सहा महिने पूर्ण होईपर्यंत बाळाला फक्त स्तनपान देणे आवश्यक आहे. अंगावरचे दूध पचायला सोपे तर असतेच पण पहिले सहा महिने बाळासाठी ते पूर्णान्न असते आणि पुरेसेही असते. बाळाच्या वाढीसाठी सर्व आवश्यक पोषकतत्वे बाळाला स्तनपानाद्वारे मिळतात. सर्वसामान्य परिस्थितीत या काळात वरचे पाणीही द्यायची गरज भासत नाही. सहा महिन्यांनंतर मात्र बाळाची भूक वाढते, अंगावरचे दूध पुरेनासे होते आणि बाळाला हळूहळू वरचे अन्न सुरु करावे लागते.
बऱ्याच घरांमध्ये वरचे अन्न सुरु करण्याची घाई केली जाते. अगदी तिसऱ्या-चौथ्या महिन्यापासूनच वरचे अन्न सुरु केले जाते. हे बाळाच्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असते. सहा महिन्यांपूर्वी बाळाची पचनशक्ती कमकुवत असते, प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे बाळाला लवकर वरचे अन्न सुरु केल्यास अपचन, अतिसार यासारखे त्रास होऊ शकतात. याउलट वरचे अन्न सुरु करण्यास सहा महिन्यांपेक्षा जास्त वेळ लावल्यास बाळाची वाढ खुंटण्याची शक्यता असते.
सहा महिन्यांनंतर वरचा आहार सुरु करताना काय लक्षात ठेवावे?
1. सुरुवातीचे काही दिवस आहार द्रव स्वरूपात असावा पण हे द्रवपदार्थ अंगावरील दूधापेक्षा घट्ट असावेत. पाण्यासारखे पातळ द्रवपदार्थ दिल्यास (उदा. नारळपाणी, फळांचे अथवा भाज्यांचे पातळ रस) बाळाचे पोट भरणार नाही आणि बाळाला पुरेसे उष्मांक मिळणार नाहीत. यामुळे बाळाचे वजन अपेक्षितरित्या वाढणार नाही. त्यामुळे खूप पाणी घालून पदार्थ पातळ करू नयेत. जाडसर द्रव ठेवून ते मोठ्या गाळणीने (छिद्रांचा आकार चहाच्या गाळणीच्या छिद्रांपेक्षा मोठा हवा) गाळून द्यावे.
2. वरच्या आहाराची सुरुवात करताना एकावेळी एकच नवीन पदार्थ सुरु करावा. उदा. भाताची पेज दिल्यास 3-4 दिवस केवळ भाताची पेजच द्यावी. मग मुगाच्या डाळीची पेज सुरु करायची असल्यास ती सुरु केल्यावर पुढील चार दिवस कोणताही नवीन पदार्थ देऊ नये. यामुळे प्रत्येक नवीन पदार्थ नीट पचतो का, कोणत्या पदार्थाची ऍलर्जी तर नाही ना याची कल्पना येईल. अन्यथा एकाच दिवशी दोन-तीन नवीन पदार्थ दिले आणि बाळाला काही त्रास झाला, तर तो कशामुळे झाला हे शोधणे अवघड जाईल.
3. बाळ एक वर्षाचे होईपर्यंत कोणत्याही पदार्थात मीठ, साखर, गूळ घालू नये. असे दिसून येते की, बऱ्याच पालकांना बाळासाठीच्या पदार्थांमध्ये मीठ किंवा साखर न घालण्याची कल्पनाच सहन होत नाही! मीठ घातले नाही तर बाळाला चव कशी लागेल? साखर नाही घातली तर ते बाळाला आवडेल का? असे बरेच प्रश्न अनेकांना पडतात. बऱ्याचदा बाळ एखादा पदार्थ खात नाही हे पाहून त्यात साखर घालून दिली जाते जेणेकरून बाळाने ते खावे. पण यामुळे बाळाला अशा ठराविक पदार्थांमध्ये साखर घालून खायची सवय लागते (जी आयुष्यभरही टिकू शकते!).
आपण एक लक्षात ठेवले पाहिजे की, बाळाला मीठ काय आणि साखर काय कशाचीच चव माहीत नसते. आपण या सगळ्या चवींची ओळख वरचा आहार सुरु केल्यावर करून देत असतो. ती ओळखच आपण सुरुवातीला करून दिली नाही तर साखर-मीठ न घालताही बाळे सगळे पदार्थ आवडीने खातात!
4. वरचा आहार देताना बाळाच्या भुकेच्या वेळेच्या थोडे आधी वरचे अन्न द्यायला सुरुवात करावी. बाळाला फार भूक लागेपर्यंत थांबू नये. कारण काही दिवस बाळ जास्त खाणार नाही. कदाचित 3-4 चमच्यातच कंटाळेल किंवा तोंडातून बाहेर काढेल. भूकेच्या वेळी हे घडल्यास बाळ अधिकच चिडचिड करेल. बाळ नवीन शिकत आहे, त्याला थोडा वेळ द्यावा. आपणही त्रागा न करता थोडा धीर धरावा. बाळाने खायला नकार दिल्यास जबरदस्ती करू नये. खाऊन झाले की स्तनपान द्यावे. बाळ पुरेशा प्रमाणात खायला लागेपर्यंत पूर्वीप्रमाणेच स्तनपान सुरु ठेवावे.
5. हळूहळू बाळाचा आहार वाढेल. मग एकाआड एक भुकेच्या वेळी वरचा आहार आणि स्तनपान असे सुरु करावे. बाळ एक वर्षांचे होईपर्यंत स्तनपान थांबवू नये.
6. एखादा पदार्थ खाऊन बाळाला त्रास झाला तर तो पदार्थ थोडे दिवस देऊ नये. काही दिवसांनी परत थोड्या प्रमाणात देऊन बघावा. परत त्रास झाल्यास डॉक्टर व आहारतज्ञांचा सल्ला घ्यावा.
7. बाळाला भरवताना स्वच्छ वाटी-चमच्याचा वापर करावा. खूप करम किंवा खूप गार पदार्थ न देता कोमट किंवा रूम टेंपरेचरला असलेले पदार्थ द्यावेत. खाणे झाले की चमच्याने थोडे उकळून गार केलेले पाणी द्यावे. बाटलीचा वापर पूर्णपणे टाळावा.
8. बाळाला मांडीवर घेऊन डोके थोडे उंचावर धरून खायला द्यावे. आडवे धरून देऊ नये. हळूहळू बाळ बसायला लागल्यावर एका जागी बसवून अथवा बाळाच्या खुर्चीत ठेवून खायला द्यावे. खायला देताना बाळाशी गप्पा माराव्या, गाणी म्हणावी, गोष्ट सांगावी पण मोबाईल दाखवत भरवू नये.
सहा ते नऊ महिन्यांच्या काळात बाळाला काय द्यावे?
वरच्या आहाराची सुरुवात करताना मऊ, पचायला सोपे आणि ऍलर्जी होणार नाही असे पदार्थ द्यावे. यात शक्यतो प्रथम भाताची पेज द्यावी. मग मूगाची डाळ मऊ शिजवून त्यात थोडे पाणी घालून पेजेसारखे करून द्यावे. पालक, गाजर, बीट, रताळे, लाल भोपळा मऊ शिजवून थोडे पाणी घालून मोठ्या गाळणीतून गाळून द्यावे. हळूहळू मऊ फळे (केळे, पेर, पपई) साल काढून कुस्करून द्यावीत.
सफरचंद थोडे शिजवून मग साल काढून कुस्करून द्यावे. संत्री, मोसंबी, डाळिंब यासारखी फळे काही दिवसांनी सुरु करावी. या काळात लोहाची गरज मोठ्या प्रमाणात असते. भाज्या-फळे योग्य प्रमाणात आहारात घेतल्यास ही गरज भरून निघते. त्यासाठी सहा ते नऊ महिन्यांच्या काळात बाळाच्या पोटात किमान 8-10 चमचे भाज्या आणि 5 ते 7 चमचे फळांचा गर जायला हवा. डॉक्टरांच्या सल्ल्याने ठराविक काळासाठी लोहाचे औषध घ्यावे. साधारण आठव्या महिन्यानंतर घरी लावलेले ताजे दही सुरु करावे आणि अंड्याचा बलक मऊ शिजवून कुस्करून द्यावा. चिकनचे सूपही देता येईल. हळूहळू नाचणी सत्वाची पेज, डाळ-तांदूळाची मऊसर खिचडी हे पदार्थही देता येतील. त्यात अर्धा-एक छोटा चमचा तेल किंवा तूप घालावे.
सहा ते नऊ महिन्यांच्या काळात बाळाला काय देऊ नये?
या काळात बऱ्याचदा आईचे दूध बंद करून किंवा ते कमी पडते म्हणून गाईचे दूध सुरु केले जाते. एक वर्ष पूर्ण होईपर्यंत असे वरचे दूध देणे कटाक्षाने टाळावे. वरचे दूध पचायला जड असते. अनेकदा अतिरिक्त दूध पोटात गेल्याने लोहाची कमतरता निर्माण होते. कित्येकदा बाळे इतर पदार्थ खाणे टाळून दूधाचाच आग्रह धरतात. सहा ते नऊ महिन्यांच्या काळात गहू, अंड्याचा पांढरा भाग, शेंगदाणे, मासे, सोयाबिन हे पदार्थ टाळावे. हे पदार्थ न पचण्याची किंवा त्यामुळे ऍलर्जी येण्याची शक्यता असते. शिवाय शेंगदाणे, काजू, सुकामेवा, द्राक्षे, डाळिंबाचे दाणे, पॉपकॉर्न असे घशात अडकू शकणारे पदार्थ पूर्णपणे टाळावे. जन्मानंतर एक वर्ष पूर्ण होईपर्यंत मध देणेही टाळावे. काही बाळांना मधातील सूक्ष्मजीवांमुळे बोट्युलिसम नावाचा आजार होण्याची शक्यता असते. शिवाय वर नमूद केल्याप्रमाणे साखर, मीठ, गूळ, बाळगुटी यांचा वापर टाळावा. रेडीमेड फूड्स, बाजारात मिळणाऱ्या पावडरी देखील अनावश्यक आहेत. घरचे ताजे अन्न बाळासाठी सर्वोत्तम!
(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.)
डॉ. तेजस प्रज्ञा यशवंत