पुणे – डेस्क टॉप (desk top yoga) योगा किंवा यालाच कॉर्पोरेट योगा ही म्हणता येईल, खूप नावीन्यपूर्ण शब्द पण काळाची गरज. आपण जाणतोच की मॅट किंवा सतरंजी ही योगाची सोबती आणि अविभाज्य घटक. मात्र, धावपळीच्या आधुनिक युगात मॅटवर योगाभ्यास करायला लोकांना फुरसत नाही. त्यामुळेच की काय डेस्क टॉप योगाचा जन्म झाला.
जागतिक आकडेवारीनुसार मागील 10 वर्षात संगणकाच्या (कॉम्प्युटर )अति वापरामुळे, हाताला मुंग्या येणे (कार्पेल टनेल सिन्ड्रोम ), दृष्टिदोष, मानदुखी (सर्वीकल स्पॉण्डिलायसिस), खांदे आखडणे (फ्रोझन शोल्डर )तसेच मानसिक तणाव यांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. एका जागी दीर्घकाळ बसून ऑफिसची कामे करावी लागणाऱ्या व्यक्तीसाठी साधी, सोपी व त्वरित विश्रांती देणारी योगिक हालचाली व प्राणायामाची एक शृंखला तयार करण्यात आली आहे जी की ते आहे त्या स्थितीत, खुर्चीवर बसून करू शकतात. प्रदीर्घ बैठे आणि बौद्धिक काम करण्यासाठी ही संजिवनी म्हणावी लागेल. शरीर व मन एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
मनावर आलेला ताण स्नायूमध्ये कडकपणा आणतो. योगिक स्टिचिंगद्वारे काम करून मनावरचा ताण कमी करू शकतो. झटपट शरीर विश्रांत करण्याचे दुसरे साधन नाही. प्राणायामद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा वाढवून लगेच ताजेतवाने होता येईल. इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निक शरीरात काही रासायनिक बदल करून हलकेपणा देण्यास मदत करतात.
20/20 म्हणजे दर वीस मिनिटाला वीस सेकंदासाठी दृष्टी कॉम्पुटर स्क्रीनवरून नजर हटवून दूरवरची एखादी वस्तू पाहायची किंवा डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्यावा. थकलेल्या डोळ्यांसाठी जात्रू त्राटक म्हणजे उजव्या आणि डाव्या खांद्यावर पाच श्वास मान न वळवता दृष्टी स्थिर ठेवावी तसेच डोळ्यांच्या बुबुळांना घड्याळाच्या दिशेने व विरुद्ध दिशेने गोलाकार फिरवणे.
चक्षू विश्रामासाठी दोन्ही हात बंद डोळ्यावर ठेवून हाताची उष्णता डोळ्यांना द्यावी तत्पूर्वी हात चोळून गरम केले तर अधिक चांगले. श्वास गतीसोबत ग्रीवाचालन व स्कंधचालनचा अभ्यास काही ठराविक वेळानंतर केला तर आखडलेली मान आणि खांदे लगेच मोकळे होतील.
खुर्चीवर बसून ताडासनाप्रमाणे दोन्ही हात वरच्या दिशेने खेचले तर पाठीच्या मणक्यावर सततच्या बैठकीमुळे आलेला ताण निवारला जाऊन रक्त पुरवठा वाढवता येईल. वक्रासन, हस्तपदासान, गुडघ्यातून पाय बंद-उघड, घोटा चक्राकार, यासारख्या काही योगिक हालचाली कामाच्या ठिकाणी शक्य आहे.
मोठमोठ्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये या गोष्टीचं महत्त्व उमजले आहे. त्यामुळे एक योगिक ब्रेक घेऊन योगा (desk top yoga) इंस्ट्रक्टरद्वारे 15 ते 20 मिनिटांसाठी हा अभ्यास केला जातो. अनुलोम विलोम प्राणायाम मेंदूला रक्त पुरवठा वाढवतो तर भ्रामरी अतिरिक्त तणाव निवारण्यास मदत करतो.
अयुष मंत्रालयाने कामाच्या ठिकाणी स्टाफ मेंबरचे आरोग्य आणि कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने योगा इंस्ट्रक्टरची नेमणूक करणे बंधनकारक केले आहे. अतः डेस्कटॉप योगाला सर्व बैठेकाम करणाऱ्या एम्प्लॉयी आणि ओनरने काळाची गरज म्हणून स्वीकारावे.
The post #InternationalYogaDay: असा करा.., ‘डेस्क टॉप’ योगा appeared first on Dainik Prabhat.