खेळण्यांमुळे मुलांचा मानसिक व शारीरिक विकास होतो. वयाच्या तिसऱ्या महिन्यापासून खेळणी लागतात. त्यामुळे पालक आपल्या पाल्याचा हट्ट पुरवतात आणि विविध प्रकारची खेळणी आणतात; परंतु काही खेळणी मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक असतात. त्यामुळे खेळणी घेताना पालकांनी जागरुक असणे महत्त्वाचे आहे. ( play games benefits )
बाळाला दिसेल असे व हाताला येतील असे बांधलेले आवाज करणारे रंगीत खेळणे घ्यावे. मूल थोडे मोठे झाल्यावर लाकडी किंवा प्लॅस्टिकचे ठोकळे, रिकामे डबे, प्लॅस्टिक किंवा धातूची भांडी घ्यावी. ठोकळे जुळवून घर किंवा आगगाडी असा आकार करायला शिकवावे. मनोरा करायला शिकवावा. मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव द्यावा. घरच्या घरी चिंध्यांपासून बनवलेली बाहुली मुलांच्या दृष्टीने सारखीच असते. बाहुलीचे 5-6 ड्रेस करून ठेवावे. मुलांना बाहुलीचे कपडे बदलणे आवडते. बागेतली खेळणी, वाळू मुलांना आनंदी करते. रंगीत चित्रांची पुस्तके, प्राणी, पक्षी, वस्तू अशा सभोवतालच्या जगाची ओळख करून देतात. ज्यात मुलांना स्वत:ला करायला काही वाव आहे अशी खेळणी मुलांना जास्त आवडतात. त्यांना ऍक्शन हवी असते. प्रेक्षक बनण्यात त्यांना रस नसतो. चित्रे काढणे, हातानी माणूस, घर, आगगाडी काढणे यातून मुलांना निर्मितीचा आनंद मिळतो. ( play games benefits )
टोक नसलेली कात्री व वर्तमानपत्रे हा एक उत्कृष्ट खेळ आहे. मुलांनी केलेल्या वस्तूंचे तोंडभरून कौतुक करावे. पाहुण्यांना त्या वस्तू आवर्जून दाखवाव्यात. पेन्सिल, कागद, रंग यांचा मुबलक पुरवठा मुलांना खेळण्यासाठी करावा. त्यातून मुले लिहायला वाचायला शिकतात. माती, चिखल, झाडूपासून वस्तू करायला संधी द्यावी. त्यातून डोळे व स्नायूंचा वापर करायला मुले शिकतात. यामुळे मुलांना आकाराचे ज्ञान होते. लहान मुलांना जन्मल्यानंतर बाहेरील जगाशी सामावून घेण्यासाठी काही कालावधी जावा लागतो. त्यामुळे पहिल्या तीन महिन्यांपर्यंत आईचा व इतर आवाज, रंगीत मोठे, चेहऱ्याचे चित्र किंवा मुखवटा वेगवेगळे वास, स्पर्श आदी गोष्टी बाळाला खेळण्यासारख्याच असतात. तीन महिन्यानंतर वस्तू स्वरूपातील खेळणी बाळाला आणावयास हरकत नसते.
मुलांनी एकट्याने वेगळे खेळणे आणि गटात खेळणे वेगळे. इतर मुलांच्या सहभागाची सवय मुलांना लावावी लागते. इतर मुलांशी पटवून घेणे, आपला नंबर येईपर्यंत वाट पाहणे, खेळणी एकमेकांना देणे, खाऊ वाटून घेणे. असे समाजात राहण्याचे प्रशिक्षण मुलाला खेळण्यातूनच मिळत असते. याशिवाय एकमेकांशी संपर्क साधण्याची कला मूल शिकत असते. खेळण्यांच्या माध्यमातून मुलांना इच्छा, आकांक्षा, भाव-भावनांना मोकळा मार्ग मिळतो. त्यामुळे मन, निरोगी, आनंदी राहते.
मुलांना खेळण्यातून फक्त आनंद हवा असतो. त्यांना चॅम्पीयन बनवण्याच्या मागे लगेच पालक लागतात. असे न करता त्यांना खेळण्यातून मनमुराद आनंद घेता येईल असे पाहावे. खेळताना झालेल्या मुलांच्या बारीकसारीक भांडणातून सुद्धा मुले शिकत असतात. दुसऱ्याचे अस्तित्व, म्हणणे मान्य करणे, दुसऱ्याच्या इच्छेला मान देणे, रागावर ताबा ठेवणे अशा अनेक गोष्टी मुले शिकत असतात.
मुलांना टापटिपीची विशेष जाण नसते. घरभर खेळणी अस्ताव्यस्त पडणे नैसर्गिक आहे. त्यामुळे मुलांना खेळ झाल्यावर आपली खेळणी कशी व्यवस्थित ठेवावीत याचे ज्ञान देणे गरजेचे आहे. खेळ बंद करायला लावल्यास मुले रडारड चिडचिड सुरू करतात. मग अशा वेळी थोडे त्यांना समजावून सांगणे हिताचे ठरते.( play games benefits )
खेळणी आणि बालपण यांच्या आठवणी वेगळ्याच असतात. खेळण्यांशी खेळता खेळताच मुले आपल्या शरीराचा आणि मेंदूचा वापर करायला शिकतात. त्यातूनच त्यांना शिस्त लागते, इतरांशी सलोख्याने वागणे, जबाबदारीची जाणीव अशा गोष्टी मुले नकळतच शिकतात. खेळणे हा एकप्रकारचा व्यायामच आहे. पण सध्या बैठे खेळ खेळले जातात त्यामुळे व्यायाम दूरच राहतो. खेळल्याने शरीर सुदृढ बनण्यास मदत होते, शिवाय बालपणाचा आनंद मनमुराद लुटता लुटता बालविकासही होतो.