दीपक महामुनी
आजकालच्या जमान्यात, निदान शहरी भागातील सर्वसामान्य लोक तरी तब्येत कशी आहे? या प्रश्नाचे उत्तर एकदम ठणठणीत आहे, असे ठामपणे सांगताना दिसणार नाहीत. धावपळीच्या जीवनात आणि पैशाच्या मागे धावण्यात मनाचे आणि शरीराचेही स्वास्थ्य गमावणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. जागतिकीकरणानंतरच्या काळात मोठ्या प्रमाणात सुबत्तेच्या संधी वाढल्या आहेत हे तर त्रिवार सत्य आहे. पण त्यांना दुसरी काळी बाजू देखील आहे. या बदललेल्या जीवनशैलीने अनेक विकारांची धोक्याची घंटादेखील वाजवली आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडवले आहे. जीवघेणा तणाव जीवनात निर्माण झालेला आहे.
सर्वसामान्य कुटुंबात डोकावून पाहा. संध्याकाळी घरी आल्यानंतर घरातील सर्वजण एकत्र बसून गप्पागोष्टी करत आहेत असे चित्र दिसत नाही. प्रत्येकजण मोबाईलमध्ये डोके खूपसून बसलेला दिसतो, किंवा टीव्हीचा रिमोट घेऊन सर्फिंग करताना दिसतो. कोणत्याही मध्यमवर्गीय घरातील दृश्य बहुदा असे दिसते.
गेल्या काही वर्षांतील आपल्या आजूबाजूस आढळणारी ही उदाहरणं. आपल्या आरोग्याचे हे बदलते रूप आहे. जागतिकीकरणानंतर संधी वाढू लागल्या तसतसं करिअरच्या संकल्पना बदलू लागल्या, पगाराचे आकडे बदलू लागले, जगण्याच्या तऱ्हा बदलत गेल्या, कामाच्या पद्धती, खाण्याच्या सवयी, वागण्याची पद्धत सारं बदलू लागलं. एका नव्या जीवनशैलीनेच आपला ताबा घेतला. घरच्या जेवणापेक्षा बाहेरच्या खाण्यावर लक्ष केंद्रीत होऊ लागले. कारणे काहीही असतील, पण परिस्थिती तीच आहे.
अर्थात या साऱ्या बदलाचे फायदे होत आहेत, त्यापेक्षा जास्त तोटेदेखील आहेत. आपण स्वत:ला हरव चाललो आहोत. एका चक्रात पुरते अडकलो आहोत. त्याला दुष्टचक्र म्हणायचे की प्रगती हा वादाचा मुद्दा आहे. पण एका परीने आज आपली अपरिहार्यता झाली आहे. अधिक चांगलं जगण्यासाठी अधिक पैसे हवेत, अधिक पैसे हवेत म्हणून अधिक काम, अधिक काम म्हटले की अधिक ताण, कमी वेळ. मग जे जे रेडीमेड मिळेल त्याचा स्वीकार आणि परिणामी जीवनशैलीतला बदल. या साऱ्या एकमेकांशी जोडल्या गेलेल्या घटकांच्या संयुगातूनच मग वर सांगितलेली उदाहरणे रोजची होतात. हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर, लठ्ठपणा, पोटाचे विकार, दाताचे, डोळ्यांचे आजार बळावतात. हे आजार पूर्वीही आपल्याकडे होते, नव्हते अशातला भाग नाही. मुद्दा आहे ज्या वेगाने आणि ज्या वयोगटात ते पसरत आहेत त्याचा. तो चिंतेचा भाग आहे. पन्नाशी-साठीनंतर उद्भवणारे आजार आज तिशी-चाळिशीत होत आहेत.
अति सर्वत्र वर्जयेत ही मूलमंत्र आपण विसरून गेलो आहोत.
आपल्या आचारविचार, आहारविहारावरील गमावलेल्या नियंत्रणामुळे. जीवनशैलीच्या बदलामुळे निर्माण होणारे भावनिक, मानसिक, आर्थिक आणि शारीरिक तणाव हे हृदयरोगाच्या मुळाशी असल्याचे ते नमूद करतात. उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान यांचा तणावाशी थेट संबंध आहे. महत्त्वाचं म्हणजे हे तीनही प्रकार घरीदारी सर्वत्र तुमच्याबरोबर असतात. हृदयविकाराचा विळखा घालणारे अनेक घटक आज समाजात कार्यरत आहेत. त्यापासून चार हात दूर राहायचं असेल, तर आचार-विचार, आहार-विहार सुधारणं हाच योग्य पर्याय आहे.किमान सहा-सात तास शांत झोप, नियमित व्यायाम आणि संतुलित आहार आणि व्यसनांपासून चार हात दूर राहिला तरी हृदयविकाराला तुम्ही रोखू शकता. इतकंच नाही तर किमान झोप घेतली तरी खूप काही गोष्टी आपोआप टळतात.
ताणतणावाचा दुसरा महत्त्वाचा परिणाम होत आहे तो रक्तदाबावर. गेल्या काही वर्षांत उच्च रक्तदाबाचा विकार वाढतो आहे. नोकरी मिळविण्यापासून ते टिकविण्यासाठी स्पर्धा वाढली असल्यामुळे, लहान वयातच उच्च रक्तदाबाला आमंत्रण मिळत आहे. तर दुसरीकडे उत्पादन क्षेत्र कमी होऊन सेवा क्षेत्रातील नोकऱ्या वाढल्या आहेत. त्यातही आयटी, बीपीओसारख्या नोक ऱ्यांमध्ये तरुण मोठया प्रमाणात आहेत. कॅन्टीन फूड, सेवा क्षेत्रातील सततच बैठं काम यामुळे निद्रानाश, वारंवार छातीत दुखणं, पॅनिक होणं, ताणतणाव वाढणं अशा विकारांचा उद्भव वाढला आहे. त्याचबरोबर कामाच्या कार्यक्षमतेवर पगार हे गणित असल्यामुळे साहजिकच आपलं आयुष्य आता प्रेशर कुकरप्रमाणे झालं आहे.
सततचं बैठं काम आणि व्यायामाचा अभाव आणि जोडीला खाण्याचा असमतोल याचा परिणाम उच्च कोलेस्टेरॉलमध्ये परिवर्तीत होत आहे, तर व्यायामाला वेळच नाही अशी सबब अनेकांकडून ऐकायला मिळते. रोज कार्यालयातून घरी येताना तरी स्टेशन ते घर यासाठी वाहनापेक्षा चालण्याचा पर्याय स्वीकारावा. खूपच लांब अंतर असेल तर दोन-चार स्टॉप आधी रिक्षा अथवा बस सोडावी आणि तेवढं तरी अंतर चालावं.
बदलत्या जीवनशैलीने आणखीन एका मोठया आजारात वेगाने वाढ होताना दिसते तो म्हणजे मधुमेह. मधुमेहामध्ये आनुवंशिकतचे प्रमाण बरंच आहे, पण गेल्या दहा वर्षांतील वाढत्या प्रमाणाचं कारण हे आनुवंशिकपेक्षा जीवनशैलीतील बदल हेच आहे. ताणतणाव, खाण्यापिण्याच्या सवयी, फास्ट फूड, व्यायामाचा अभाव हेच त्यामागील कारण आहे.
नोकरी-व्यवसायातील कार्यपद्धती बदलल्या आणि आज संगणक हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. एकेकाळी मान मोडून काम करणारे आता संगणकासमोर तासनतास खर्ची घालू लागले आहेत. अर्थातच सातत्याने संगणकाकडे पाहण्यामुळे डोळ्यांच्या आजाराचे गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. सातत्याने संगणकाकडे पाहण्यामुळे आपल्या डोळ्यांत कोरडेपणा तयार होतो. त्याला कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम असं म्हणतात. हा कोरडेपणाच डोळ्यांना इतर विकारांकडे घेऊन जातो. डोळे चुरचुरणं, लाल होणं असे विकार दिसू लागतात. अर्थातच त्यासाठी केला जाणारा सततचा औषधोपचार आणि पर्यायाने त्या सततच्या औषधोपाचाराचे दुष्परिणाम असं हे चक्रच तयार होतं. पण संगणकाकडे पाहणं हे काही आपल्याला टाळता येत नाही, मग काय करायचं?
सतत जवळचं पाहून डोळ्यांच्या बाहुल्या आकुंचन पावतात, लांबचं पाहताना त्या विस्तारतात. बाहुल्यांचं विस्तारणं हे डोळ्यांच्या स्नायूंसाठी चांगलं असतं. साधारण दोन अडीच तासांनी अश्रू लेयरच्या बाष्पीभवनामुळे उष्णता वाढते अशा वेळी डोळ्यांना गार पाणी लावणं हा चांगला उपाय असतो. जेवणानंतर रोज रात्री दहा मिनिटे डोळे मिटून शांत बसा. प्रकाशाचं प्रमाण कमी झालं की बाहुल्यांचं विस्तारणं वाढतं आणि डोळ्यांना विश्रांती मिळते. अर्थात डोळ्यांच्या आरोग्यासाठी कायम डोळ्याचीच काळजी घ्यावी लागते असं नाही, तर आपण जे तेलकट, फास्ट फूड, जंक फूड खातो त्याने रक्तवाहिन्यांवरदेखील परिणाम होत असतो. आणि डोळ्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांना त्याचा त्रास झाला तर डोळ्यांवरदेखील परिणाम होतात. म्हणजेच डोळ्याच्या आरोग्यासाठी आपल्या आहारावरदेखील नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.