पुणे – निकोटीन हा तंबाखूजन्य (nicotine) पदार्थांमध्ये असणारा शरीरास घातक असा पदार्थ आहे व तो तंबाखूजन्य (nicotine) पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात पसरतो. त्याचे आपल्या शरीरातील व अवयवांवर होणारे परिणाम खाली नमूद केले आहेत.
मेंदू –
मेंदू हा आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवणारा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. निकोटीन मेंदूच्या चेतातंतूच्या कार्यात बदल घडवून आणते व मेंदूला त्याची सवय लावते. त्यामुळे झोप व्यवस्थित न येणे, कंप, गिडीनेस इत्यादी लक्षणे जाणवू लागतात.
हृदय –
निकोटीनच्या सेवनामुळे काही काळासाठी शरीरातील ऍड्रेनॅलीन नावाच्या हामोॅनचे प्रमाण वाढते. त्यामुळे रक्तदाब वाढतो व हृदयाची गतीही वाढते. हे असेच वर्षानुवर्षे चालूच राहिले तर त्यामुळे हार्टऍटक येण्याची शक्यता असते. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या कडक होतात. जे लोक रोज मोठ्या प्रमाणात धूम्रपान करतात त्यांना इतरांपेक्षा हृदयघाताचा धोका अडीचपट जास्त असतो. धूम्रपान करणाऱ्यात इतरांपेक्षा वाढत्या कोलॅस्ट्रोलमुळे हृदय धमनी विकाराचा धोका खूपच जास्त असतो.
डोळे –
निकोटीन हे डोळ्यातील काही द्रव्यांचे प्रमाण कमी करते. त्यामुळे रात्रीचे दिसण्याचे प्रमाण कमी होते. विशेषत: कमी प्रकाशात.
प्रजनन संस्था –
पुरुषांमध्ये (विशेषत: 40 वर्षे वयाच्या खालील) निकोटीन प्रजनन अंगाकडे होणारा रक्तप्रवाह कमी करते. त्यामुळे लैंगिक अवयवांचा रक्तप्रवाह घटतो व नपुंसकता येऊ शकते. पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या आणि सक्रियता (मोबिलिटी) धूम्रपानामुळे घटते. त्यामुळे अशा व्यक्तींमध्ये निकोटीनमुळे वंध्यत्वाचे प्रमाण वाढत चालले आहे.
निकोटीन/ तंबाखूजन्य (nicotine) पदार्थांचे सेवन करणाऱ्या स्त्रियांमध्ये अकाली गर्भपात होऊ शकतो. बाळ हे कमी वजनाचे, दिवस पूर्ण होण्याअगोदरच जन्माला येऊन त्याला फुफ्फुसाचे/ श्वसनाचे त्रास होण्याची शक्यता वाढते. गर्भावस्थेत धूम्रपान केल्याने बाळाचे वजन कमी होण्याची शक्यता साधारण स्त्रियांपेक्षा दुप्पट असते. कारण धूम्रपानामुळे गर्भावस्थेतील बाळाची वाढ मंदावते अशा बालकांत जन्मजात विकृती व बालमृत्यूचे प्रमाण जास्त असते.
धूम्रपान करणाऱ्या स्त्रिया या धूम्रपान न करणाऱ्या स्त्रियांपेक्षा निरोगीपणे प्रजननक्षमता असण्याची शक्यता तिप्पट असते व त्यांना इतरांपेक्षा रजोनिवृत्ती दोन वर्षे आधीच येते.
धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या बालकात अधिक वेळा श्वसनप्रणाली दाह व न्यूमोनियाचे प्रसंग येतात. तंबाखूजन्य (nicotine) पदार्थांच्या अतिसेवनामुळे स्त्री-पुरुषात वंधत्व येऊ शकते. त्यामुळे ज्यांना अपत्य प्राप्ती होत नाही अशा जोडप्यांमधील पुरुष अगर स्त्री जर तंबाखूजन्य (nicotine) पदार्थांचे सेवन करत असेल तर ते सोडण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
गुणसूत्रे –
प्रगत शास्त्र व नवनवीन संशोधनामुळे आता असे स्पष्ट झाले आहे की धूम्रपानामुळे व्यक्तीच्या केवळ बाह्य आरोग्यावरच परिणाम होत नाही तर त्यामुळे व्यक्तींच्या गुणसूत्रावर देखील विपरीत परिणाम होतो.
आई-वडील जर जास्त प्रमाणात धूम्रपान करत असतील तर जन्माला येणाऱ्या बाळावरदेखील विपरीत परिणाम होतो. त्यामुळे बालकाची स्मृती तर कमी होतेच पण त्याचबरोबर त्याच्या गुणसूत्रावर देखील याचा दुष्परिणाम होतो. जन्माला येणाऱ्या बाळाला ल्युकेमिया आणि अन्य मानसिक आजार होऊ शकतात.
कर्करोग –
कर्करोगामुळे होणारे एक तृतीयांश मृत्यू हे तंबाखू (nicotine) ओढल्याने, चघळल्याने किंवा कोणत्याही प्रकारे सेवन केल्यामुळे होतात. तंबाखू (nicotine) ओढणाऱ्या व्यक्तीमध्ये दररोज ओढली जाणारी तंबाखू (nicotine) किती वर्षे धूम्रपान चालू आहे आणि किती खोलवर तंबाखूचा (nicotine) धूर फुफ्फुसात जातो तेवढे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते.
दररोज दहा सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तींमध्ये सिगारेट न ओढणाऱ्या व्यक्तींपेक्षा दहापट कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते.तंबाखूजन्य (nicotine) पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये मुख, घसा, स्वरयंत्र, अन्ननलिका, यकृत, स्वादुपिंड, मूत्रपिंड, आतडी, मूत्राशय व गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते.