रजोनिवृत्ती ही या काळात स्त्रीमध्ये केवळ शारीरिकच नव्हे तर अनेक मानसिक बदलही घेऊन येते. या काळात स्त्री मध्ये होणारे शारीरिक बदल आपण पाहिले, त्यांचा सामना कसा करता येऊ शकतो हेदेखील पाहिले, आता आपण या काळात होणाऱ्या काही मानसिक बदलांवर प्रकाश टाकूया आणि सोबतच अशा वेळेस मनाचे आणि एकुणच मग आपले स्वत:चे स्वास्थ्य कसे व्यवस्थित ठेवता येईल याबद्दल विचार करूया. हे करत असताना सर्वात आधी एक लक्षात घ्यावे लागेल की, उपाय प्रत्येकीसाठी वेगवेगळे आहेत. यात सब घोडे बारा टके असे काही नसते. यामध्ये होणारे त्रास आणि लक्षणे ही सर्वच स्त्रीयांना जाणवतील असेही काही नाही. त्यामुळे प्रत्येकीसाठी डॉक्टर वेगवेगळे उपाय सूववू शकतात. छोट्या छोट्या तक्रारींसाठी साधे, सोपे आणि सूलभ उपाय करावे लागतात. रजोनिवृत्तीनंतर आपण आयुष्याचा एक तृतीयांश भाग जगणार असतो हे लक्षात घेतले पाहिजे. यासाठी त्याचे नियोजन करावेच लागेल. म्हणजे त्रास कमी होईल आणि रजोनिवृत्ती सुसह्य होईल.
– डॉ. वृंदा कार्येकर (होलिस्टिक हेल्थ कन्सल्टंट)
रजोनिवृत्तीविषयी माहिती घेताना रजोनिवृत्ती म्हणजे नेमकं काय हे आपण पाहिलं. त्याची लक्षणे पाहिली. काही ठळक असे शारीरिक बदलही पाहिले. छोट्या-मोठ्या काही तक्रारीही पाहिल्या. या काळात हाडे ठिसूळ होतात हेदेखील पाहिले. खरं तर हे सगळं वाचून तुम्ही घाबरून गेला असाल.. यावर आता काय उपाय करता येईल याचा विचारही तुम्ही सुरू केला असेल. रजोनिवृत्तीची उपाययोजना नेमकी कशी सुरू करायची याबाबतही तुमच्या मनात अनेक गोष्टी येऊन गेल्या असतील. शेजारच्या बाईला संप्रेरके दिली, मला का नाहीत… बहिणीला पोटात गाठ आली, नणंदेचं थेट पिशवी काढायचं ऑपरेशन झालं, आपलं काय होईल.. अशा शंकाही येत असतील मनात.
आता नवरा-बायको संबंधही दुरावतील, मी सारखी रडत का आहे.. इतकी भावनाप्रधान मी कधीच नव्हते, मग आता या टिव्हीवरच्या मूर्ख मालिका पाहून माझ्या डोळ्यात पाणी का येतंय.. वेड तर नाही ना लागलं मला.. यासाठी जर मी मनोविकारतज्ज्ञाकडे गेले तर शेजारी-पाजारी काय म्हणतील.. अशी जणू प्रश्नांची भेंडोळीच आपल्या भोवताली सुरू होते. कारण ही रजोनिवृत्ती स्त्रीमध्ये केवळ शारीरिकच नव्हे तर अनेक मानसिक बदलही घेऊन येते. या काळात स्त्री मध्ये होणारे शारीरिक बदल आपण पाहिले, त्यांचा सामना कसा करता येऊ शकतो हेदेखील पाहिले, आता आपण या काळात होणाऱ्या काही मानसिक बदलांवर प्रकाश टाकूया आणि सोबतच अशा वेळेस मनाचे आणि एकुणच मग आपले स्वत:चे स्वास्थ्य कसे व्यवस्थित ठेवता येईल याबद्दल विचार करूया.
हे करत असताना सर्वात आधी एक लक्षात घ्यावे लागेल की, उपाय प्रत्येकीसाठी वेगवेगळे आहेत. यात सब घोडे बारा टके असे काही नसते. यामध्ये होणारे त्रास आणि लक्षणे ही सर्वच स्त्रीयांना जाणवतील असेही काही नाही. त्यामुळे प्रत्येकीसाठी डॉक्टर वेगवेगळे उपाय सूववू शकतात. छोट्या छोट्या तक्रारींसाठी साधे, सोपे आणि सूलभ उपाय करावे लागतात. परंतु रजोनिवृत्तीनंतर ह्रदयविकारात वाढ होते व हाडे ठिसूळ होतात. यासाठी मग दीर्घकाळ उपचार करावे लागतात. हे टाळण्यासाठी रजोनिवृत्ती म्हणजे नेमकं काय याची माहिती पुस्तकातून घ्या. डॉक्टरांना विचारा. सध्या आयुर्मान वाढलंय. त्यामुळे रजोनिवृत्तीनंतर आपण आयुष्याचा एक तृतीयांश भाग जगणार असतो हे लक्षात घेतले पाहिजे. यासाठी त्याचे नियोजन करावेच लागेल. म्हणजे त्रास कमी होईल आणि रजोनिवृत्ती सुसह्य होईल.
प्रत्येक स्त्री च्या आयुष्यातील रजोनिवृत्ती हा एक अपरिहार्य आणि अटळ असा टप्पा आहे. तो आनंदाने स्वीकारायला हवा. रजोनिवृत्ती म्हणजे पाळी येण्याची प्रक्रिया बंद होते. इस्ट्रोजेनमुळे रक्तवाहिन्या व ह्रदय यांचे आरोग्य चांगले राहते. हाडातील कॅल्शिअम व घनता योग्य राहाते. मुत्राशय व मुत्रनलिका यांची क्रिया ही याच इस्ट्रोजेनमुळे सुरळित होते. तसेच योनिमार्गाचा लवचिकपणा, ओलसरपणा, सुखकर क्रिया याच इस्ट्रोजेनमुळे सुकर होतात. तसेच शरीरातील चरबीचे पचनही इस्ट्रोजेनमुळेच होते. मोठ्या आतड्याची कार्यक्षमता, शरीराचं तपमानही इस्ट्रोजेनमुळे योग्य राखलं जातं. ही इस्ट्रोजेनची पातळी एकदम कमी होत नाही. साधारणत: 30 ते 35 वयानंतर इस्ट्रोजेनची पातळी कमी व्हायला सुरूवात होते. त्यानंतर मग हा रजोनिवृत्तीचा पूर्वकाळ सुरू होतो.
तसं पाहायला गेलं तर रजोनिवृत्ती ही तद्दत नैसर्गिक घटना आहे. त्यामुळे या काळात होणाऱ्या बदलांशी जुळवून घ्यावेच लागते. तिचा बाऊ करण्याची गरज नाही. घरात, घराबाहेर इतकेच नाही तर अंतर्मनातही या सगळ्याचे परिणाम होताना दिसून येतात. मानसिक बदल होतात. एखादी शांत स्त्री एखाद्या वादाच्या प्रसंगाला सामोरे जाताना विचित्र वागू शकते. पूर्वी शांत, समजुतदार असलेली एखादी स्त्री रागिट, तापट, चिडचिडी होते. भावनाप्रधान होते. कधीकधी अनिसंवेदनशील स्त्री धीरगंभीर होऊ शकते. कधीकधी तिचा पूर्ण आत्मविश्वास ढळतो. काहींचे आयुष्य बेसूर होते तर काहींना यातून सूरही सापडू शकतो. त्यांच्यात नवीन धडाडी निर्माण होते. काहींना बरं झालं एकदाची कटकट गेली असं वाटू शकतं, तर काहींना आता आपण म्हातारे झालो, आपलं स्त्रीत्वं लयास गेलं असंही वाटू शकतं. आपण आता सुंदर, आकर्षक दिसणार नाही.
नवरा आता दुरावेल का.. त्याच्या इच्छेला आता कसं सामोरं जायचं, या विचारांनी काहीजणी डोकं ही दुखवून घेऊ शकतील. आपण कालबाह्य किंवा टाकाऊ झालो आहोत, घरातील एक अडगळ झालो आहोत असेही काहींना वाटून जाईल. या साऱ्या बदलांना ही तरुणही नसलेली आणि म्हणावी तर म्हातारीही नसलेली स्त्री कशा प्रकारे सामोरी जाईल हे पाहणे नवलाचेच असेल. या घटनेकडे ही स्त्री कोणत्या दृष्टीकोनातून पाहते, या बदलांशी जुळवून घेऊ शकते का.. भावनांशी कशी खेळते, त्यावर कशी मात करते हे पाहणं नवलाचंच ठरू शकतं. विसंवादी भावनांशी जुळवून घ्यायला याच वयात आपसुक जमतं. हे सगळं करत असताना जसा स्त्री वर परिणाम होतो. तसेच या सर्वाचा घरातील इतरेजनांवर, कुटुंबावर आणि पर्यायाने सामाजिक जीवनावर परिणाम होतो.
या काळात मुलं सुरवंट होतात, हाताशी येतात. आईवर अवलंबून असणारी मुलं मग आत्ता स्वावलंबी झालेली असतात. ते आईशिवाय जगायला शिकतात. अभ्यास आणि इतर गोष्टीत रमायला लागतात. नवरा नोकरी अथवा व्यवसायात मग्न असतो. अशा परिस्थितीत मग स्त्रीयांना आपण घरात एकटेच असेही वाटू शकते. याच काळात मग आई-वडिल, सासू-सासरे किंवा घरातील इतर वृद्ध लोकांची आजारपणे, मृत्यू यांना सामोरं जावं लागतं. कधी कधी पतिवियोगालाही सामोरं जावं लागतं. बाहेर कुठे काम करत असल्यास सहकार्यांबरोबरही याच गोष्टींवर चर्चा होते. अशा वेळेस मग नवऱ्याच्या जबाबदाऱ्या घेण्याची वेळ काहीजणींवर येते. या काळात मग बऱ्याचदा भरारी घेण्याची, सेकंड इनिंगची वेळ येते किंवा मग नर्व्हस ब्रेक डाऊनचीही वेळ येऊ शकते.
या काळात मग ह्रदयविकार होण्याच्या प्रमाणात वाढ होते. ताण किंवा मानसिक खच्चीकरण, एकटेपणा, चिडचिड याबरोबरच इतरही अनेक कारणांमुळे या काळात ह्रदयविकार मागे लागण्याची शक्यता असते. तेव्हा याबाबत जरा काळजी घेणे श्रेयस्कर ठरेल.
हाडे ठिसूळ होणे हा प्रकार आजकाल सर्रास पाहायला मिळतो. हा प्रकार टाळण्यासाठी केवळ व्यायामाने फायदा होत नसेल तर जीमचा पर्यायही आजकाल सहज उपलब्ध होण्यासारखा आहे. जीम वगैरे अगदीच शक्य नसेल, तर घरीच डंबेल्सची जोडी विकत आणून घ्यावी आणि घरीच आपण जीमप्रमाणे प्राथमिक व्यायाम करू शकतो. यामुळे स्नायूंची ताकद आणि हाडांची बळकटी वाढवण्यात मदत होते.
नियमित एकटीने, गप्पा न मारता फिरायला जाण्याने दमश्वास वाढतो. फिरायला जाताना रोज रस्ता बदल करा, वेग वाढवा, कधी वेळ बदल करा, फिरायला जाण्याची बाग अथवा जागा बदला. आधी जे अंतर चालायला 11 मिनिटे लागायची तिथे 9 ते 10 मिनिटांचे उद्दिष्ट ठेवा. अगदीच वेळ नसेल तर घरच्या घरीच पळा. 2 मिनिटे पळा, त्यानंतर अध्या मिनिटासाठी थांबा आणि पुन्हा पळा.. असे करू शकता. केवळ असे जरी काही दिवस केले तरी दमश्वास वाढेल. व्यायामासाठी कोणत्याही ऋतूची, वेळेची थोडक्यात कोणत्याही मुहूर्ताची वाट पाहू नका. कधीही तो सुरू केला तरी चालेल.
अगदी लगेच नाही मात्र जास्तीत जास्त आठ आठवड्यात याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतात. दमश्वास वाढल्याचे लक्षात येईल. पोहायला आवडत आणि जमत असेल तर पोहायला जा. पाण्यात चालायला शिका. व्यायामही पाण्यातच करायला शिका. पाण्यात चालल्याने गुडघे हलके होऊ लागतात. त्यांना आराम मिळतो. तेव्हा पाण्यात जरूर उतरा. पोहायला नाही तर किमान पाण्यात चालण्याचा व्यायाम केलात तरी खूप आहे.
एरवीचं फिरणं आणि व्यायाम म्हणून फिरणं यात फरक आहेच. एरवीच्या फिरण्याने मनातील विचार कमी होतात. अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळातात. विरंगुळा मिळतो. विरंगुळ्याचं एक साधन म्हणजे फिरणं. याने एकटेपणाही कमी होतो. पण या सर्वांपेक्षा ऍरोबिक व्यायामाचं फिरणं महत्त्वाचं. त्यासाठी नाडीचे ठोके वाढलेत, नंतर कमी झालेत, असे व्यायाम करा. यातंही शरीर उबदार म्हणजेच वार्मी बनवणारे व्यायाम जरुर करा. आठवड्यातून किमान चार तास तरी असे व्यायाम करायला हवेत. शरीरातील मोठे स्नायू या हात आणि पायांच्या व्यायामात वापरले गेले पाहिजेत. हाताने करण्याजोगी स्वयंपाकाची कामे करणे, तेही इलाज नाही म्हणून हा व्यायाम नाही. हे कष्ट. नाडीचा वाढलेला वेग अर्धा-एक तास वाढलेलाच राहणं म्हणजे यशस्वी ऍरोबिक व्यायाम. हा व्यायाम सातत्याने व्हायला हवा. वर्षानुवर्षे तर आणि तरंच आरोग्य चांगलं राहू शकणार आहे.
ज्यांना रक्तदाब, ह्रदयविकार, मधुमेहाचा त्रास आहे. त्यांनी मनाने व्यायाम करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व्यायाम करावा. अधून-मधून तपासण्याही कराव्यात. ज्यांना योगासने करण्याची आवड आहे त्यांनी पवनमुक्तासन, भुजंगासन, शलभासन, वज्रासन, पश्चिमोत्तानासन, हस्तपादासन, त्रिकोणासन, ताडासन ही आसने रोज केली पाहिजेत.
निरोगी राहण्याची चतु:सूत्री
या सगळ्यात महत्त्वाचे आहे ते, नियमित व्यायाम करणे. नियमित व्यायाम करत राहिल्यास अतिरिक्त वजनवाढ रोखता येते. काहीजणी सांगतात आम्ही रोज व्यायाम केले पण तरीही वजन वाढलेच. मग आम्ही योगाचा क्लास लावला. काहींनी जिम लावली, काही पोहण्याचा क्लास करायला लागातात तर काही रमत-गमत फिरायला जातात आणि हाच व्यायाम असेही समजतात. पण बायांनो एक लक्षात ठेवा, केवळ व्यायाम करणं इतकंच पुरेसं नाही. वजन आटोक्यात ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण ही महत्त्वाचं असतं. खरं तर आहार, व्यायाम, मन:शांती आणि आवडीच्या छंदातून मिळणारा आनंद या चतु:सुत्रीचा एकत्रित अवलंब केला तरंच वजन आपल्या अपेक्षेनुसार नियंत्रित राहू शकते. यामुळे रजोनिवृत्तीच्या काळातील अवघड परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळही मिळेल. तर या चतु:सूत्रीची माहिती घेताना सुरूवातंच व्यायामाने करता येईल.
व्यायाम – व्यायामाचे खरं तर चार प्रकार आहेत.
शक्ती वाढवविणारे व्यायाम
लवचिकपणा वाढवणारे व्यायाम
दमश्वास वाढवणारे व्यायाम
चिवटपणा वाढवणारे व्यायाम
व्यायाम हे नियमितपणे आणि रोजच करायला हवेत. ज्याप्रमाणे शरीराला मिळालेल्या जीवनसत्वांची शक्ती दररोज शरीराकडून वापरली जाते, तशीच व्यायामाने मिळवलेली शक्तीही वापरली जाते. शिवाय या वयात व्यायाम केल्याने भावनांचे विरेचन करणेही सोयीचे होते. ते सुयोग्य प्रकारे होते.
थोडक्यात महत्त्वाचे काही
आयुष्याच्या या टप्प्यात म्हणजेच रजोनिवृत्तीच्या या काळात फार काही बदलले आहे असे न समजता पूढे जा. व्यायाम, आहार, मनःशांती आणि छंद ही चतुःसुत्री पाळत असताना आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. शक्य तेवढा स्वतःसाठी वेळ द्यायला शिका. थोडक्यात मोजकंच, सात्विक, पौष्टीक, ताजं, गरम अन्न खा. मोजकंच पण महत्त्वाचं वाचा. विचार करा. बोला. मोजकाच पण नियमित व्यायाम करा. आनंदात जगा. परिस्थितीशी जुळवून घ्या. तप्त वाळवंटातील उंटाचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. तो सर्व प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेत जगतो. तसं जगायला शिका. तरंच या जगात तुमचा टिकाव लागेल.
अन्यथा तुम्ही कालबाह्यच राहाल. काळाबरोबर राहा. भविष्यात चांगलं, स्वास्थ्यपूर्ण जगायचं असेल तर तशी सुरूवात तिशी-पस्तिशी पासूनच करा. रजोनिवृत्ती व नंतरचा काळ मजेत घालवा. आयुष्याचं मर्म तेव्हाच कळेल की, जेव्हा तुम्ही सर्व छोट्या-मोठया गोष्टींचा आनंद घ्याल आणि आनंदात जगाल. मग आणखी वेगळ्या पद्धतीने धार्मिक आणि अध्यात्मिकतेकडे वळण्याची गरज पडणार नाही. या काळात मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुदृढ आणि हेल्दी असेल तर त्यातंच तुम्हाला अध्यात्मिक आणि आत्मिक सूख मिळणार आहे. त्यासाठी पुन्हा वेगळे काही करण्याची गरज भासणार नाही.
आहाराबाबत काही महत्त्वाचे
व्यायामानंतर आहाराबाबत विचार करताना कृत्रिमरित्या संप्रेरके घेण्यापेक्षा ज्यातून नैसर्गिकरित्या इस्ट्रोजेन मिळेल असे अन्नपदार्थ सेवन केले पाहिजेत. धान्ये, भाज्या, जवसाचे तेल यांचा आहारात समावेश असावा. सोयाबीनही जास्तीत जास्त वापरले जावे.
आनंदाने आहार घ्या..
आहारात विविध पदार्थ करून खा.
अति खाऊ नका. फार कमीही खाऊ नका.
जेवढं वजनासाठी आवश्यक तेवढंच खावे.
पिष्टमय पदार्थ, तंतुमय पदार्थ आणि कोंडा असलेले पदार्थ जास्त खा.
स्निग्ध पदार्थांचे प्रमाण नियंत्रित ठेवा.
खनिजे (कॅल्शिअम, लोह) अ,ब,क,ड,ई जीवनसत्त्वे असलेल्या भाज्या आणि फळे खाव्यात.
पांढरे मीठ, पांढरा मैदा, पांढरी साखर हे घटक शत्रूसमान आहेत असे समजा आणि ते शक्यतो कमी खा.
या काळात ह्रदयविकारास कारणीभूत घटक
मधुमेह
उच्च रक्तदाबाचा त्रास
रजोनिवृत्ती
वयानुसार आणि उंचीनुसार ठरवण्यात येणाऱ्या आदर्श वजनापेक्षा जास्त वजन असणे
बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 28 पेक्षा जास्त असणे
बैठे आणि संगणकीय काम
व्यायाम न करणे
अतिसंवेदनशीलता
घरातील जवळच्या व्यक्तींना 55 किंवा त्यापेक्षाही कमी वयात ह्रदयविकार अथवा अर्धांगवायू असल्यास
वाढलेले कोलेस्टेरॉल
वरीलपैकी कोणत्याही गटात मोडणाऱ्या स्त्रीयांना या वयात ह्रदयविकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्रदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या अरुंद होऊ लागतात. त्यामुळे मेंदूत रक्तस्राव होऊन अर्धांगवायू होण्याची शक्यता असते, तसेच ह्रदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता असते. अशा वेळेस नियमितपणे ठराविक कालावधीनंतर रक्तातील साखर, रक्तदाब हे तपासायला हवे तसेच इतरही महत्त्वाच्या तपासण्या करणे आवश्यक आहे. त्या न विसरता करणे आवश्यक आहे.
व्यायामाचे काही महत्त्वाचे फायदे
चरबीचे प्रमाण कमी होते. स्नायूंचे प्रमाण वाढते.
शरीराचे वजन स्थिर राहिले तरी स्नायूंचे वजन वाढते आणि चरबीचे कमी होते.
गोळ्या न घेता रक्तदाब कमी होतो. ह्रदयावरील दडपणही कमी होतं.
हाडे बळकट होतात, सांध्यांचे आरोग्य सुधारते, सांध्यांची लवचिकता वाढते.
रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
मेंदूची कार्यक्षमता वाढते.
औदासिन्य, नैराश्य कमी होते.
चालण्यातील डौल सुधारतो.
भुकेवर नियंत्रण ठेवता येते.
कंप येणारे आजार कमी होतात.
नाश्ता टाळू नका.
धपाटे, थालिपीठ, पोहे, उपमा खा
उठल्या उठल्या फळे खा, दूध प्या.
जेवताना चटणी, कोशिंबीर, भाजी-पोळी, भात-आमटी उसळ असे सगळे जेवण घ्या.
4 वाजता एखादे फळ, राजगिरा लाडू असे खा.
7 वाजता मिश्र पिठाची भाकरी आणि एखादी पालेभाजी खा. वरण-भात खाल्ला तरी हरकत नाही.
10 वाजता दुध पिऊन झोपी जा.
खाण्याचे हे असे वेळापत्रक सांभाळले तर आरोग्य तर चांगले राहील. ऋतूनुसार भाज्या, फळे, विविध पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा. हे चालत नाही, ते आवडत नाही अशा गोष्टी या वयात आता बाजूला ठेवा. असेल त्या पथ्याचंच परंतु शक्यतो वेगळं वेगळं असं काही करून खा. आपल्याबरोबरच आपल्या घरच्यांनाही यात समाविष्ट करून घ्या. मागील लेखात दिल्याप्रमाणे सोयाबीनचे पदार्थ जास्तीत जास्त खा. परंतु व्यायाम चुकवू नका. नाश्ता करताना तो पोटभरीचा आणि व्यायाम जरुरीपूरता करावा. या गोष्टी दररोज पाळाव्यात. आहार व्यायाम झाला तसे आता मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.
मानसिक आरोग्य राखण्यासाठी खास वेळ द्या. छंद जोपासा. शिवणकाम, भरतकाम, कागदी फुले बनवणे, पिशव्या तयार करणे, शोभिवंत वस्तू तयार करणे या अशा गोष्टींचे छंद अनेक जणींना असतात. जर नसतील तर यापैकी काहीतरी बसल्या बसल्या करता येईल असे काही शिका. सतत माणसात, समाजात वावरा. किमान अर्धा तास स्वतःसाठी द्या. ध्यानाची सवय लावून द्या. शास्त्रीय संगीत ऐकण्याची सवय लावून घ्या. ते कळो अथवा न कळो ऐका. घरी बाग असेल तर बागकामाचा छंद जोपासा. निसर्गाच्या सानिध्यात तेवढाच वेळ छान जाऊ शकेल. स्वतःशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा.
आपल्या जोडीदारालाही या आपल्या अवस्थेबद्दल जास्तीत जास्त माहिती द्या. त्याला आवर्जून डॉक्टरांकडे घेऊन जा. रजोनिवृत्ती आणि या काळातील बदलते जीवन याची शास्त्रोक्त माहिती करून द्या. या काळातील तुमच्यातील शारीरिक आणि मानसिक संबंध कसे असावेत याबद्दल त्याच्याशी चर्चा करा. त्याला याबाबत समजावून सांगा. स्वतःवर आणि आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवा.