथा आहे. १९६० मध्ये ‘ला डॉलसे विटा’ या इटालियन चित्रपटात वॉल्टर सँन्टेसो या अभिनेत्याने पापाराझो या छायाचित्रकाराची भूमिका साकारली होती. यावरून ‘पापाराझी’ हा शब्द रूढ झाला. बॉलीवूडमध्ये पापाराझी ही संस्कृती तशी उशिराच उदयाला आली आहे.
दरम्यान, खरं पहिला गेलं तर पापाराझींच आयुष्य काही सोपं नाही. जिथे आपल्याला ग्लॅमर आणि सतत सेलिब्रिटीसोबत राहणं दिसतं. त्यामागे असते या पापाराझींची मेहनत आणि तासंतास सेलिब्रिटींची वाट पाहण्याचं कसब. एखादा सेलिब्रिटी कधी बाहेर येईल किंवा हॉटेल, जिम आणि एअरपोर्टला पोचेल याची काहीच शाश्वती नसते. ऊन, पाऊस, वाऱ्याची तमा न बाळगता हातात जड कॅमेरा धरून गर्दीतून वाट काढत परफेक्ट शॉट (फोटो) घेणं सोपं नसतंच. पण तरीही ते सर्व प्रयत्न करून तो पापाराझी (paparazzi) मिळवतातच. मात्र, अशा परिस्थिती सुद्धा पापाराझींना या मागे तुटपुंजे मानधन मिळत असल्याचे दिसून येते आहे.
सध्या बॉलिवूडमधील मानव मांगलानी, विरल भायानी, योगेन शाह, आणि जितेंद्र चावला हे प्रमुख पापाराझी (paparazzi) छायाचित्रकार असून यांच्याकडे १० ते १५ छायाचित्रकार काम करतात. या क्षेत्रात काम करणाऱ्या छायाचित्रकाराकडे स्वत:ची दुचाकी, कॅमेरा, लॅपटॉप आणि चांगल्या प्रतीचा मोबाईल असणे जरुरीचे असते. आपण काढलेली छायाचित्रे वायफाय किंवा इंटरनेटच्या मदतीने मोबाइलमध्ये टाकून आपल्या कंपनीस, वृत्तपत्रास आणि समाजमाध्यमावर पाठवली जातात.
दरम्यान, बॉलिवूडमधील खान मंडळी, प्रियंका चोप्रा, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, रणबीर सिंग, कपूर घराणे, विकी कौशल, राजकुमार राव, अनन्या पांडे, नताशा पूनावाला, करण जोहर, आलिया भट, शाहीद कपूर, मलायका अरोरा, दिशा पटनी, टायगर श्रॉफ, जान्हवी कपूर, फरहान अख्तर यांच्या छायाचित्रांना जास्त मागणी असल्याचे या क्षेत्रातील छायाचित्रकार सांगतात.
तसेच, आता यामध्ये स्टार किड्सचा सुद्धा शिरकाव होत आहे. तैमूर अली खान, सुहाना, अबराम, सनी लियोनची मुले, अब्राहम अली खान, आराध्या बच्चन, इनाया खेमू, अक्षय कुमारची मुलगी नितारा ही कलाकारांची मुलं प्रेक्षकांच्या खास आवडीची आहेत. अभिनेता सैफ आणि करिनाचे छोटे नवाब तैमूर अली खान हे पापाराझी (paparazzi) छायाचित्रकारांचे विशेष लाडके आहेत. असं देखील सांगण्यात येत कि, अभिनेता शाहरुख खान आणि करिना कपूर यांनी या छायाचित्रकारांना मुलांचे फोटो घेण्यास सक्त मनाई केली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘करोना व्हायरस’च्या वाढत्या फैलावामुळे पापाराझींना या सगळ्यातून मोठा ब्रेक मिळाला होता. मात्र आता सर्व काही पूर्व पदावर आल्यामुळे या पापाराझीं (paparazzi) नी पुन्हा एकदा आपले शस्त्र हाती घेऊन नव्या जोमाने आणि नव्या दमाने आपल्या कामाचा श्री गेणेशा केला आहे आणि त्यांच्या कामाचे कौतुकदेखील होताना पाहायला मिळत आहे.
– ऋषिकेश जंगम