अल्सरेटीव्ह कोलायटीस हा मोठ्या आतड्याचा विकार आहे. यात मोठ्या आतड्याला जखम होते. हा आजार तसा आपोआप बरा होतो. पण काही डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यावरही उपचार करण्याची आवश्यकता असते. तो आपोआप बरा होण्याची शक्यता असली तरी खबरदारी आणि तो पुन्हा उद्भवू नये यासाठी उपचारांची गरज असते. तसा हा आजार गंभीर नसला तरी त्याकडे दुर्लक्ष करावा इतका तो साधाही नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.
अल्सरचा विकार म्हटलें की आपल्या अंगावर काटा येतो. असंख्य पथ्यें आणि असह्य पोटदुखी हे अल्सरच्या दुखण्याचे वैशिष्ट्य. या अल्सरचाच एक सौम्य प्रकार आहे अल्सरेटीव्ह कोलायटीस. इन्फ्लमेटरी बॉवेल डीसीज (आयबीडी)या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आतड्याच्या विकाराचा तो एक प्रकार आहे. मोठे आतडे किंवा कोलोनची आग होणे म्हणजेच अल्सरेटीव्ह कोलायटीस. या आजाराचे मुख्य लक्षण म्हणजे वारंवार रक्तमिश्रीत शौचास होणे. अल्सरेटीव्ह कोलायटीसचे क्रोहन्स डीसीज म्हणजे आयबीडीचा आणखी प्रकार-शी साधर्म्य आहे. अल्सरेटीव्ह कोलायटीसची लक्षणे अनेकदा आपोआप नाहीशी होतात. पण तरीही तो आजार पूर्णपणे बरा होण्यासाठी उपचाराची गरज असते.
अल्सरेटीव्ह कोलायटीस हा आजार पाश्चात्य देशांमध्ये सर्रास आढळतो. पण भारतातही आता याचे प्रमाण वाढू लागले आहे. या आजाराकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्यातील गुंतागुंत वाढते आणि त्यामुळे हा आजार गंभीर बनतो. अमेरिकेत दर एक लाख लोकांमागे पस्तीस ते शंभर जण या विकाराने आजारी असतात. भारतात हे प्रमाण दहा हजारांमध्ये बारा असे आहे. आपल्या देशातील अल्सरेटीव्ह कोलायटीसने आजारी असलेल्या रूग्णांत अनेक प्रकारची गुंतागुंत आढळते.
गेल्या 50 वर्षांत अमेरिका आणि युरोपात या विकारावर झालेल्या संशोधनातून त्याचे अनेक घटक पुढे आले आहेत. भारतात या विकाराची काय स्थिती आहे हे तपासून पाहण्यासाठी याबाबत अद्याप तरी पुरेशी माहिती उपलब्ध नाही. या आधी भारतात या विकारासंबंधी करण्यात आलेल्या अभ्यासातून आढळून आले आहे की भारतात या विकाराचे प्रमाण आणि तीव्रता दोन्ही कमी होते. तथापि नव्वदच्या दशकात झालेल्या संशोधनात भारतात या विकाराचे प्रमाण गंभीर मानावे इतके जास्त आहे आणि त्याची तीव्रताही जास्त आहे, असेंही आढळून आले. हे या विकाराबाबत सामाजिक जाणीव वाढल्याने झाले असावे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. शिवाय या काळात आरोग्याच्या सुविधांमध्ये वाढ आणि विकास झाला. त्यामुळे या रोगाचे निदान होणेही शक्य झाले.
अल्सरेटीव्ह कोलायटीस हा विकार नेमका कशामुळे होतो, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यामागे अनुवांशिक कारण असण्याची शक्यता वर्तवली जाते. पर्यावरणीय घटकांमधून दुर्बल व्यक्तीमध्ये या विकाराचा प्रादुर्भाव होत असावा, असेही म्हटले जाते. आहारात सुधारणा केल्याने हा विकार नियंत्रित होतो, पण आहारातील घटक या विकाराला कारणीभूत ठरत नाहीत. आपोआप बरा होणारा आजार असेच या आजाराचे स्वरूप आहे आणि त्याच्यावर उपचार करतानाही ही बाब ध्यानात ठेवली जाते. तरीही यावर जळजळ किंवा सूज बरी होणारी औषधे, प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे या आजारात दिली जातात. काही वेळा मोठ्या आतडे पूर्णपणे किंवा थोड्या प्रमाणात काढून टाकण्याची शस्त्रक्रियाही या आजारात करावी लागते. या शस्त्रक्रियेला कोलेक्टोमी असे म्हणतात. ही शस्त्रक्रिया या आजारावरील एक उपचार मानला जातो.
कारणे
अल्सरेटीव्ह कोलायटीस होण्याची नेमकी कारणे अद्याप अस्पष्ट आहेत. पण हा विकार होण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत असाव्यात असा अंदाज वर्तवला जातो.
अनुवंशिक घटक
१) अनेक कुटुंबांत अल्सरेटीव्ह कोलायटीसचे रूग्ण आढळतात.
२) एकसारखे दिसणाऱ्या जुळ्यांमध्ये हा विकार होण्याचे प्रमाण दहा टक्के आहेत.
३) हा विकार होणाऱ्या व्यक्तींमधील वांशिक भेदही अनेकदा दिसतो. जनुकसंहितेतील बारा क्षेत्रे अशी आहेत की जी अल्सरेटीव्ह कोलायटीसशी निगडीत आहेत. त्यात क्रोमो सोम्स 16,12,6,14,5,19,1 आणि 3 यांचा समावेश आहे. त्यांच्या शोधानुसार त्यांचा क्रम लावला आहे. मात्र यापैकी कोणत्याही क्रोमोसोम्समध्ये हा दोष सतत किंवा वारंवार दिसलेला नाही. त्यामुळे विविध गुणसूत्रांच्या संयोगाने हा विकार होतो असे म्हणणे धाडसाचे ठरते.
पर्यावरणीय घटक
पर्यावरणातील घटकांमुळे हा विकार होतो, असा सिद्धान्तही काही शास्त्रज्ञ मांडतात.
आहार : मोठ्या आतड्यात अनेक अन्नघटक साठवले जातात. त्यामुळे तेथे जळजळ होणे स्वाभाविक असते. अल्सरेटीव्ह कोलायटीस आणि क्रोहन्स डीसीज च्या पॅथोजेनिसीसमध्ये आहारातील घटक महत्त्वाची भूमिका बजावतात.
काही शास्त्रज्ञांच्या मते हा विकार ऑटोइम्युन विकार आहे. म्हणजे या विकारात पचनसंस्थेत बिघाड निर्माण होतो आणि शरीराच्या काही भागावर त्याचा परिणाम होतो. अनेकदा मोठे आतडे काढून टाकणे हा त्यावरील उपचार योग्य ठरतो.
हा आजार जेव्हा कमी प्रमाणात असतो तेव्हा रुग्णाच्या पोटात दुखते किंवा वात आल्यासारखे होते. त्याला आपल्याला अपचन झाल्यासारखे वाटते. या आजाराचे प्रमाण जेव्हा थोडे वाढते तेव्हा रूग्णाला किंचित ताप येतो, त्याला ऍनिमिया होतो. पोटात दुखू लागते. आणि किमान चारपाच वेळा शौचास जावे लागते. हा विकार जेव्हा तीव्र स्वरूप धारण करतो तेव्हा दिवसांतून सहापेक्षा जास्तवेळा शौचास जावे लागते. शौचावाटे रक्त पडते. ताप येतो, ऍनिमिया होतो.
या विकारावर औषधी उपचार करण्याबरोबरच धूम्रपान, मद्यपान न करणे, छातीत जळजळ होत असेल तिखट पदार्थ खाणे टाळणे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे न घेणे असे उपाय केल्यास हा विकार आटोक्यात येऊ शकतो.
– डॉ. महेश बरामदे