– डॉ. अतुल कोकाटे
हायड्रोसेफलस हा एक धोकादायक विकार आहे. त्यामध्ये रूग्णाच्या मेंदूमध्ये द्रव पदार्थ साठू लागतो. त्यामुळे त्याचे डोके मोठे होते. सर्वसाधारणपणे हा विकार लहान बालकांमध्येच दिसून येतो. या आजाराला जलशीर्ष असेही म्हणतात. हायड्रोसेफल विकारामुळे रूग्णाचे प्राणही जाऊ शकतात कारण मेंदूमध्ये प्रमाणापेक्षा अधिक पाणी भरल्याने मेंदूचे नुकसान होते आणि मेंदूच्या नसा फाटल्याने मेंदूच्या आत रक्तस्राव होतो. या आजाराची लक्षणे आणि कारणे जाणून घेऊया.
मनुष्य प्राण्याच्या डोक्यामध्ये विशिष्ट प्रकारचा द्रव पदार्थ भरलेला असतो त्याला सेरेब्रोस्पाइनल फ्ल्युईल म्हणतात. हा द्रव मेंदू साठी आवश्यक असतो कारण त्यामुळे कोणत्याही इजेपासून मेंदूचा बचाव होतो. उदा. गाडीचा टायर फाटू नये यासाठी ट्यूबमध्ये हवा भरलेली असते त्याच प्रमाणे सेरेब्रोस्पाईनल फ्ल्युईड डोक्यात प्रमाणापेक्षा अधिक भरू लागते त्यामुळे डोक्याला सूज येते. हा द्रव पदार्थ अधिक वाढल्यास रूग्णाचे डोके जास्त मोठे होते. त्यामुळे रुग्णाचे रूप भयानक दिसू लागते.
लक्षणे
एक वर्षाच्या बाळामध्ये डोक्याचा आकार वाढणे हे या विकाराचे प्रमुख लक्षण आहे. त्याशिवाय उलटी होणे, अति झोप, अति चिडचिड, बाळाला वर पाहता न येणे, फीटस येणे इत्यादी काही लक्षणे आहेत. एक वर्षापेक्षा मोठ्या मुलांमध्ये आणि वयस्कर लोकांमध्ये डोकेदुखी, चिडचिड, डोळ्याची नजर कमी होणे आणि वस्तू दोन दोन दिसणे आणि उलटी होणे ही प्रमुख लक्षणे आहेत. त्या व्यतिरिक्त फीटस येणे, वर्तणुकीत बदल, चालताना तोल जाणे, अनियंत्रित लघवी होणे ही प्रमुख लक्षणे आहेत.
उपचार
शस्त्रक्रिया करून डोक्यातील पाणी ट्यूबद्वारे शरीराच्या दुसऱ्या बाजूला पाठवले जाते. या क्रियेत हे पाणी पोटात पाठवले जाते पण या शस्त्रक्रियेत अनेक धोके होऊ शकतात. जसे नळीवर संसर्ग होणे, नळीने योग्य पद्धतीने काम न करणे, नळीत अडथळा निर्माण होणे, शरीराच्या मानाने नळी छोटी पडणे, मेंदूत रक्ताच्या गाठी होणे, पोटाशी निगडीत समस्या होणे. हल्ली दुर्बिणीचा वापर करून मेंदूच्या आतच एक मार्ग बनवण्याची पद्धत प्रचलित आहे. त्या पद्धतीला थर्ड वॅन्ट्रिकुलोस्टॅमी म्हणतात.