ताणतणाव वाढण्याचं महत्त्वाचं कारण आहे आजची जीवनशैली. अस्तित्व टिकवून धरण्यासाठी सगळीकडे चाललेली स्पर्धा. ही दिवसेंदिवस इतकी भयंकर होत चालली आहे की, जी आपल्या शरीराला आणि मेंदूलाही झेपत नाही. त्यामुळे तणाव वाढतो. तणाव वाढल्यामुळे मनाची चंचलता वाढते. मन अस्थिर होतं. त्यासाठी प्रत्येकाने आपली कुवत ओळखून, आपल्याला झेपेल, जमेल इतकं काम मनाचं संतुलन न ढळता केलं पाहिजे. त्याविषयी मार्गदर्शन करत आहेत
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. क्रांती कदम.
तणाव कुणाला चुकलेला नाही. पण वंशपरंपरेसारखं एका पिढीतून पुढच्या पिढीकडे ताण-तणावाचं हस्तांतरण होत आहे. हे गंभीर आहे. एक पिढी दुस-या पिढीला तणाव देत आहे. तणाव वाढण्याच्या अनेक कारणांपैकी हे एक महत्त्वाचं कारण आहे. या संदर्भात तारे जमींपर या चित्रपटाचा उदाहरणादाखल उल्लेख करणं अगत्याचं होईल. आपल्या मुलाने डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हावं, खो-याने पैसा कमवावा, समाजातील तथाकथित प्रतिष्ठा जपावी, अशी चारचौघांसारखी तारे..मधल्या छोटया नायकाच्या इशानफच्या आई-वडिलांची इच्छा असते.
पण इशान डिस्लेक्सिया या आजाराने ग्रस्त असतो. त्याच्या अंगभूत गुणांकडे, दुर्बलतेकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे इशानला विविध प्रकारच्या तणावांना समोरं जावं लागतं. सुदैवाने इशानला निकुंभसरांसारखा मार्गदर्शक लाभतो. तो इशानची व्यथा जाणतो. त्याला त्यातून बाहेर काढतो. मात्र समाजात प्रत्येक ठिकाणी निकुंभ सरांसारखा मार्गदर्शक लाभत नाही. त्यामुळे तणावाचं जाळं अधिकाधिक घट्ट होत जातं. या चक्राव्यूहात लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सारे जण गुरफटलेले आहेत. ( stress management )
मुळामध्ये नव्या जीवनशैलीनुसार प्रचंड स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेमुळे तणावाचं साम्राज्य दरक्षणी वाढत आहे. या तणावात फक्त लहान मुलं, शाळा-कॉलेज-एखादा नवीन अभ्यासक्रम शिकणारी मुलं, नोकरदार वर्ग नाही तर गृहिणीही गुरफटल्या आहेत. वाढती प्रलोभनं हेही तणाव वाढण्याचं महत्त्वाचं कारण ठरत आहे. अशा वाढत्या ताणतणावामुळे मन अस्थिर बनतं. समर्थ रामदास स्वामींनी मनाचं वर्णन अचपळ मन माझे। धावरे धाव घेता..अशा शब्दात अचूकपणे केलेलं आहे. क्षणार्धात मैलोन् मैल धाव घेणा-या मनाला लगाम नाही घातला तर मानसिक स्वास्थ्य बिघडतं. शारीरिक व्याधी जडतात. उच्च रक्तदाब, हृदयरोग, विविध प्रकारच्या गायनॅक समस्या याही मानसिक संतुलन बिघडल्यामुळे जडतात. मुंबई ही आता मधुमेहींची नगरी समजली जाते. आणि मुख्य म्हणजे मधुमेहाचा आजार तणावामुळे बळावत आहे, असंही काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. पोटाचे विकारही तणावामुळे वाढत आहेत. एकंदरीत जीवनाच्या प्रत्येक क्षणाला लोकं तणावाचा सामना करतात. पण त्याकडे समजून दुर्लक्ष केलं जातं.
ताणतणाव चांगला की वाईट?
काही प्रमाणात निर्माण होणारा ताणतणाव हा चांगला. जर आपल्याला अगदी उत्तम कार्यपद्धती हवी असेल तर थोडा तणाव आवश्यक आहे. नाहीतर आपण खूपच आळशी होऊ. आपल्याकडून कुठल्याच प्रकारचं भरीव काम होणार नाही. अतिरिक्त तणाव हा वाईटच. या तणावाचे शारीरिक आणि मानसिक परिणाम व्यक्तीला सहन करावे लागतात. म्हणजे जी माणसं सतत हसत-खेळत असतात, त्यांना कुठल्याच प्रकारचा तणाव नसतो, असं म्हणणं चुकीचं ठरेल. आपल्यावर असणारा तणाव न दाखवता काम करणं ही त्यांची कार्यपद्धती आहे. अर्थात ती चांगली. मात्र ती प्रत्येकाला जमतेच असं नाही.
परिणाम कोणते? ( stress management )
सतत चिडणं, दुसऱ्यांवर राग काढणं, टीका करणं, मधुमेह, उच्चरक्तदाब यांसारख्या व्याधी जडणं, मनात नको नको ते न्यूनगंड निर्माण होणं, विसरणं, अति खाणं, खोटं बोलणं, स्त्रियांमध्ये गायनॅकोलॉजिकल समस्या निर्माण होणं. याच्या जोडीने हृदयविकार वाढतो. काही लोकांना सतत शौचास, किंवा लघवीस होते. ऍसिडीटी वाढते. लहान मुलं अंथरुण ओलं करतात. मनात विचारांचा गोंधळ निर्माण होतो. व्यसनाधीनता वाढते. काही जण तर एकलकोंडे होतात. चंचलवृत्ती वाढते. एकाग्रता कमी होते. काही जणं अन्न-पाणी सोडतात. याच्या उलट काही प्रमाणापेक्षा जास्त खातात. ज्या स्त्रियांना गरोदरपणात सर्वात जास्त तणाव असतो त्यांची अपत्य ही चंचल असतात. वृद्धांमध्ये विसराळूपणाची समस्या वाढते.
सगळेच वयोगट तणावाखाली असतात का?
तणाव कुणाला नाही? लहान मुलांपासून ते वृद्ध सगळेच विविध प्रकारच्या ताणावाला सामोरे जातात.
लहान मुलं : आई-वडिलांमध्ये एकोपा नसणं, पालक घटस्फोटित असणं, भावडांमध्ये भेदभाव असणं, आई-वडिलांनी मुलांना वेळ न देणं यामुळे लहान मुलांमध्ये तणाव असू शकतात.
शाळा, कॉलेज, विविध अभ्यासक्रम शिकणारी मुलं : गुण मिळवण्याचं ओझं, पालक-शिक्षकांच्या अवाजवी अपेक्षा, भावंडांमध्ये तुलना करणं, दोन विद्यार्थ्यांमध्ये तुलना करणं.
नोकदरदार मंडळी : कामाच्या अवाजवी अपेक्षा, कुवतीपेक्षा जास्त काम अंगावर पडणं.
गृहिणी : बहुपेडी काम करणं. म्हणजे एकाच वेळा घरच्यांचं राग, लोभ, रुसवे, फुगवे सांभाळत मुलं, नवरा, घरची मंडळी, शेजारपाजाऱ्यांशी जुळवून घेताना नाकीनऊ येणं.
वृद्धमंडळी : आपण मुलांना सांभाळलं म्हणून मुलांनी आपल्याला आपल्या म्हातारपणी सांभाळलं पाहिजे ही अपेक्षा ठेवणं.( stress management )
उपाय काय?
सामोपचाराने समजून घेऊन, मिळून मिसळून कामं करता आली पाहिजेत. सर्वात आधी दुसऱ्याचा विचार करायला शिकलं पाहिजे. आपल्या क्षमतांचा विचार करून कामं केली पाहिजेत. एखादं काम जमणार नसेल तर तसं वरिष्ठांना विश्वासात घेऊन ते सांगता आलं पाहिजे. पालकांनी मुलांवर त्यांच्या अपेक्षांचं ओझं लादू नये. नवरा-बायकोने एकमेकांमध्ये सुसंवाद डेव्हलप केला पाहिजे. निरपेक्ष वृत्तीने कामं करता आली पाहिजेत. सर्वात आधी विचारांची, नात्यांची, भावानांची गल्लत करू नये. स्वीच ऑन स्वीच ऑफ होत आलं पाहिजे. याच्या जोडीला छंद जोपासा. व्यायाम करा. कामाचं नियोजन करा. आपल्या जीवलगांशी आपल्या समस्यांविषयी बोला. त्याने मन मोकळं होईल.( stress management )