– अंजली खमितकर
पुणे -“एचआर-सीटी’ अर्थात हाय रिझोल्युशन कॉम्प्युटेड टोमोग्राफी स्कोअर जास्त असलेल्या करोना बाधितांचे प्रमाण या दुसऱ्या लाटेमध्ये जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातही सीटी स्कोअर 10 असणाऱ्या बाधित रुग्णांचे प्रमाण अधिक आहे.
दुसऱ्या लाटेतील संसर्ग हा वेगाने पसरत असून तो थेट फुफ्फुसात संसर्ग करत असल्याचे निरीक्षण काही तज्ज्ञांनी मांडले आहे. याशिवाय अशा बाधितांमध्ये “आरटी-पीसीआर’टेस्ट निगेटिव्ह येत असल्याने फुफ्फुसातील संसर्ग, न्यूमोनिया ही लक्षणे पाहण्यासाठी सीटी स्कोअर करावा लागतो, अशा रुग्णांमध्ये तो जास्त येत असल्याचे आणि एका दिवसात किंवा जास्तीत जास्त तीन ते चार दिवसांत हा स्कोअर 24 पर्यंतही जात असल्याचे दिसून आले आहे.
या लाटेमध्ये “रेमडेसिविर’चा वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे. रेमडेसिविरचा वापरही सीटी स्कोअर विषयी असलेल्या अपुऱ्या ज्ञानातून होत असल्याचे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सीटीस्कोअर कमी असतानाच रेमडेसिविरचा वापर केल्यास संसर्गाचा वेग कमी होतो आणि फुफ्फुसे वाचू शकतात, असा काहीसा समज झाला आहे. वास्तविक रेमडेसिविरचा वापर आणि स्कोअरचा दूरान्वयेही संबंध नसल्याचे मत उरो तज्ज्ञ डॉ. नितीन अभ्यंकर यांनी व्यक्त केले आहे.
रेमडेसिविर आणि सीटी स्कोअरचा संबंध नाही…
ऑक्सिजन कमी झाला असेल तर रेमडेसिविर वापरतो. सीटी स्कोअर वाढला तर वापरायचे असा नियमच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सीटी स्कोअर वाढला याचा अर्थ न्यूमोनिया वाढला आहे हा लॉजिकल अर्थ लावला जातो. परंतु, त्या न्यूमोनियाची तीव्रता त्या रुग्णाला वाढली आहे का, म्हणजे त्याचे ऑक्सिजन कमी झाले आहे का त्याला धाप लागत आहे का, याचे उत्तर सीटी स्कॅन देऊ शकत नाही. त्यामुळे “सीटी स्कॅन’ चुकीच्या पद्धतीने वापरला जात असून अनेक डॉक्टरांकडून सध्या असे काम होत असल्याचे डॉ. अभ्यंकर यांनी सांगितले.
“सीटी स्कॅन’ आणि “सीटी स्कोअर’ म्हणजे काय?
करोना इन्फेक्शनमुळे फुफ्फुसातील ऑक्सिजन शोषणाऱ्या पिशव्यांना सूज येऊन त्यात पाणी/कफ भरतो. छातीचा “सिटी स्कॅन’ करताना फुफ्फुसाचे 25 भाग करून त्या पैकी किती भाग हे संसर्गिक आहे हे पाहून त्याचा “स्कोअर’ काढतात. अनेकदा स्कोअर पाहण्यापेक्षा त्या संसर्गाचा पॅटर्न कसा आहे तो पाहणे महत्त्वाचे आहे. तो फॅब्रॉइड स्वरूपात आहे की, अन्य हे पाहणेही महत्त्वाचे आहे. अनेकदा 24 सीटी स्कोअर असलेल्या रुग्णाची ऑक्सिजनची पातळी सामान्य असू शकते.
उपचाराची दिशा निश्चित…
ऑक्सिजनची लेव्हल व्यवस्थित असेल, तर सीटी स्कॅनची गरज नाही. परंतु जेव्हा व्हायरल इन्फेक्शन आहे, सगळी लक्षणे करोनासदृश आहेत आणि “आरटी-पीसीआर’ टेस्ट निगेटिव्ह आली असेल तर मात्र “सीटी स्कॅन’मधून फुफ्फुसाला झालेला संसर्ग समजतो आणि त्यातून उपचाराची दिशा निश्चित होते. असा अडकलेला निर्णय “सीटी स्कॅन’ मधून सुटू शकतो. हा माझा स्वत:बाबत घडलेला अनुभव आहे, असे डॉ. अभ्यंकर यांनी सांगितले. “हे ही करून टाक’ असे म्हणत “सीटी स्कॅन’ ही टेस्टही आणली जात आहे, असेही डॉ. अभ्यंकर म्हणाले.
करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सीटी स्कॅन करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सीटी स्कोअर वाढतो आहे का हे पाहण्यापेक्षा त्या रुग्णाचे चलनवलन कसे होत आहे, त्यावर परिणाम होतो आहे का, हे पाहणे आधी महत्त्वाचे आहे. सध्या चुकीच्यावेळी चुकीच्या इंडिकेशन्ससाठी “सीटी स्कॅन’ अनेकजण करत आहेत. एकदा बाधित रुग्ण असेल आणि त्याची लक्षणे आधी मॉनिटर केली गेली पाहिजेत.
– डॉ. नितीन अभ्यंकर, उरो तज्ज्ञ