भाग-2
सर्दीमध्ये सुंठेपेक्षा मिरे अधिक चांगले असतात. साध्या सर्दीवर मिरे उत्तम असतात. सतत सर्दी असणाऱ्या शिडशिडीत मनुष्याला रोज दुधामध्ये मिरपावडर टाकून प्यायला दिल्याने रसवृद्धी होते व त्याची प्रकृती चांगली सुधारते. मुगाच्या सारामध्ये, तुरीच्या डाळीच्या आमटीत, भाजीत, दुधात, चहामध्ये मिरे शक्य तितक्या अधिक प्रमाणात वापरावेत. मिरे कुटून ठेवू नयेत. रोज ताजे कुटून वापरावेत. मिरे नुसते चावूनही खाता येतात. काकडीच्या कोशिंबिरीत व दहीवड्यात मिरे घातले जातात. थोडक्यात वातकफाच्या विकारांत, सर्दी, खोकला व श्वासाच्या रोगात मिरे खूप उपयुक्त आहेत.
मिरे तिखट, तीक्ष्ण, अग्निप्रदीप्त करणारे, कफ व वायुनाशक, गरम पित्तकारक व रुक्ष आहेत. ते श्वास, शूळ व कृमीरोगावर गुणकारी आहेत. पांढरे मिरे तिखट, उष्ण, रसायन व सारक आहेत. ते त्रिदोष दूर करणारे, विशेषत: नेत्ररोग, विष व भूतबाधासम विकार नष्ट करणारे आहेत. हिरवे मिरे पाकात मधुर, कमी उष्ण, तिखट, जड, थोडे तीक्ष्ण तसेच कफनाशक आहेत ते पित्तकारक नसतात. सुश्रुतांच्या मते पांढरे मिरे शीतवर्य आहेत. काळ्या मिऱ्यांपेक्षा पांढऱ्या मिऱ्यांना ते श्रेष्ठ व चक्षुष्य समजतात.
धन्वंतरी मिऱ्याला “जंतुसंताननाशनम्’ अर्थात सर्व प्रकारचे बॅक्टेरिया, व्हायरस वगैरे जंतूंचा नाश करणारे मानतात. राजनिघुंटकार यांच्या मते मिरे हृदयरोगहारक आहेत.
मिऱ्यांमध्ये तिखट रस असल्याने ते दीपक व शुलग्न आहेत. त्यामुळे अपचन, उदरशूळ, पोट फुगणे, अग्निमांद्य, मूळव्याध, अतिसार, ग्रहणी, कृमीरोग वगैरे विकारांवर मिरे गुणकारी आहेत. मिरे व लसूण वाटून भोजनापूर्वी पहिला घास घेताना तुपाबरोबर खाल्ल्याने वायू दूर होतो. योग्य प्रमाणात नेहमी मिऱ्याचा वापर करणाऱ्याला वायूचा त्रास कधीच होत नाही. जड अन्न सेवन करणाऱ्याने अन्न लवकर पचण्यासाठी भोजनाबरोबर मिऱ्यांचे सेवन करणे हितावह आहे.
जीर्ण ज्वरामध्ये मिरीचा काढा गुणकारी ठरतो. पांढरे मिरे, तूप आणि साखर एकत्र करून खाल्ल्याने मेंदूतील उष्णता शांत होते व डोळ्याचे तेज वाढते. नेत्रांजनात पांढरे मिरे घातल्याने डोळ्यातील घाण बाहेर येऊन दृष्टी सतेज होते. मिऱ्याचे दोन-तीन दाणे रोज सेवन केल्याने कोणताही रोग होत नाही. गरम दुधात मिरपूड व साखर घालून प्यायल्याने सर्दी बरी होते.
मिऱ्याचे चूर्ण घालून उकळलेले दूध प्यायल्याने खोकला बरा होतो.पाव चमचा मिऱ्याचे चूर्ण, तीन चमचे मध व साखर एकत्र करून ते चाटण चाटल्याने खोकला बरा होतो.मिऱ्याचे बारीक चूर्ण, तूप, मध व साखर एकत्र करून चाटल्याने सर्व प्रकारचा खोकला बरा होतो. रोज पंधरा वीस मिरे वाटून मधाबरोबर चाटल्याने श्वासविकारावर फायदा होतो. मिऱ्याचे चूर्ण, दही व गूळ एकत्र करून खाल्ल्याने दीर्घकाळची सर्दी बरी होते. मुलांना मिऱ्याचे चूर्ण तुपात व साखरेत कालवून सकाळ-संध्याकाळ चाटवल्याने अग्नी प्रदीप्त होतो, मुलांचा अशक्तपणा नाहीसा होतो व सर्दी बरी होते.
आठ ते दहा मिरे वाटून ते दोन भांडी पाण्यात घालून त्याचा एक अष्टमांश काढा करावा. त्यात तीन चार चमचे साखर घालून हा काढा प्यायला दिल्याने ताप उतरतो. मिरपुडीचा काढा घेतल्याने ताप उतरतो व सुस्ती उडून जाते. मिऱ्याचे चूर्ण तुळशीच्या रसात व मधात घालून प्यायला दिल्याने विषमज्वर-मलेरिया नाहीसा होतो. मिरे आणि मीठ एकत्र करून घेतल्याने उलट्या थांबतात.
ताजा पुदिना, खारीक, मिरे, सैंधव मीठ, हिंग, बेदाणे व जिरे हे जिन्नस एकत्र वाटून त्याची चटणी करावी. नंतर त्यात लिंबू पिळावे. ही चटणी खाल्ल्याने तोंडावरील फिकटपणा व वायू दूर होऊन रुची व स्वाद निर्माण होतो तसेच पचनशक्ती वाढते. मिऱ्याचा काढा करून प्यायल्याने अथवा सुंठ, मिरी, पिंपळी हिरड्याचे चूर्ण मधात घालून चाटल्याने अपचन व पोट फुगणे हे विकार बरे होतात.
मिरे, चित्रक, पादेलोण ताकात घालून प्यायल्याने गोळा उठणे, उदररोग, मंदाग्नी, प्लीहा वाढणे, संग्रहणी व मूळव्याध यांमध्ये फायदा होतो. मिऱ्याचे बारीक चूर्ण मधात घालून ते चाटून वर ताक प्यायल्याने किंवा फक्त ताकाबरोबर मिऱ्याचे चूर्ण घेतल्याने जुना मुरडा नाहीसा होतो. दहा मिरे, तुपात भाजलेला हिंग व दोन चमचे अफू एकत्र करून त्याच्या बारा गोळ्या बनवाव्यात. दिवसातून तीन-चार वेळा एक-एक गोळी पाण्याबरोबर घेतल्याने कॉलरा आटोक्यात येतो.
एक चमचा मिरे, दोन तीन चमचे हिंग व दोन चमचे कापूर घेऊन, प्रथम कापूर व हिंग एकत्र करून नंतर त्यात मिरीपूड घालावी व त्यातून सोळा गोळ्या बनवाव्यात. अर्ध्या-अर्ध्या तासाने एक-एक गोळी दिल्याने उलट्या व जुलाब बंद होतात आणि चार-सहा तासातच कॉलरा आटोक्यात येतो. कॉलरामध्ये हाता-पायातून कळा निघत असतील तर कांद्याच्या रसात मिऱ्याचे चूर्ण घालून मालीश केल्याने फायदा होतो.
आले व लिंबाच्या रसात पाच ग्रॅम मिऱ्याचे चूर्ण घालून प्यायल्याने उदरशूळ बरा होतो. मिऱ्याचे चूर्ण, साखर आणि तूप एकत्र करून खाल्ल्याने चक्कर येणे, भ्रम होणे वगैरे विकारांत फायदा होतो. दही व जुन्या गुळात मिरे घालून ते प्यायला दिल्याने नाकातून रक्त पडण्याचे बंद होते. मिऱ्याचे चूर्ण तुपाबरोबर चाटल्याने तसेच तुपात मिरे वाटून लेप केल्याने शीतपित्त बरे होते.
मिरे थंड पाण्यात बारीक वाटून त्याचा लेप केल्याने वायूने अंग आखडले असल्यास त्यावर फायदा होतो. मिरे व गंधक एकत्र वाटून तुपात खूप खलावे. हे औषध शरीरावर चोळून उन्हात बसल्याने खरूज खवडे बरे होतात. पांढरे मिरे दह्यात अथवा मधात खलून सकाळ-संध्याकाळ डोळ्यात घातल्याने रातांधळेपणा दूर होतो. मिरे पाण्यात घासून रांजणवाडीवर त्याचा लेप लावल्याने राजंणवाडी लवकर पिकून फुटते.
मिरीचे चूर्ण डोळ्यात घातल्याने बेशुद्ध झालेला मनुष्य शुद्धीवर येतो किंवा बेशुद्ध मनुष्याच्या नाकात मिरीचे चूर्ण फुंकल्याने त्याला पुष्कळ शिंका येऊन त्याची मुर्च्छा उतरते. मिऱ्याचे चूर्ण हुंगल्याने खूप शिंका येतात. मिऱ्याचे चूर्ण लोण्यात कालवून ते खाल्ल्याने चढलेले विष उतरते. मिरे अतिरिक्त प्रमाणात घेतल्याने जठर व आतड्यांमध्ये दाह होणे, पोटात कळा येणे, उलट्या होणे हे विकार होतात; तसेच त्यामुळे मूत्राशय व मूत्रनलिकेत तीव्र उत्तेजना मिळते. त्वचेवर शीतपित्ताच्या गांधी उठतात. आतड्यात व गुदनलिकेत दाह होत असेल, तर त्याचा उपयोग करू नये.
मिरे उष्ण व रुक्ष आहेत. उदरपिडा, करपट ढेकर व पोट फुगणे हे विकार दूर करून कामवासना उत्तेजित करतात व विरेचनाचे काम करतात. याशिवाय वरचेवर येणारे ढेकर, अरुची, जीर्णज्वर, दंतशूळ, हिरड्यांची सूज, यकृतपिडा, प्लीहावृद्धी, कटिवात, पक्षाघात, सफेत कोड, गंडमाळ, नेत्ररोग, स्त्रियांच्या मासिक पाळीतील त्रास या सर्व विकारांवर मिऱ्याचे सेवन उपयुक्त व हितावह असते.
सुजाता गानू