मॅडम, आमचा रितेश कुठल्याच भाज्या खात नाही. त्याला कायम दूध-पोळीच हवी असते. दूध-पोळी सोडून तो बाकी काही खायला नाहीच म्हणतो.’ – एक बाबा.
“आमची आरती आहे ना, तिला रोज जेवणात काहीतरी गोड लागतेच. म्हणजे साखरांबा, गूळ-तूप, जॅम असे काहीतरी. नाहीतर ती जेवतच नाही.’ – एक आई.
“आमचा अभिषेक जेवायला मोजून एक तास लावतो! घास गालात धरून ठेवतो, नाहीतर शेवटी पाण्याबरोबर गिळतो. काय करावे?’ तिसरे पालक.
“कविता म्हणजे मुळीच स्वस्थ बसत नाही. जेवतानासुद्धा नाही! कायम इकडे तिकडे पळत असते. तिच्या मागे पळून तिला जेवण भरवताना भारी दमछाक होते माझी.’ – एक आजी.
“ती लहान असताना आम्ही जे देऊ ते सगळे खायची सिया. आता मात्र इतके नखरे करते! ती म्हणेल ते करून द्यायला लागतं.- – दुसरी आज्जी.
“काय सांगावं हल्लीची मुलं, मोबाईलशिवाय जेवतच नाहीत. आमचा नील तर मोबाईलवर व्हिडीओ सुरु करेपर्यंत तोंडही लावत नाही कशाला.’ – एक आजोबा (कौतुकाने!).
हे सगळे कारनामे साधारण तीन ते पाच वयोगटातील बाळांचे! माझ्या क्लिनिकमध्ये दररोज अशा तक्रारी हमखास ऐकायला मिळतात!! मग अशा बाळांची वजनंच वाढत नसतात किंवा काही बाळांची वजनं प्रमाणापेक्षा जास्त असतात. काहींचे पोटच दुखते, गॅसेस होतात, शी होतच नाही किंवा खूप घट्ट होते (बद्धकोष्ठता). पालकांना अशा बाळांची काळजी वाटणे सहाजिक आहे; पण जरा खोलात जाऊन पाहिल्यास असे लक्षात येईल की यात या बालकांच्या पालकांचेच कुठेतरी चुकत आहे. बाळ जसे दोन वर्षाचे पूर्ण होते, तसे हळूहळू सगळे खायला शिकते. आणि यानंतर हळूहळू सुरु होतात बाळाच्या खाण्या-पिण्याविषयक आवडी-निवडी!
या वयातील बाळांनी काय खायला हवे?
घरातील सगळे जे खातात ते! अगदी वरण भातापासून ते पिठलं-भाकरीपर्यंत. फक्त बाळाचे अन्न तिखट आणि मसालेदार नको आणि मुळात ते आरोग्यदायी हवे! घरातले सगळे खातात म्हणून बाळांना जंकफूड-ब्रेड-बिस्कीटे-सॉस-चिप्स-मिठाई-चहा-कॉफी- चॉकलेट्स मुळीच देऊ नका. उलट घरातल्या इतरांनीही ते खाणे बंद करा.
कारण मुले अनुकरणप्रिय असतात. तुम्ही जे खाल ते हक्काने खातात! त्यामुळे अशावेळी तुम्हीच चुकीचे खात असल्यामुळे तुम्हाला नाही म्हणणे जड जाते! घरात असे पदार्थ आणूच नका म्हणजे खाण्याची वेळच येणार नाही!
मुलांना मॉलमध्ये नेऊच नका…
बऱ्याचदा खरेदीसाठी मॉलमध्ये जाण्याचा प्रसंग येतो आणि काहीही गरज नसताना आपण अनेक पदार्थ घरी घेऊन येतो. बरोबर बाळे असतील तर विचारायलाच नको! ट्रॉलीवर बसून जे दिसेल ते मागतात! विशेषतः टी.व्ही. वर पाहिलेले किंवा इतर मुलांच्या हातात असलेले बाळांना हवेच असते.
लहान मुलांच्या काही पदार्थांबरोबर खेळणी फ्री मिळतात (मार्केटींगचा फंडा). त्यामुळे मुले असे पदार्थ हमखास मागतात. हट्ट करतात. कधी-कधी मॉल डोक्यावरही घेतात! मग काही पालक नाईलाजाने (आणि काही आनंदाने) बाळांना असे चुकीचे पदार्थ विकत घेऊन देतात.
हे वेळीच टाळायला हवे. एकतर मॉलमध्ये खरेदी करूच नका, करायची असल्यास आवश्यक पदार्थांची यादी घेऊन जा आणि तेवढेच खरेदी करा आणि मुख्य म्हणजे सोबत बाळांना घेऊन जाऊ नका!
बाळाच्या जेवणात विविधता ठेवा…
या वयातल्या बाळांनी सगळ्या भाज्या, सगळी फळे, सुकामेवा, डाळी-कडधान्ये, दूध आणि दूधाचे पदार्थ खायला हवेत. बाळाच्या जेवणात विविधता ठेवा. बाळाला रोज एकच एक पदार्थ किंवा एकाच प्रकारच्या भाज्या (फक्त फोडणी, दाण्याचे कूट घालून) देणे टाळा. एक भाजी सुद्धा चार वेगवेगळ्या प्रकारे करता येते!
उदा. कोबीची भाजी-मूगाची डाळ घालून, कधी डाळीचे पीठ पेरून, कधी ओले खोबरे-आले घालून, कधी पनीरचे तुकडे घालून, कधी कोबीची कोशिंबीर इ. तसेच पालेभाज्यांचे – कधी कांदा लसूण घालून कोरडी पालेभाजी, कधी मूगाची/हरबऱ्याची डाळ घालून, कधी दाण्याचे कूट घालून, कधी वरणातली पालेभाजी (डाळ-मेथी/ डाळ-पालक), कधी पराठा करून, कधी सूप करून, कधी कोथिंबीर वडी- अळूवडी करून.
असे केलेत की कोणत्याही भाज्या न खाणारी बाळे देखील सगळ्या भाज्या आनंदानी खातील. फळे देताना फळांचे ज्यूस देऊ नयेत. फळे चावून खाण्यास प्रोत्साहन द्या.
काय आणि किती असावा आहार?
या वयातील मुलांनी दिवसभरात साधारण दोन वाट्या भाज्या/सॅलड, फळ, एक वाटी वरण किंवा उसळ, अर्धी वाटी सुकामेवा, दोन वाट्या दूध/ दही/ताक किंवा पनीरचे 4-5 तुकडे किंवा चीजचा तुकडा किंवा अंडे किंवा चिकनचे अथवा फिशचे-तुकडे, आणि-वाटी धान्य (1 वाटी भात+पोळी+भाकरी/थालिपीठ /धिरडे/उत्तप्पा) इतका आहार घ्यायला हवा.
बाळाने कधी खायला हवे?
भूक लागल्यावर लगेच! शक्यतो खाण्या-पिण्याच्या ठराविक वेळा ठेवा. म्हणजे त्या-त्या वेळी भूक लागेल. मधल्या काळात फक्त पाणी द्या. मधेमधे काहीतरी सतत खात राहिल्यास किंवा दूध, ज्यूस अशी पेये पित राहिल्यास, जेवणाच्या वेळी भूक रहाणार नाही आणि बाळाचे खाण्या-पिण्याचे नखरे सुरु होतील. जेवताना मोबाईल/टी.व्ही. बंद हवा. बाळाला एका जागी बसून खाण्याची सवय लावावी. या वयातील बाळे स्वतःच्या हातानी खाण्याचा हट्ट करता. याला प्रोत्साहन द्यावे.
बाळांनी किती खायला हवे?
याचा निर्णय तुमच्या बाळांनाच घेऊ द्या! बाळांची भूक दिवसागणिक बदलते. बाळ कधी कमी तर कधी जास्त खाऊ शकते. त्यामुळे बाळाने ठराविक प्रमाणात खाल्लेच पाहिजे, असा आग्रह धरू नका. बाळाने खायला नकार दिल्यास किंवा बास म्हटल्यास तिथे थांबा. कधीकधी बाळे एखादा पदार्थ आवडला नाही किंवा दुसरा आवडीचा पदार्थ हवा असतो यासाठी खायला नकार देतात. पालकांची यावेळी द्विधा मनस्थिती होते.
बाळाने सगळे खायला पाहिजे हे पटत असते, पण बाळाचे पोट भरायला पाहिजे असेही मनापासून वाटत असते. अशा वेळेला अनेकदा बाळ जे मागते ते देण्याकडे पालकांचा कल असतो. पण बऱ्याचदा पुढे जाऊन हे त्रासदायक ठरू शकते. मग बाळे ठराविक पदार्थ खातच नाहीत किंवा विशिष्ट पदार्थ खूप जास्त प्रमाणात आणि सारखाच खातात.
नकारावर ठाम रहा…
तुम्ही एकदा नाही म्हटले की त्यावर ठाम रहा. यासाठी इतर कुटुंबियांनीही सहकार्य करा. बऱ्याचदा आई एखादा पदार्थ खायला नाही म्हणते. मग बाळ बाबाकडे किंवा आजी-आजोबांकडे तोच पदार्थ मागते आणि तो त्याला मिळतोही! मग बाळ बरोब्बर पुढच्या वेळेस योग्य माणसाकडे आपल्या आवडीचे पदार्थ मागते!! असे होऊ देऊ नका.
बाळाच्या बाबतीत कुटुंबियांच्या बोलण्यात आणि वागण्यात एकवाक्यता हवी. घरातल्या सगळ्यांनीच ठराविक पदार्थ द्यायला नकार दिला की, बाळाला कळेल की हा पदार्थ खरंच चांगला नाही! एखादा पदार्थ बाळाने खायला नकार दिल्यास त्रागा करू नका. तो पदार्थ झाकून ठेवा. बाळाने भूक लागल्याचे सांगितल्यावर बाळाला तो पदार्थ पुन्हा खायला द्या.
एखाद्या पदार्थाच्या बाबतीत सारखेच नाही म्हणणे देखील कधीतरी धोकादायक ठरू शकते. बाळे मग तोच पदार्थ खायचा हट्ट धरून बसतात. अशावेळी हो म्हणा; पण एखादी अट पुढे ठेवा. उदा. “तू सगळी भाजी खाल्ल्यानंतर तुला छोटा लाडू मिळेल. किंवा संध्याकाळी बागेत खेळून आल्यानंतर मी तुला केकचा छोटा तुकडा देईन.’ बाळे नक्की ऐकतील. तुमचे प्रॉमिस मात्र न विसरता पाळा म्हणजे पुढच्या वेळी बाळे तुमच्यावर विश्वास ठेवतील!
बाळाचा आहार योग्य आहे
का ते कसे कळेल?
यासाठी बाळाचे वजन आणि उंची दर तीन ते चार महिन्यांनी तपासा. दोन वर्षांनंतर ते पाच वर्षांपर्यंत बाळाचे वजन दरवर्षी 2 ते 3 किलो आणि उंची 6 ते 8 सेंटीमीटरने वाढायला हवी.
वजन आणि उंचीबरोबर बाळाचे दात किडले नाहीत ना? बाळाची नखे/डोळे/चेहरा पांढुरका, फिकट आणि निस्तेज दिसत नाही ना? बाळ सारखे झोपून/आळसावलेले रहात नाही ना? बाळ किरकिरे/चिडचिडे झाले नाही ना? याचीही खातरजमा करायला हवी. काही शंका आल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.
योग्य आहाराने बाळाची वजन-उंची योग्य प्रमाणात वाढेलच पण बाळ हसरे, खेळकर आणि निरोगी राहील. यासाठी या वयातील बाळांच्या पालकांनी एक मंत्र कायम लक्षात ठेवायला हवा – मुलांना काय, कधी आणि कुठे खायला द्यायचे ही पालकांची जबाबदारी; तर किती खायचे ही मुलांची जबाबदारी!
– डॉ. तेजस प्रज्ञा यशवंत