मुत्राशय, मूत्रपिंड व ऍड्रीनलग्रंथींचे कार्य प्रभावी करणारे उत्तानपाद कटीचक्रासन स्वादुपिंडालाही हितकारक उत्तानपाद कटीचक्रासन स्वादुपिंडालाही हितकारक आहे.
हे एक शयनस्थितीतील आसन आहे. उत्तान म्हणजे उचलणे, पाद म्हणजे पाय आणि कटी म्हणजे कंबर! कंबरेचे चक्र. या आसनाचे दुसरे नाव आहे परिवर्तनासन. हे आसन करताना प्रथम शयनस्थिती घ्यावी. मग श्वास घेत दोन्ही पाय वर उचलावेत आणि पाय उचलून कंबरेभोवती गोल फिरवावेत.
या आसनाचे फायदे अनेक आहेत.
मुख्यत्वे जठराला फायदा होतो. प्रथम दोन्ही पाय उचलण्यापूर्वी दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषत आणावेत. तळहात जमिनीवर पालथे ठेवावेत. प्रथम श्वास सोडावा. मग श्वास घेत उत्तानपादासनाची स्थिती घ्यावी. श्वास सोडत दोन्ही पाय डावीकडे झुकवून डाव्या तळहातावर ठेवावे. काही सेकंद या स्थितीत थांबावे.
श्वसन संथ चालू ठेवावे. आता श्वास सोडावा नंतर दोन्ही पाय श्वास घेत समोरच्या दिशेने फिरवत उजव्या तळहातावर ठेवावे. काही सेकंद थांबावे मग परत श्वास घेत उत्तानपादासन स्थिती घ्यावी. श्वास सोडत दोन्ही पाय जमिनीवर शयनस्थितीच्या अवस्थेत आणावेत. मग दोन्ही हात बाजूने कंबरेजवळ आणावेत व शयनस्थिती घ्यावी.
हे आसन करताना प्रत्येक वेळी दोन्ही पाय गुडघ्यात सरळच राहतील याची दक्षता घ्यावी. एक आवर्तन केल्यावर दुसरे आवर्तन कोठेही न थांबता सलग पाय फिरवित संचलन क्रिया करावी. दोन्ही पाय तळहातावर ठेवताना विरूद्ध बाजूचा खांदा जमिनीवर दाबवण्याचा प्रयत्न करावा. कोठेही न थांबता पाय चक्राकार फिरवत किमान तीनचार वेळा आवर्तने करावीत. उत्तानपादासनाच्या अवस्थेत असताना दोन्ही तळपाय डाव्या उजव्या तळहातावर ठेवण्याची अवस्था योगतज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली करावी.
ही अवस्था पंधरा ते तीस सेकंद स्थिर ठेवता येते. सरावाने कालावधी वाढवता येतो. उत्तानपाद कटीचक्रासनाचे शरीरांर्तगत परिणाम सकारात्मक होतात. पण ज्यांना मणक्याचे विकार, तसेच स्लिपडिस्कचा विकार आहे त्यांनी हे आसन अजिबात करू नये. पोटाची ऑपरेशन्स झाली असतील तर दोन वर्षानंतर हे आसन करावे.
काही वेळा पोटातील आतील अवयवांना सूज येते. त्यांनी हे आसन करू नये. ज्यांना पोटातील अवयवांना बळकटी आणायची आहे. त्यांनी हे आसन करण्यापूर्वी रोज उत्तानपादासन, नौकासन, धनुरासन, भुजगांसन, शलभासन, पदसंचालनाचे विविध प्रकार यांची प्रॅक्टिस नियमित सहा महिने करावी आणि मग तज्ज्ञाच्या मार्गदर्शना खाली हे आसन करावे.
या आसनामुळे पोटावरील व ओटीपोटावरील मेद कमी होतो. स्थूलता निवारणार्थ करावयाच्या आसनांमधे या आसनाला प्राधान्य दिले आहे कारण या आसनामुळे उत्तम प्रकारे वजन कमी होते. सुस्ती जाते. यकृत, पित्त, जठर यांची साखळी उत्तम प्रकारे कार्यान्वित होते. एकंदरीत शरीराची कार्यव्यवस्था सुधारते. बद्धकोष्ठता, गॅसेसचा त्रास कमी होतो. उत्सर्जन क्रिया सुरळीत होते.
मूत्राशय, मूत्रपिंड, ऍड्रीनलग्रंथींचे कार्य सुधारते, स्वादुपिंडाची कार्यक्षमता वाढते, कंबरेत, नितंबात लचक भरली असेल तर ती दूर होते. हे आसन मधुमेहींना लाभार्थी आहे म्हणून त्यांनी रोज नियमितपणे उत्तानपाद कटीचक्रासन करावे.
The post International Yoga Day : उत्तानपाद कटीचक्रासन मणक्याच्या विकारावर हितकारक appeared first on Dainik Prabhat.