के.जी.मध्ये शिकणाऱ्या छोट्याश्या समिक्षाला घेऊन तिची आजी भेटायला आली. भेटायला आली तेव्हा समिक्षा हुंदके देत होती. रडून रडून तिचे डोळे आणि छोटंसं नाक लाल लाल झालं होतं. आजीने येताना तिला चॉकलेट देऊन कसं बसं शांत केलं होतं. ( child parenting in marathi ) पण समिक्षाकडे बघून असं वाटत होतं की ती आता शांत झाली असली तरी तीच रडू परत कधीही सुरू होऊ शकतं. आजी येऊन बसल्यावर समिक्षा आजीच्या मांडीवर बसली आणि चॉकलेट खायला लागली. आजीचा दम गेल्यावर आजीने स्वतःहूनच बोलायला सुरुवात केली.
समिक्षाला तिची आजी पाळणाघरातून घेऊन आली होती. पाळणाघरात असताना ती इतकी रडली. इतकी रडली की शेवटी पाळणाघरातल्या मॅडम फोन करून तिला घेऊन जायला सांगितलं. खरं तर या पाळणाघरात जायला लागून तिला 4 महिने झाले होते. पण ती त्या वातावरणात अजून रुळली नव्हती. पूर्वी शाळेत आनंदाने जायची पण आता तिथल्या शिक्षिकाही तक्रार करायला लागल्यात की समिक्षा शाळेत रोज छोट्या-छोट्या कारणांवरून रडते. तिच्या मनाविरुद्ध घडलं की वर्गाच्या एका कोपऱ्यात जाऊन बसते आणि मग कितीही समजावलं, जवळ घेतलं, खेळायला बोलावलं तरी अजिबात जात नाही. पाळणाघरात तिच्या आवडत्या एक मावशी आहेत. ती फक्त त्यांच्याच जवळ बसते. त्या थोड्या वेळासाठी जरी उठल्या तरी खूप खूप रडते. काही खात नाही, खेळत नाही. सुरुवातीला वाटलं नवीन वातावरणात रुळायला जरा वेळ लागेल. पाळणाघरातल्या मॅडमनीही सांगितलं होतं की महिन्याभरात होईल ती शांत म्हणून वाट पाहिली पण आता 4 महिने झाले तरी हिचं रडणं काही थांबेना. त्या मॅडमनी सुचवलं म्हणूनच आजी तिला समुपदेशनासाठी घेऊन आली. खरं तर हे काम तिच्या आई-वडिलांनी करणं अपेक्षित होतं, पण त्यांना “अजिबात वेळ नाही’ म्हणून आजी तिला घेऊन आली.
आजीच्या या एका वाक्यातून समस्येचा अंदाज आला. त्यामुळे तिच्याकडून समिक्षाच्या आई-वडिलांबद्दल आणखी माहिती घ्यायला सुरुवात केली तेव्हा असं लक्षात आलं की तिचे दोन्ही पालक नोकरीमुळे अनेक तास घराबाहेर असतात. सकाळी समिक्षाला आंघोळ घालणं, तिचं खाणं-पिणं, शाळा, पाळणाघर, नेणं-आणणं. सारं काही आजी आजोबाच पाहतात. रात्री 8.00 नंतर तिचे आई-वडील घरी येतात. आवरतात. खातात की झोपतात. छोट्या छोड्या कारणांवरून त्यांच्यात सारखे वाद होत असतात. दोघं सारखे एकमेकांशी मोठमोठ्याने भांडतात. ( child parenting in marathi ) समिक्षाची आई तर कारणं नसतानाही बऱ्याचदा चिमुकल्या समिक्षावर जोरजोरात ओरडते. आई-बाबा समिक्षाला वेळ देतात का? या प्रश्नावर आजीची मान अर्थातच नकारार्थी हलली. ते ऑफिसला जातात तेव्हा समिक्षा झोपेतच असते आणि रात्री येतात तेव्हा तर वाद घालण्यातच जातो आणि हिचं तिच्या समस्येची करी कारणं होती.
त्यामुळे पुढच्या सत्राला तिच्या आई-बाबांना बोलावून घेतलं. त्यांच्याबरोबर समिक्षाच्या समस्येबाबत चर्चा केली. या चर्चेतूनच त्यांचं वर्तन आणि त्याचे समिक्षाच्या भाव विश्वावर होणारे गंभीर परिणाम यांची त्यांना जाणीव करून देण्यात आली. सुरुवातीला त्यांना ते मान्य नव्हतं. त्यांच्यामते ते समिक्षाला “पुरेसा वेळ’ देत होते. पण याबाबत पुढील 3-4 सत्रात चर्चा करून त्यांना समस्येच्या गांभीर्याची जाणीव करून दिल्यावर मात्र त्यांना आपल्या वर्तनाची जाणीव झाली आणि त्यांनी समुपदेशनाला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. सांगितलेले बदल त्यांनी प्रयत्नपूर्वक केले. समिक्षाला दोघांचा पुरेसा सहवास आणि प्रेम मिळालं आणि मग समिक्षाच्या समस्या आपोआपच कमी कमी होत गेल्या.
(केसमधील नाव बदलले आहे.)