बध्दकोष्ठतेचा त्रास अनेकांना दिसून येतो. यामध्ये पोट साफ होत नाही. अनेकदा चुकीच्या आहारामुळे, चुकीच्या जीवनशैलीमुळे हा त्रास निर्माण होतो. त्यावर नियंत्रण ठेवलं तर बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून दूर राहता येतं. सकाळी उठल्याबरोबर पोट व्यवस्थित साफ झाले तर संपूर्ण दिवस चांगला जातो. अन्यथा दिवसभर जडपणा, अस्वस्थता, डोके दुखणे पोट दुखणे अशा तक्रारी येत राहतात. पोट सकाळच्या वेळी सहजपणे साफ होणे हे आरोग्याचे लक्षण मानले जाते. मळाची निर्मिती योग्य पद्धतीने न झाल्याने, त्याचे विसर्जनही योग्य प्रकारे होत नाही. शरीरातील टाकाऊ पदार्थ योग्य प्रकारे योग्य प्रकारे शरीराबाहेर टाकले गेले नाहीत तर बऱ्याच शारीरिक तक्रारी निर्माण होतात. भविष्यात निर्माण होणाऱ्या आजाराची ती पूर्वसूचना असते. म्हणूनच बध्दकोष्ठता असणाऱ्या व्यक्तींनी वेळीच उपचार करावेत.
अशी आहेत लक्षणे
रोज शौचास न होणे, सकाळी उठल्यावर शौचाला न होता दिवसभरात कधीही होणे, मळ टणक गाठी सारखा होणे, पोट साफ होण्यासाठी बराच वेळ बसावे लागणे, मलविसर्जन करताना कुंथावे लागणे, मळ चिकट असणे, शौचाची भावना न होणे इत्यादी सर्व लक्षणे दिसून येतात.
बद्धकोष्ठतेची कारणे
आहारात फार तिखट, कडू, तुरट, इत्यादी रसांचा अधिक वापर असणे, फार कोरडे अन्न खाणे, यात स्निग्धतेचा अभाव असणे म्हणजे तूप न लावता खाल्लेली भाकरी किंवा पोळी, लोणी न लावता खाल्लेला ब्रेड, चुरमुरे, चिवडा पाणीपुरी असे पदार्थ अतिप्रमाणात खाणे यामुळे मळ अधिक कडक होतो.
शरीरास दूध, साजूक तूप, घरचे लोणी, तेल इत्यादी स्निग्ध गोष्टींची आवश्यकता असते. हे पदार्थ अजिबातच न वापरणे किंवा अत्यल्प प्रमाणात खाणे अयोग्य असते. त्यांच्या अभावाने मळ मऊ बनत नाही. वात वाढवणारी आणि पचायला जड असणारी कडधान्य स्वतःच्या प्रकृतीचा विचार न करता खाणेही आरोग्यास अपायकारक आहे. आहारात तंतुमय पदार्थ म्हणजेच पालेभाज्या कोशिंबिरीचा अभाव इत्यादीचा अभाव असणे, तसेच मांसाहाराचे प्रमाण अधिक असणे, बेसनाच्या, मैद्याच्या पदार्थांचे खूप जास्त सेवन करणे, अशा चुकीच्या आहारामुळे बध्दकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे प्रकृतीला मानवत नसतानाही खूप उपवास केल्यानेही पचनाचे त्रास संभवतात. डायटिंग हे फॅडही त्यासाठी कारणीभुत असते.
या उलट काहीजण भूक लागलेली नसतानाही जबरदस्तीने खातात. अगोदरचे अन्न पचण्यापूर्वीच खाणे, रात्रीचे जागरण, दिवसा झोपणे, पुरक व्यायामाचा अभाव किंवा खूप जास्त व्यायाम करणे, मलनि:सारणाची भावना जबरदस्तीने दाबून ठेवणे यामुळे बद्धकोष्ठता होते. वाढत्या वयानुसार शरीरातील वाताचा प्रभाव वाढतो, त्यामुळेही बरेचदा बद्धकोष्ठतेचे लक्षण दिसते.
पचन शक्तीची दुर्बलता, सदोष आहार पुरेशा व्यायामाचा अभाव ही बद्धकोष्ठतेची प्रमुख कारणे आहेत. बद्धकोष्ठतेची तक्रार फार दिवस राहिल्यास काही आरोग्य समस्या उद्भवू शकतात. डोके दुखणे, मुळव्याध, फिशर, हार्निया, निद्रानाश, निरूत्साह, आळस, सर्वांग जड, होणे, कंबरदुखी, अंगदुखी तसेच पचनच्या इतर तक्रारी उदभवतात. म्हणून आहारात, दिनचर्येत योग्य तो बदल करावा.
पोट साफ होण्यासाठी सतत औषध घ्यावे लागणेही योग्य नाही. त्यामुळे ही क्रिया नैसर्गिक होण्यावरच भर दयावा.
वातामुळे बद्धकोष्ठता होत असेल तर एरंडेल तेल, बहावा, मनुका सेवन करावे. तसेच घरी बनवलेले साजूक तूप तर यावर अतिशय गुणकारी ठरते. यामुळे पचनाची ताकद तर वाढतेच पण वातशक्तीही नियंत्रित राहते. म्हणून दोन्ही जेवणापूर्वी कोमट पाण्यात एक चमचा तूप आणि चिमूटभर सेैंधव घ्यावे. तसेच रात्री झोपताना कपभर गरम पाण्यात दोन चमचे साजूक तूप आणि दोन चिमुट सैंधव टाकून प्यावे. पोटावर हलक्या हाताने तेल चोळाल्यास पोटातील वात सरतो आणि पोट साफ होण्यास मदत होते. कफाशी संबंधीत त्रासातून ही तक्रार उद्भवत असल्यास त्यासाठी हिंगाष्टक चूर्ण शंखवटी इत्यादी औषधे घ्यावीत. मळातील अधिक चिकटपणा काढून टाकण्यासाठी इसबगोल, हळीव हे बुळबुळीत पदार्थ घ्यावेत. सोबत त्रिफळासारखे चूर्णही घ्यावे. सौम्य प्रकारात त्रास असणा-यांनी भिजवलेल्या मनुका, अंजीर, सुखसारक चूर्ण इत्यादींचे सेवन करावे. उकळलेले पाणी पिणे हा उपाय बद्धकोष्ठतेवर उत्तमच आहे. यामुळे पचनशक्ती सुधारून वात आणि कफाचे नियंत्रण होते. सतत रेचक औषध घेतल्यामुळे कालांतराने आतड्यांमध्ये शिथिलता येऊ शकते आणि इतर तक्रारी वाढू शकतात. म्हणून वैद्यकीय उपचाराबरोबरच बद्धकोष्ठतेपासून मुक्तता होण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम तसेच नियमित दिनचर्या असणे अधिक गरजचे आहे.
– डॉ. भारत लुणावत