तुम्ही कधी एखाद्या खोलीत गेलाय आणि तिथे का गेलात हेच विसरले आहात? किंवा तुमचा चष्मा बराच वेळ शोधताय आणि शेवटी लक्षात येतं की तो तुमच्या डोक्यालाच अडकवलेला होता. जर या गोष्टी सारख्याच होत असतील आणि तुम्हाला नुकतंच मूल झालं असेल तर घाबरण्यासारखं काही नाही, कारण अनेक स्त्रियांप्रमाणे तुम्ही देखील मॉमी ब्रेनने त्रस्त असू शकता. गर्भधारणेनंतरचा विसरभोळेपणा म्हणजेच मॉमी ब्रेन होय, आणि हि एक खरी गोष्ट आहे ज्याचे शास्त्रीय पुरावे देखील उपलब्ध आहेत.
काय आहे मॉमी ब्रेन?
साधारणतः मूल झाल्यानंतर एखाद्या आईला होणाऱ्या विसरभोळेपणाला किंवा कमी झोपेमुळे होणाऱ्या त्रासाला मॉमी ब्रेन किंवा मॉमनेशिया म्हणतात. ही गोष्ट सामान्य असून प्रसूतीनंतर पाच महिन्यांपर्यंत याचा परिणाम राहू शकतो. ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाकडून करण्यात आलेल्या संशोधनात असे दिसून आले की गर्भधारणेमुळे स्त्रीच्या आकलन क्षमतेवर परिणाम होतात, मेंदूच्या वाढीस मदत होते आणि लोकांना समजून घेण्याची क्षमता देखील वाढते. एवढेच नाही तर पित्याच्या मेंदूतही याप्रकारचे सकारात्मक बदल घडून येतात असे देखील संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
मॉमी ब्रेन कशामुळे होतो? ( mommy brain information in marathi )
एक नाही तर अनेक गोष्टींमुळे मॉमी ब्रेन होऊ शकतो, पण यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे प्रसूतीनंतर होणारा झोपेचा अभाव. बाळाची काळजी घेण्यासाठी आईला बऱ्याचवेळा रात्री उठून बसावे लागते यामुळे निद्रानाश होतो आणि याप्रकारची परिस्थिती उद्भवते. यासोबतच मातेच्या मेंदूमध्ये गर्भधारणेच्या काळात आणि प्रसूतीनंतर बदल होतात ज्याचा परिणाम हा तिच्या स्मृतीवर होतो. प्रसूतीनंतर मातेचे संपूर्ण लक्ष हे बाळावर असते आणि बाकीच्या गोष्टींबाबत विसरभोळेपणा होतो. पण यासर्व गोष्टी नैसर्गिक आहेत आणि काळानुसार परिस्थिती पुन्हा एकदा पूर्ववत होते.
मॉमी ब्रेनवर उपाय काय आहेत?
जरी ही गोष्ट नैसर्गिक असली तरी सारख्या गोष्टी विसरणे हे बऱ्याच वेळा त्रासदायक असू शकतं. तुम्ही गर्भधारणेच्या दुष्परिणामांपासून लांब जाऊ शकत नाही पण ते कमी करण्यासाठी पुढच्या काही टिपा तुम्हाला कामाला येतील.
१. तुम्हाला काय करायचं आहे या कामाची यादी करा.
एखाद्या नोटपॅडवर किंवा तुमच्या मोबाईलवर तुम्ही महत्वाच्या कामांची यादी करू शकता, जेणेकरून कामाच्या व्यापात तुम्ही त्या गोष्टी विसरणार नाहीत. यामुळे तुम्हाला तुमची कामे सुटसुटीतरित्या करता येतील तसेच, बऱ्याच गोष्टी एकाच वेळेस लक्षात ठेवायचा व्याप देखील राहणार नाही.
२. चांगली आणि मुबलक झोप घ्या. ( mommy brain information in marathi )
झोपेची कमतरता हे मॉमी ब्रेन मागचं प्रमुख कारण आहे हे आपण पाहिलं जे की प्रसूतीनंतरच्या काही महिन्यांमध्ये स्वाभाविक आहे. मेंदू आणि शरीर योग्य चालण्यासाठी योग्य आणि परिपूर्ण झोप हि फार आवश्यक आहे. त्यामुळे तुमचं झोपेचं वेळापत्रक ठरवा आणि पुरेपूर झोप घ्या.
३. बाळंतपणाचा जास्त ताण घेऊ नका
बाळंतपणानंतर होणारे मानसिक आणि शारीरिक बदल नैसर्गिक आहेत आणि त्याकरता स्वतःला दोष देऊ नका. या गोष्टींबाबत होणाऱ्या नकारात्मक संभाषणासून लांब राहा, जेणेकरून मानसिक ताण कमी होईल. तसेच दिवसभराचं वेळापत्रक तयार करा जेणेकरून ऐनवेळी तुमची भंबेरी उडणार नाही, ज्याचा त्रास तुमच्याच होईल.
४. शारीरिक आणि मानसिक व्यायाम ( mommy brain information in marathi )
तुमच्या फावल्या वेळेत मेंदूला चालना देणाऱ्या गोष्टी म्हणजे शब्दकोडी सोडवा ज्यामुळे तुमचा मेंदू तल्लख राहील. तसेच थोड्याफार प्रमाणात व्यायाम, प्राणायाम आणि योग देखील करा जेणेकरून तुम्हाला ताजेतवाने राहायला मदत मिळेल.
– विकास मुढे